आभाळमाया : असंही ‘ब्लू मून’

69

>> वैश्विक ([email protected])

चांद्रविजयाचा सुवर्णमहोत्सव यंदा 20 जुलैला आहे, तो जगभर उत्साहात साजरा होईलच. त्यातही वैज्ञानिक जगात सुगीचं वातावरण असेल. कारण यापुढे चांद्रविजयाचा हीरक महोत्सव (60 वर्षे) पूर्ण होईल तेव्हा माणसाने चांद्र वसाहतींची सुरुवात तरी केलेली असेल. इतका चंद्र आता केवळ वैज्ञानिकांनाच नव्हे तर व्यापारी, व्यावसायिकांनाही भुरळ पाडू लागला आहे. पिढय़ा, दोन पिढय़ांत कोणी चंद्रावर जाण्याचा हट्ट धरला तर सहज पूर्ण होईल. कारण चंद्र तसा आपलाच. आपल्या पृथ्वीशी सख्खेपणाचं नातं असलेला, अवघ्या चार लाख किलोमीटरच्या आतच पृथ्वीभोवती फिरणारा.

चंद्राचं पृथ्वीभोवतीचं भ्रमणसुद्धा पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या भ्रमणासारखंच लंबगोलात असल्याने पृथ्वी जशी कधी सूर्याच्या जवळ-दूर असते तसाच चंद्रही पृथ्वीच्या जवळ येतो. तेव्हा सुमारे तीन लाख छप्पन्न हजार किलोमीटरवर असतो आणि त्याचं पृथ्वीपासूनचं दूरस्थ अंतर चार लाख पाच हजार किलोमीटर भरतं. जेव्हा तो उपभू किंवा पृथ्वीच्या जवळ असतो तेव्हा किंचित मोठा दिसतो. त्यालाच ‘सुपरमून’ म्हणतात. या अंतरातील हा फरक नुसत्या डोळय़ांनी ठळकपणे जाणवण्याइतपत नसला तरी ‘सुपरमून’ म्हटल्यावर लोक कुतूहलाने त्या पौर्णिमेकडे पाहतात. अशा बातम्या वृत्तपत्रीय रकाने भरतात. वैज्ञानिक जागृतीच्या दृष्टीने ते उपकारकच ठरतं.

दुसरा प्रकार ‘ब्लू मून’चा. इंग्लिशमध्ये ‘वन्स इन अ ब्लू मून’ असा वाप्रचार आहे. क्वचित घडणाऱ्या गोष्टींबद्दल असं म्हटलं जातं. याचाच अर्थ प्रत्येक पौर्णिमा काही ‘ब्लू मून’ची नसते. त्याचा पाश्चात्त्य सौर काळगणनेशी संबंध आहे. चांद्रमास हा 29.53 दिवसांचा असल्याने दीड दीड दिवस मागे जात चांद्र महिना आणि सौर महिना यांची एखाद वेळेस अशी सांगड जुळते की, इंग्लिश कॅलेंडरच्या एक तारखेला पौर्णिमा असेल तर ती पुन्हा त्याच महिन्यात एकोणतीस  किंवा तीस तारखेला येते. अशी दुसरी पौर्णिमा ‘ब्लू मून’ची असते. पौर्णिमेचे चंद्रबिंब लालसर दिसते. त्याला पाश्चात्त्य ‘ब्लड मून’ म्हणतात. गेल्या वर्षी या तिन्ही गोष्टी एकाच पौर्णिमेला जुळून आल्या होत्या.

पुढच्या काळात ‘ब्लू मून’चे कदाचित दोन अर्थ मुलांना समजतील. एक आधी वर्णन केलेला पारंपरिक अर्थ आणि दुसरं म्हणजे ‘ब्लू मून’ हे महत्त्वाकांक्षी चांद्रयान.

ऍमेझॉन कंपनीच्या बेझॉस यांची ही संकल्पना आहे. ‘ब्लू ओरिजिन’तर्फे ‘न्यू शेफर्ड सबऑर्बिटल रॉकेट’द्वारे ‘ब्लू मून’ हे चंद्रावर सामानसुमान आणि नंतर माणसंही नेऊ शकणारं एक यान बनवलं असून या रोबॉटिक अंतराळयानाचं नाव ‘ब्लू मून’ हे त्याच्यावर कोरलं आहे.

