
हिंदुस्थानची अर्थव्यवस्था 2025 पर्यंत 5 ट्रिलियनपर्यंत नेण्याची महत्वाकांक्षा आहे. आपली ही महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी काही ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. प्रत्येक अर्थसंकल्प हा त्या ध्येयाकडे पोहोचण्यासाठीचा महत्वाचा टप्पा असेल. देशाचा जीडीपी दुहेरी अंकात वाढण्याची नजीकच्या भविष्यात अपेक्षा आहे.या अर्थसंकल्पाबाबत ह्युमन कॅपिटल मॅनेजमेन्ट (एचसीएम), जनरल अफेयर्स, सीएसआर अँड कॉर्पोरेट कम्युनिकेशन वेलस्पन ग्रुपचे ग्रुप डायरेक्टर कौस्तुभ सोनलकर यांनी काही सूचना करत आपल्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत.
जागतिक पातळीवर चीनवरील विश्वासाला ठेस पोहोचल्यामुळे आपल्या देशाला ह्याचा नक्कीच फायदा होईल व त्यामुळे उत्पादन क्षेत्रात आपल्याला आधाडीचे स्थान मिळेल. एमएसएमई सेक्टर हे या अर्थव्यवस्थेचा अतिशय मोठा घटक ठरणार आहे. या सेक्टरकडून 3 ट्रिलियन डॉलरचे योगदान अपेक्षित आहे. या सेक्टरला प्रोत्साहन देण्यासाठी काही निश्चित पावले उचलणे गरजेचे ठरणार आहे जसे सर्व परवानग्या, सुविधा, कर्ज, जमीन तत्परतेने प्राप्त करुन देणे. त्याचप्रमाणे सिंगल विंडो क्लिअरन्स सुविधा देणेही गरजेचे आहे.
शैक्षणिक पात्रता व कुशल कामगार ही आर्थिक प्रगतीचा कणा आहे. हे कसब वा शिक्षण प्राप्त करण्यासाठी विशेष सोयी सवलतींची तरतूद अर्थसंकल्पात होणे गरजेचे आहे. या सोयी-सवलती देताना महिला, तृतीयपंथी व शारीरीक दृष्टया विकलांग असणाऱ्या लोकांचा समावेश होणे गरजेचे आहे.
हिंदुस्थान हा कृषीप्रधान देश आहे. शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सवलतींमध्ये वाढ करणे गरजेचे आहे. यामधील त्यांना देण्यात येणारे कर्ज व त्यावरील व्याज हयाबाबत विचार केला गेला पाहिजे, असे झाले तर आपला देश हा नक्कीच जगातील सर्वात मोठा अन्नधान्यपुरवठा करणारा देश ठरेल.
देशाला जगातील सर्वात अग्रेसर अर्थव्यवस्था बनविण्यासाठी या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांकडे लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. त्यात रस्ते, रेल्वे, पाणी, वीज इत्यांदीचा समावेश आहे. आपल्या देशाची जगातील सर्वात मोठी महासत्ता बनण्याची क्षमता आहे. आपण सर्वच बाबतीत सक्षम आहोत. या सर्व अपेक्षांची पूर्तता झाल्यास हा 2021-22 चा अर्थसंकल्प आपले 5 ट्रिलियन डॉलरचे स्वप्न साकारण्यास नक्कीच पुढचे पाऊल ठरेल, असे सोनलकर म्हणाले.
























































