ऑपरेशन सनराईज : एक यशस्वी कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> ब्रिगेडीयर हेमंत महाजन

ऑपरेशन सनराईज नक्कीच यशस्वी मानायला हवे. आपण म्यानमारच्या सैन्याबरोबर अशा प्रकारची जॉइंट ऑपरेशन आणखी करायला हवीत. ईशान्य हिंदुस्थानच्या जाती आणि जमाती या नागा असो की मणिपुरी त्या उत्कृष्ट लढवय्या आहेत. यामुळे जर चीनने ईशान्य हिंदुस्थानात पुन्हा बंडखोरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर तो आपल्याकरिता धोकादायक ठरू शकतो, कारण हिंदुस्थानातील सर्वात पहिली बंडखोरी ही नागालँडमध्ये 60च्या दशकात सुरू झाली होती.

हिंदुस्थानी सैन्याने तिसरा सर्जिकल स्ट्राईक म्यानमारमध्ये केला ही बातमी 15 मार्चला मीडियात प्रसिद्ध झाली. खरं म्हटलं तर हा सर्जिकल स्ट्राईक नव्हता. याचे नाव होते ऑपरेशन सनराईज. हे ऑपरेशन हिंदुस्थान आणि म्यानमार त्यांच्या सैन्याने एकत्र 17 फेब्रुवारीपासून 2 मार्च या कालावधीत केले होते. उद्देश होता की, हिंदुस्थान-म्यानमार सीमेवर आणि म्यानमारच्या आत जे दहशतवादी गट कार्यरत आहेत त्यांना नष्ट करणे.

हिंदुस्थान आणि म्यानमार यांच्यात सुरू असलेले कलादान मल्टिमोडल ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट हिंदुस्थानातले कोलकाता बंदर आणि म्यानमारमधील सितवे बंदर जोडते. या रस्त्याला असलेला दहशतवादी गटांचा धोका कमी करणे हा ऑपरेशनचा एक उद्देश होता. हा रस्ता आणि सितवे बंदरामुळे मिझोराम आणि कोलकाता यामधील अंतर 1000 किलोमीटरने कमी होईल, ज्यामुळे मिझोरामची आर्थिक प्रगती वेगाने होईल. गुप्तहेर खात्याच्या माहितीप्रमाणे अनेक दहशतवादी गट आणि त्यांना मदत करणारी आराकान आर्मी, काचीन इंडिपेंडंट आर्मी या रस्त्यावर दहशतवादी हल्ले करणार आहे. त्यांना हिंदुस्थानात असलेले काही दहशतवादी मदत करणार होते. या सगळ्यांना हल्ले करण्यास चीनच्या गुप्तहेर संस्था भाग पाडत आहे.

या दहशतवाद्यांना बरबाद करण्याकरिता हिंदुस्थानच्या बाजूने हिंदुस्थानी पायदळाच्या आणि आसाम रायफलच्या काही बटालियननी (10,000-12,000 सैनिक) भाग घेतला. त्यांना मदत ईशान्य हिंदुस्थानात असलेल्या दोन स्पेशल फॉर्सेस बटालियननी केली. हिंदुस्थानच्या बाजूने त्यांना ड्रोन, हेलिकॉप्टर्सकडून मदत मिळाली.

याच वेळी म्यानमारमधील सैन्यसुद्धा त्यांच्या बाजूने या दहशतवादी कॅम्पवर हल्ला करत होते. म्हणूनच यात हिंदुस्थानी सैन्याला खूप मोठे यश मिळाले. यात एनएससीएन खापलांग यांचे मुख्यालय बरबाद करण्यात आले. म्यानमार सैन्याने हिंदुस्थानी बंडखोर एनएससीएन खापलांग यांच्यावर पूर्णपणे नियंत्रण केले आहे. एवढेच नव्हे तर अरुणाचल प्रदेशपासून एक हजार किलोमीटर दूर असलेल्या त्यांच्या ट्रेनिंग कॅम्पवरसुद्धा हल्ले करण्यात आले. केलेल्या हल्ल्यांना एनएससीएन बंडखोरांनी कुठलाही जबाब दिला नाही व त्यांच्या अनेक नेत्यांना पकडण्यात म्यानमार सैन्याला यश मिळाले आहे. आपल्याला माहीत असेल की, नागालँडमधले अनेक बंडखोर गट सध्या हिंदुस्थान सरकारच्या बरोबर वाटाघाटी करण्यात गुंतले आहेत आणि ते हिंसाचार करत नाहीत. मात्र एनएससीएन खापलांग गट हा अजून वाटाघाटीकरिता तयार नाही. यामुळे त्यांच्या पकडल्या जाण्याने वाटाघाटी जास्त वेगाने पुढे जाऊ शकतील.

आराकान आर्मी हा राखीन बंडखोर यांचा दहशतवादी गट आहे व त्यांची संख्या सात हजार एवढी असावी. सध्या त्यांचे प्रमुख आहेत मेजर जनरल लई जा. त्यांना काचीन इंडिपेंडंट आर्मी मदत करीत होती. आठवत असेल की, चीनने म्यानमार आणि हिंदुस्थानात असलेल्या बंडखोर आणि दहशतवादी गटांना एकत्र आणण्याकरिता नॉर्दन अलायन्स नावाची संघटना तयार केली आहे. त्यांना चीनकडून मदत मिळत आहे. चीनने त्यांच्या सीमेजवळ 3000 बंडखोरांना तयार ठेवले आहे. ऑपरेशन सनराईजमध्ये म्यानमारच्या सैन्याने उल्फा यांचा ट्रेनिंग कॅम्प जो पडती येथे आहे त्यावरसुद्धा हल्ला केला. यात उल्फाचे अनेक महत्त्वाचे नेते मारले गेले.

