स्वयंपाकघर- व्यवसाय हेच व्यसन

>>तुषार प्रीती देशमुख

कोकणातले सुप्रसिद्ध ओले काजू हे मे व जून महिन्यातच मिळायचे. त्याची भाजी खाण्याची लज्जत वेगळीच असते. एकदा का ऋतू निघून गेला की, ओले काजू खाण्यासाठी पुन्हा वर्षभर थांबावे लागत असे. अस्सल खवय्यांसाठी ही प्रतीक्षा अत्यंत वेदनादायक असायची. जर कधी ओल्या काजूची भाजी, उसळ, पुलाव वगैरे खाण्याची इच्छा झाली तर, आमच्याकडे दर्जेदार ओले काजू बाराही महिने उपलब्ध आहेत असे सांगणारे दादर पश्चिम, छत्रपती शिवाजी मंदिर नाटय़गृह येथील नेहा कलेक्शन या दुकानाच्या बाहेर गेली 51 वर्षे ओला काजू व कोकमाचा व्यवसाय करणारे 78 वर्षीय मनोहर साळवी काका यांच्याकडे जा. ते सदैव आपल्या सेवेत हजर असतात.

दत्तात्रय आत्माराम साळवी यांनी त्यांचा कोकणातील मित्र बांदेकर, ज्यांचा कोकणात काजूचा कारखाना होता, त्यांच्या सांगण्यावरून ओला काजू मुंबईकरांना उपलब्ध करून देण्यासाठीचा व्यवसाय करण्याचे सुचविले. त्याप्रमाणे दत्तात्रय साळवी यांनी दादर येथील गिरगाव पंच डेपो या दुकानाच्या बाहेर 1972 साली ओला काजू विक्रीचा व्यवसाय सुरू केला. व्यवसायाची व्याप्ती वाढायला वेळ लागलाच नाही. कारण गिऱहाईकांची तितकीच ओल्या काजूला मागणी होती. दत्तात्रय दादांना त्यांचा मुलगा भालचंद्र साळवी यांनी त्यांच्या व्यवसायाच्या सुरुवातीपासूनच मोलाची साथ दिली. तेव्हा त्यांचा दुसरा मुलगा मनोहर दिवसभर रोजंदारीवर नोकरी करून दिवसाला दोन रुपये कमावून माहीम येथील सरस्वती हायस्कूलमधे रात्रीचे शालेय शिक्षण घेत होता. शिक्षण पूर्ण होताच वडिलांनी मनोहरलादेखील स्वतंत्र काजू विक्रीचा व्यवसाय करण्यासाठी प्रेरित केले. मनोहर साळवी यांनी वेगवेगळ्या बारा ठिकाणी छोटय़ा छोटय़ा नोकऱया केल्या आणि 1974 साली आपल्या स्वतच्या व्यवसायाचा श्रीगणेशा केला.

त्या वेळी दर्जेदार ओला काजू 100 रुपये प्रतिकिलो या किमतीने विकला जायचा. तसेच ओला काजू मे-जून महिन्यातच उपलब्ध व्हायचा. त्यामुळे ते मोसमाच्या महिन्यातच खावेत असे अनेकांचे म्हणणे असायचे, पण मनोहरकाकांनी ते योग्य पद्धतीने कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवून बाराही महिने दर्जेदार ओले उपलब्ध व्हावेत या हेतूने त्यांनी अभ्यासपूर्ण व शास्त्रोक्त पद्धतीने ओल्या काजूची साठवण केली. मुख्यतः कारवारी, मालवणी व अशा अनेकांकडे लग्नकार्य असो वा सणवार, ओल्या काजूची उसळ ही असलीच पाहिजे. त्यामुळे मनोहर काकांना ओल्या काजूची मागणी ही नेहमीच असायची. टपोरा दर्जेदार ओला काजू त्यांच्याकडे मिळत असल्यामुळे थेट पुणे, नाशिक, औरंगाबादहून मुंबईला काजू खरेदी करण्यास लोक यायचे व यानिमित्ताने मुंबईदेखील फिरायचे.

मनोहर काकांचे संपूर्ण कुटुंब त्यांची बायको सुजाताई, मुलगा अमित व मुलगी अश्विनी हे सगळे जण त्यांच्या या व्यवसायाला मदत करायचे. या एकमेव व्यवसायावर मनोहर काकांनी त्यांच्या दोन्ही मुलांचे शिक्षण व संसाराची आर्थिक जबाबदारी सांभाळली. साळवी काकांनी एकही दिवस त्यांचा व्यवसाय बंद ठेवला नाही. ते म्हणतात, ‘भारत बंद’ असायचा तेव्हाच फक्त माझ्या व्यवसायाला सुट्टी आणि त्यामुळेच माझे गिऱहाईक नेहमीच आनंदी असायचे. भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या चर्चगेट येथील मुख्यालयामधील आयुर्विम्याच्या निवृत्त कामगारांनी समाजाच्या प्रति ऋण फेडण्यासाठी एकही पैसा न घेता अंध, मूकबधिर, अपंग व्यक्तींना आर्थिक मदत होण्यासाठी मुख्यालयात घरात लागणाऱया वस्तूंच्या विक्रीचे दुकान सुरू केले होते. ज्यात साळवी काकांना सुका मेवा, ओले काजू व कोकम विक्री करण्यासाठी संधी मिळाली. घाऊक  किमतीत दर्जेदार वस्तू वेळोवेळी उपलब्ध करून, मिळालेल्या सुवर्णसंधीचे सोने करून, गेली 27 वर्षे ते व्यवसायाच्या संदर्भात त्यांच्याशी जोडले गेले आहेत.

