
>> तृप्ती कुलकर्णी
‘पत्र’ म्हणजे मौनातला संवाद! ज्यात भावना केवळ शब्दांतून नव्हे, तर ओळींच्या आडून उमलतात…याची प्रचीती देणारी ‘त्सुबाकी स्टेशनर्स’ ही जपानी लेखिका इतो ओगावा लिखित, मयुरेश कुलकर्णी अनुवादित आणि सुनंदा महाजन प्रकाशित पावणेचारशे पानांची पत्रलेखन कलेबाबतची अप्रतिम कादंबरी.
पत्रलेखन कला आता कालबाह्य असली तरीही जवळपास हजारो वर्षे संवादाचं सर्वमान्य, प्रचलित असणारं ते एकमेव माध्यम. त्यामुळे इतर कथानकांत ते आढळलं तरी यातलं त्याचं ‘विशेष स्थान’ इतरत्र दिसणं अपवादात्मकच. कादंबरीतलं मुख्य पात्र ‘पत्र’च असल्याने पत्रलेखन केंद्रस्थानी आहे आणि उपपात्रं म्हणजे पत्रलेखिका हातोको आमेमिया ऊर्फ पोप्पोचान व तिचं त्सुबाकी स्टेशनर्स हे दुकान. पत्राच्या निमित्ताने पोप्पोचानला भेटणारी, आपापल्या परीने रंगत आणणारी मंडळी सर्वसाधारण पात्रं होय.
आजीच्या मृत्युपश्चात परदेशातून जपानमधल्या आपल्या ‘कामाकुरा’ गावी परतलेली पोप्पोचान जेव्हा आजीचा परंपरागत पत्रलेखनाचा व्यवसाय स्वीकारते, तेव्हा तिला येणाऱया अनुभवांचं रसाळ कथन म्हणजे ही कादंबरी. यातली विविध पात्रं, त्यांचे नातेसंबंध, पत्रलेखनामागची त्यांची भूमिका या सगळ्याच गोष्टी वाचकाला अचंबित करणाऱया. मोबाइल, मेसेजेसच्या काळातसुद्धा आपल्या तरलतम, सूक्ष्म भावना या पत्राद्वारे समोरच्याला कशा सांगाव्यात याचा सर्वोत्तम नमुना म्हणजे हे पत्रलेखन.
सामान्य भारतीयांसाठी पोस्टकार्ड, आंतरदेशीय कार्ड, फार तर साध्या कागदावर लिहून लखोटय़ातून पाठवणे हे पत्रलेखनाचे माहितीतले प्रकार, परंतु इथे मात्र मजकूर, त्याचा आशय, तो काय कारणानं लिहायचा आहे, लिहिणारी (अप्रत्यक्ष) व्यक्ती, पत्र वाचणाऱयाचं व्यक्तिमत्त्व या सगळ्याचा विचार करून त्यानुसार पत्राची शाई, निब, पेन, कागद, वेळ अशा गोष्टी निवडल्या जातात. इतकंच नव्हे, तर पत्र पोस्ट करताना त्यावरचा शिक्का, तो चिकटवण्याचं साधन, लखोटा, तो बंद करण्याची पद्धत यांचेदेखील सांकेतिक अर्थ असून त्याला संवादामध्ये (बिटविन द लाइन्समध्ये) अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणजे ‘पत्रलेखन’ ही जपानीयांसाठी महत्त्वपूर्ण घटना आहे. एवढंच नव्हे, तर त्सुबाकी स्टेशनर्स उघडण्यापूर्वी पत्रांच्या समाधीस्थळावर (अंगणातला खडक) पाणी, फुलं अर्पण करणं, तसंच साठलेली पत्रं दहन करण्याचा विशिष्ट दिवसाचा विधी असणं यातून पत्रलेखन फक्त उत्पन्नाचं साधन नसून तो धर्म आहे. त्यातल्या भावनाभिव्यक्ती इतकंच त्याच्या प्रगटीकरणातली सामाजिक नैतिकता, विश्वासार्हता जपणं महत्त्वाचं आहे.
जसं सांत्वनपर पत्रलेखनावेळी शाईची वडी नेहमीच्या विरुद्ध बाजूने उगाळणे, तिचा रंग राखाडी ठेवणे (अश्रूंमुळे शाई फिकी होते) ‘पुन्हा, अखेर, शेवटी’ असे मृत्यूसंबंधित शब्द तसेच ता.क. टाळणे इ. भरपूर नियमावली आहे. विविध भावनांभिव्यक्तीसाठी अशाच नियमावली आहेत. प्रसंगानुरूप विशिष्ट प्रकारचे, रंगाचे, जाडीचे, पोताचे कागद वापरणं, सूर्यास्तानंतर पत्र न लिहिणं इत्यादी विस्मयकारक गोष्टीही आहेत. श्रद्धा-अंधश्रद्धा इ. भावनांचं दैनंदिन व्यवहारांतलं स्थान, त्यांचा मानवी संबंधांवरचा परिणामही आहे. पत्रलेखनासाठी आलेल्या व्यक्तीला चहापान देणं हा अलिखित प्रघात आणि त्यातून पत्रलेखिकेशी तिचे जुळलेले सूर, मनमोकळा संवाद ही गोष्ट विशेष उल्लेखनीय वाटते. यातल्या पात्रांसाठी पत्रलेखनासाठीचं महत्त्व, प्रथा-परंपरांचं पालन, लोकांचं एकमेकांप्रति व्यक्तिगत जीवनाचा आदर ठेवून सामाजिकता जपणं, नैसर्गिक स्वभावधर्मानुसार आनंदाला महत्त्व देत निवांत जगणं यामुळे ईकिगाई जीवनपद्धतीच आठवते. आजीच्या मृत्युपश्चात एकाकी पोप्पोचानला कसे नवे मित्र-मैत्रिणी मिळतात आणि त्यातूनच तिचा परिवार कसा बहरत जातो हे यातलं उपकथानकही तितकंच रंजक आहे. कामाकुरातील शांत, सौहार्दपूर्ण जीवन, ऋतूंचं मोहक वर्णन, मंदिरातल्या पद्धती एक वेगळंच भावविश्व.
विशेष म्हणजे मयुरेश कुलकर्णींनी बऱयाच पत्रांचं स्वत लेखन करून ती छापल्याने विशिष्ट भावना दर्शवणाऱया विविध अक्षरांतल्या पत्रांमध्ये आपण गुंततो आणि ती पत्रं जणू जिवंत पात्रंच भासतात. याचं चंद्रमोहन कुलकर्णींनी साकारलेलं मुखपृष्ठ उल्लेखनीय! पोप्पोचानच्या घराबाहेरचा पवित्र कामासाठीचा पवित्र त्सुबाकी वृक्ष, फॉन्टऐवजी हस्ताक्षरातलं शीर्षक, वातावरणाचं प्रतीक पांढराशुभ्र ढग, तर संवादाचं प्रतीक असलेला पत्रासह उडणारा निळा, जांभळा पक्षी आणि लाल रंगाची ठाशीव अशी प्रमुखत्व अधोरेखित करणारी उभी पत्रपेटी. हे सारं पाहता पत्रलेखन, स्टेशनरी दुकान यांच्या माध्यमातून साकारलेला मानवी भावभावनांचा हृदयस्पर्शी लेखन प्रवास पुनपुन्हा अनुभवावासा वाटतो.
त्सुबाकी स्टेशनर्स
मूळ लेखक ः इतो ओगावा
भाषांतर ः मयुरेश कुलकर्णी
प्रकाशक ः सुनंदा महाजन, कलासक्त पुणे



























