ईशान्य हिंदुस्थानची छोटी छोटी सात राज्ये असलेल्या या अत्यंत दुर्गम प्रदेशाला लागून बांगलादेश, म्यानमार, चीन, तिबेट, भूतान आणि नेपाळ या देशांची सीमा आहे. मौल्यवान नैसर्गिक साठे येथे विपुल प्रमाणात आहेत. विपुल नैसर्गिक वरदान लाभलेला हा प्रदेश पूर्व आशियावर सामरिक नियंत्रण ठेवण्यासाठी मोक्याचा ठरतो. मग हा प्रदेश हिंदुस्थानात असावा, असे हिंदुस्थानच्या हितशत्रूंना वाटेल काय? म्हणूनच या भागातील जनजातींमध्ये संघर्ष घडवून किंवा त्यांना हिंदुस्थानविरोधात लढायला लावून हिंदुस्थानाला कमजोर करणे किंवा शक्य झाल्यास हा प्रदेश गिळंकृत करण्याचे षडयंत्र गेली 50 वर्षे रचले जात आहे.

ऑपरेशन सनराईज नक्कीच यशस्वी मानायला हवे. आपण म्यानमारच्या सैन्याबरोबर अशा प्रकारची जॉइंट ऑपरेशन अजून जास्त वेळा का करत नाही? हीच वेळ आहे म्यानमारमध्ये असलेल्या हिंदुस्थानच्या विरुद्ध कारवाई करणाऱया दहशतवादी गटांना बरबाद करायची. चीन अशा गटांना पुन्हा एकदा एकत्रित नेतृत्वाखाली आणून त्यांना पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न करत आहे. ईशान्य हिंदुस्थानच्या जाती आणि जमाती या नागा असो की मणिपुरी त्या उत्कृष्ट लढवय्या आहेत. यामुळे जर चीनने ईशान्य हिंदुस्थानात पुन्हा बंडखोरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर तो आपल्याकरिता धोकादायक ठरू शकतो, कारण हिंदुस्थानातील सर्वात पहिली बंडखोरी ही नागालँडमध्ये 60च्या दशकात सुरू झाली होती.

हिंदुस्थानी सैन्याने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे आता हा हिंसाचार अतिशय कमी झाला आहे. परंतु याचा अर्थ तिथे सगळे शांत आहे असे नाही. आज ईशान्य हिंदुस्थानात आर्थिक क्रांती होत आहे. तिथे नवीन रस्ते, रेल्वे लाईन, विमानतळ अशा अनेक प्रगतीच्या कारवाया सुरू आहेत. जेवढे रस्ते गेल्या 70 वर्षांमध्ये या भागांमध्ये बांधले नव्हते त्याच्या पाचपट जास्त रस्ते आता तिथे बांधण्यात येत आहेत. हा भाग डोंगराळ असल्यामुळे येथे हालचाल करणे हे नेहमीच कठीण असते. रस्ते बांधल्यामुळे केवळ व्यापारच वाढेल असे नाही तर पर्यटन आणि इतर विकास कामे यांनासुद्धा वेग येऊ शकतो. परंतु यात विघ्न आणण्याचे काम चीन करत आहे.

हिंदुस्थानी लष्कराने 9 जून 2015 रोजी म्यानमार सीमा ओलांडून बंडखोरांच्या दोन छावण्या उद्ध्वस्त केल्या होत्या. यात 100हून अधिक बंडखोर मारले गेले होते. 4 जून 2015 रोजी बंडखोरांच्या एका हल्ल्यात मणिपूरमधील चंदेल भागात 18 हिंदुस्थानी जवान शहीद झाले होते. याचा बदला म्हणून लष्कराने म्यानमारमध्ये घुसून ही थेट कारवाई केली होती.

सत्तरच्या दशकात अनेक दहशतवाद्यांचे ट्रेनिंग कॅम्प चीनच्या युनान प्रांतांमध्ये होते. नव्वदच्या दशकात हे ट्रेनिंग कॅम्प चीनने बांगलादेश आणि म्यानमारमध्ये ढकलले. बांगलादेश आपला मित्र झाल्यानंतर तेथील ट्रेनिंग कॅम्प बंद करण्यात आले. हे ट्रेनिंग कॅम्प सध्या फक्त म्यानमारमध्ये आहेत. म्यानमारचा हिंदुस्थानीय सीमेजवळचा भाग हा डोंगराळ आणि जंगलांनी व्यापलेला आहे. त्यामुळे अशा प्रकारचे ट्रेनिंग कॅम्प तिथे निर्माण करणे सोपे आहे. म्हणूनच जर ईशान्य हिंदुस्थानात शांतता हवी असेल तर म्यानमार सैन्याच्या मदतीने आपण तिथे असलेल्या ट्रेनिंग कॅम्पविरुद्ध नक्कीच मोठय़ा प्रमाणात कारवाई करू शकतो.