लेख – सैन्याचे कश्मीरमधील यश

686

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन

कश्मीरमधील दहशतवादाचा स्थानिक चेहरा रियाझ नायकूला ठार करण्यात आले. त्यासाठी आपल्या सैन्याचे अभिनंदन केले पाहिजे. हंडवारा घटनेचा बदला घेतला गेला. दोन वेळा शौर्याबद्दल सेना पदक मिळवलेले कर्नल आशुतोष शर्मा आणि मेजर अनुज सूद यांनी हंडवारामधील मोहिमेत तीन दहशतवाद्यांना मारताना आपले बलिदान दिले होते.

2016 मध्ये हिज्बुलचा म्होरक्या बुरहान वानी मारला गेल्यानंतर त्या संघटनेची सूत्रे रियाझ नायकूकडे आली. बुरहानने समाजमाध्यमांचा वापर मोठय़ा प्रमाणात केला. नायकूने कश्मिरी तरुणांना चिथावण्याचे काम केले. सुरक्षा दलांशी दोन हात करून आपलीच हानी अधिक होते, हे कळून चुकल्यामुळे नायकूने अनेक सर्वसामान्य कश्मिरींना हिंदुस्थानी लष्कराचे खबरी आहेत असे सांगून क्रूरपणे मारले, त्या हत्येचे चित्रीकरण करून ती चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसृत करणे हा त्याचा आवडीचा उद्योग होता. पोलीस किंवा लष्करी जवानांचे, ते गावी सुट्टीवर आलेले असताना अपहरण करणे आणि त्यांची हत्या करणे हे प्रकारदेखील नायकूने केले. यानंतर त्याने बाहेरील राज्यांतून आलेल्या स्थलांतरितांना, मजूर, फळ व्यापारी, ट्रकचालक यांना ठार करण्याचा पायंडा पाडला.

हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या रियाझ नायकू हा `ए प्लस प्लस’ दहशतवादी होता आणि त्याला पकडण्यासाठी 12 लाखांचे बक्षीस घोषित करण्यात आले होते. हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेचा म्होरक्या यासीन यट्टू 2017 साली चकमकीत मारला गेल्यानंतर त्याची जागा नायकूने घेतली होती. हिजबुल मुजाहिद्दीन या संघटनेचा प्रभाव कश्मीर खोऱयात वाढविण्यास नायकूने मोठय़ा प्रमाणात हातभार लावला होता. खंडण्या गोळा करणे, आपल्याविरुद्ध काम करणाऱयांच्या हत्या करणे याबद्दल तो कुख्य़ात होता.

नायकूला हा हिंदुस्थानी सैन्याने ठार केल्याचे कळताच हिजबुल मुजाहिद्दीनम्ध्ये खळबळ माजली. हिजबुल मुजाहिद्दीनचा प्रमुख सय्यद सलाहुद्दिन याने नायकूच्या हत्येनंतर सर्व काश्मीर बेचिराख करण्याची धमकी दिली आहे. अतिरेक्यांच्या धमक्यांना कोणी घाबरत नाही. दहशतवादी कारवाया करणाऱयांना जशास तसे उत्तर देऊन त्या संघटनांचे कंबरडे मोडण्याचे प्रयत्न सैन्य करित आहे. रियाझ नायकू याची हत्या हा त्या कारवाईचा एक भाग आहे. गेल्या जानेवारीपासून काश्मीरमध्ये 80 अतिरेकी मारले गेले आहे. याची किंमत सैन्याने 25 सैनिकांच्या बलिदानाने दिली आहे.

नायकूचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांकडे न सोपवण्याचा निर्णय घेतला गेला. लष्कराने आणि केंद्र सरकारने नायकूच्या निमित्ताने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला. नायकूचा मृतदेव त्याच्या नातेवाईकांकडे सोपविण्यात आला नाही. तसेच इथून पुढे चकमकीत मारल्या गेलेल्यांची नावेही जाहीर न करण्याचा निर्णय लष्कराने घेतला आहे. दोन्ही निर्णय स्तुत्य आहेत. मारलेल्या दहशतवाद्यांचे अंतिम क्रियाकर्म हा कश्मीर खोऱयामध्ये एक मोठा कार्यक्रम बनायचा. हजारोंच्या संख्येने आजूबाजूच्या गावातील नागरिकांना तिथे जाण्यास भाग पाडले जायचे. या दहशतवाद्याची खूप स्तुती करून त्याला एक आजादी करता लढणारा योद्धा म्हणून गौरविले जायचे. या सगळ्यामुळे अनेक नवीन कश्मिरी युवकांना दहशतवादी संघटनांत सामील व्हायची प्रेरणा मिळायची. म्हणून यापुढे त्यांचे दहशतवाद्यांचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांकडे दिले जाणार नाहीत आणि मारलेल्या दहशतवाद्यांची नावेसुद्धा घोषित केली जाणार नाहीत.