अमेरिकन स्पेस एजन्सी असलेल्या ‘नॅशनल एअरॉनॉटिक ऍण्ड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन’ किंवा लोकप्रिय ‘नासा’ नावाने प्रसिद्ध असलेल्या संस्थेलाही चंद्रावर माणूस पाठवण्याचा ध्यास लागलेला आहेच. आजवर अमेरिकेने पाच वेळा चंद्रावर माणसं पाठवली. पृथ्वीच्या या नैसर्गिक उपग्रहावर माणसं धाडणारा अमेरिका हा आतापर्यंतचा तरी जगातला एकमेव देश आहे. त्यामुळे त्याच देशात सर्वांसाठी चांद्रवारी, चांद्र वसाहती वगैरे कल्पनांना धुमारे फुटले तर आश्चर्य नाही.

इलॉन मस्क नावाचे महत्त्वाकांक्षी उद्योजक तर अथक प्रयत्न करून चंद्रच काय, पण मंगळावरही माणसं पाठवण्याचे बेत आखतायत. भरपूर पैसे खर्चून किमान अंतराळात फेरी मारून आणण्याचं पर्यटन हा त्याचा पहिला टप्पा असेल. यापूर्वी काहींनी तो अनुभव घेतलाय. आता या मस्क यांच्या ‘स्पेस एक्स’च्या स्पर्धेत इतरही धनाढय़ व्यावसायिक उतरतील असं दिसतंय.

त्याचाच एक भाग म्हणजे ‘ब्लू मून’ यान, जे चंद्रावर साडेचार हजार किलो वजनापर्यंतची सामग्री नेऊ शकेल. ‘नासा’चे रोव्हर किंवा आणखी कुठल्या स्पेस एजन्सीची चांद्र वाहनं चंद्रावर उतरवू शकेल. सरळ (व्हर्टिकल) पद्धतीने उड्डाण आणि अवतरण करण्याची क्षमता असलेलं ‘ब्लू मून’ प्रवाशांची, सामानांची ने-आण करणारं उत्तम वाहन ठरेल. त्यांच्या या प्रकल्पाला अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांचाही पाठिंबा असेल. कारण 2024 पर्यंत पुन्हा एकदा चंद्रावर माणूस पाठवण्यात त्यांना रस आहे.

‘नासा’ने ‘ब्लू ओरिजिन’ची ही ऑफर स्वीकारलीय की नाही ते ठाऊक नाही, परंतु जगभरच्या धनवंत व्यापारी कंपन्या जशा एकेकाळी प्रचंड बोटी आणि विमान, रेल्वे, मोटारी वगैरे दळणवळण क्षेत्रात उतरल्या तसंच पुढेही घडणार. फक्त हे दळणवळण पृथ्वीबाहेरचं असेल. ‘इन्टरप्लॅनेटरी’ पर्यटन अशक्य नसल्याने आज ना उद्या हे होणारच, पण चंद्र आणि मंगळ एवढीच त्याची मजल असेल. त्यापुढच्या ग्रहांवर ‘उतरणं’ अशक्य. गुरूच्या किंवा शनीच्या चंद्रांपैकी कोणत्या तरी भूभागावर अंतराळयानातून माणसाला न्यायची कल्पना प्रत्यक्षात येणं कठीण आहे. अर्थात तशी इच्छा धरायला हरकत नाही. त्यामुळे आपण केवळ ‘ग्लोबलाइज’ नव्हे तर ‘युनिव्हर्सलाइज’ होऊ.

… तिथे जाऊन मात्र आपण आपल्या पृथ्वीची प्रदूषणाने हेळसांड केली, तशी न केली म्हणजे मिळवली. नाहीतर आज ‘एव्हरेस्ट’वर प्लॅस्टिकचा कचरा दिसतोय, उद्या चंद्रावर दिसेल. तसं न घडण्याची काळजी यानातल्या (संभाव्य) पर्यटकांनीच घ्यायची आहे.

आपली प्रतिक्रिया द्या