सध्या दहशतवाद हा आता फक्त कश्मीर खोऱयामध्ये आहे. तिथे असलेले कश्मिरी दहशतवादी फारसे उपयुक्त नाही, म्हणून कडवे अफगाणी आणि पाकिस्तानी दहशतवादी कश्मीर खोऱयामध्ये घुसवत आहे. हंडवारा मोहिमेमधील दहशतवादी हे पाकिस्तानी सैन्याचे कमांडो होते, त्यांना पाकिस्तानी सैन्याने दहशतवाद वाढवण्याकरता पाठवले होते.

संपूर्ण देशाप्रमाणे कश्मीरमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव झाला असतानाच तेथील सुरक्षा दलांना कोरोनाबरोबरच दहशतवाद्यांना तोंड द्यावे लागत आहे. अजून तिथे 150-200 दहशतवादी कार्यरत आहेत.कोरोनाचा कहर चालू असूनही पाकिस्तान जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांना चिथावणी देत आहे. पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवरील शस्त्रसंधीचे उल्लंघन आणि जम्मू-कश्मीरमध्ये घुसखोरी व दहशतवादी हल्ल्यांच्या सातत्याने वाढणाऱया घटना यातून हे स्पष्ट होते की, पाकिस्तान पुन्हा एकदा आपल्या मूळ स्वभावानुसार वागत आहे.

कश्मीरविषयक महत्वाची एक घडामोड म्हणजे पाकव्याप्त कश्मीर (मुझफ्फराबाद जिल्हा) आणि गिलगिट-बाल्टिस्तान येथील हवामान अंदाज आणि वृत्तही हिंदुस्थानच्या हवामान विभागातर्फे (आयएमडी) प्रसृत केले जाणार आहे. गिलगिट-बाल्टिस्तान भागात निवडणुका घेण्यास पाकिस्तानी सर्वोच्च न्यायालयाने तेथील सरकारला दिलेल्या परवानगीचा हा प्रतिसाद आहे. हिंदुस्थानी नकाशात हे दोन्ही प्रदेश हिंदुस्थानचा भूभाग म्हणून दाखवले जातात. आता तेथील हवामान अंदाज जाहीर करताना त्यांची दखल घेणे हे आपल्या प्रदीर्घ आणि संसदेचे अधि…ान लाभलेल्या धोरणाशी सुसंगतच आहे.

सातत्याने वाढणाऱया दहशतवादी घटनांशी पाक सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे गहन अंतर्गत संबंध आहेत आणि हे संबंध पाकिस्तानच्या गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये निवडणुका घेण्याच्या अवैध षडयंत्राशीदेखील जोडलेले असू शकतात. सदर प्रदेशाला आपल्या वैध अधिकारात घेण्यासाठी पाकिस्तानवर चीनचा मोठा दबाव आहे. कारण चीनने याच भागातून जाणाऱया `सीपेक’सारख्या योजनेत अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केलेली आहे. हिंदुस्थान सरकार गिलगिट-बाल्टिस्तानवरील आपल्या कायदेशीर अधिकारांची मांडणी जागतिक मंचावर सातत्याने करत आहे. परिणामी, चीन व पाकिस्तान या दोन्ही देशांवर मोठा आंतरराष्ट्रीय दबावदेखील आहे.

रियाझ नायकू याच्या हत्येनंतर केरळमध्ये जमात-ए-इस्लामी या संघटनेशी संबंधित असलेल्या एका नजी मेहरादाद तरुणाने ‘आमचे काश्मिरी तरुण चोवीस तासांच्या आत या हत्येचा बदला घेतील’, अशी प्रतिक्रिया फेसबुक पेजवर पोस्ट केली. त्याच्याविरुद्ध देशद्रोहाच्या आरोपांखाली खटला भरण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. पण दुसरीकडे त्याच्या त्या कृतीचे समर्थनही करणारेही आपल्या देशातच आहेत. डाव्या आणि इस्लामी जिहादी विचारांचा प्रभाव केरळच्या काही भागात वाढत चालला असल्यानेच काही देशद्रोही तरुण रियाझ नायकूची बाजू घेताना दिसत आहेत. अशा प्रवृतींना, मग त्या काश्मीरमधील असोत वा केरळमधील, त्यांना नष्ट केले पाहिजे.

आपली प्रतिक्रिया द्या