मनोहर काकांची व्यावसायिक भागदौड वेगाने चालू होती. त्यात त्यांची बायको सुजाताई यांचे निधन झाले. छोटय़ाशा घरात बायकोने सांभाळलेला संसार मुलांची जबाबदारी आता सर्व काही मनोहर काकांना सांभाळायचे होते. त्यांनी ते यशस्वीरीत्या बायकोच्या प्रेमापोटी निभावून नेले. मुलीचे लग्न करून दिले, मुलगी अश्विनी जैन हिला दोन मुले झाली, मनोहर काका नातवंडांमध्ये रमू लागले. कालांतराने मुलाचेदेखील लग्न करून दिले. जागा अगदी छोटी असल्याकारणाने त्यांनीच मुलाला वेगळा राहण्याचा सल्ला दिला. अमित साळवीलादेखील दोन मुलं आहेत. अधूनमधून वडिलांना भेटायला मुलगा, सून व दोन्ही नातवंडे येत असतात. अमितचा वडिलांना दिवसातून एकदा फोन असतोच. तो वडिलांना नेहमी म्हणतो, “आता बस्स झालं. आता विश्रांती घ्या. देवाने आपल्याला सर्व काही दिलं आहे’’, पण काकांचं म्हणणं हेच आहे, “जोपर्यंत मी हा व्यवसाय करतोय तोपर्यंत मी धडधाकट आहे. कारण हा व्यवसाय माझ्या जगण्याची ऊर्जा आहे. शरीर साथ देत आहे तोपर्यंत व्यवसाय करणार. एकदा का शरीराने थांब सांगितलं की, मग बघू.’’ हीच खरी मनोहर काकांची त्यांच्या व्यवसायापोटी असलेली नितांत श्रद्धा.

व्यवसायासाठी मदतनीस म्हणून चंद्रकांत महाडिक यांची साथ लाभली. आज गेली 40 वर्षे चंद्रकांत दादा आणि मनोहर काका एकत्र राहत आहेत, मदतनीस म्हणून लाभलेले चंद्रकांत महाडिक आज मनोहर काकांचे मित्र तर आहेत, पण त्याहीपेक्षा सख्ख्या भावापेक्षाही त्या दोघांचे घट्ट नाते आहे.

आजही वयाच्या 78 व्या वर्षी सकाळी लवकर उठून शिवाजी पार्कला फेऱया मारून, जलतरण तलावात पोहण्याचा आनंद लुटत असतात. मग चहा पिण्यासाठी मित्रमंडळींची  मैफल जमते. ज्यात वेगवेगळ्या क्षेत्रांतले, वयाचे बंधन नसलेले, असा त्यांचा सुखदुःखांमध्ये सामील होणारा मायेच्या मित्रपरिवाराशी गप्पाटप्पा होतात. मग ते घरी जाऊन थोडा आराम करतात. जेवून थोडीशी वामकुक्षी घेतल्यानंतर ते त्यांच्या व्यवसायाच्या जागी रुजू होतात. तरुणांना लाज वाटेल अशी व्यवसायात मेहनत घेऊन होतकरू तरुणांना ते व्यवसायाचे मार्गदर्शनदेखील देतात.

मनोहर काकांनादेखील ओल्या काजूची भाजी अत्यंत प्रिय. ते त्यांच्या सर्व मित्रांसाठी ओल्या काजूच्या भाजीची वर्षातून एक-दोन वेळा पार्टीदेखील ठेवतात. काहीजण तीच भाजी भाजणीच्या वडय़ाबरोबर खातात तर काही जण चपातीबरोबर, काही जण भाकरीबरोबर तर काही जण गरमागरम भाताबरोबर त्याचा आस्वाद घेतात.

मनोहर काकांचा व्यवसाय असलेल्या ठिकाणचे फेरीवाले, दुकानदार हे त्यांचे कुटुंबीयच आहेत. काका म्हणतात, “मला कोणतेही व्यसन नाही. व्यवसाय हेच माझं व्यसन. त्यामुळे इतर कोणतेही व्यसन नसेल तर पैसा नक्कीच टिकतो आणि व्यवसाय वाढतो.’’

ओल्या काजूत असलेला प्रेमाचा ओलावा मनोहर साळवी काकांच्या व त्यांच्यासारख्या अनेक व्यावसायिकांना त्यांच्या आयुष्यात सदैव सुख, आनंद देत राहो व त्यांना पुढील अनेक वर्षे यशस्वी व्यवसाय करण्यासाठी निरोगी आयुष्य लाभो. मनोहर साळवी काकांच्या जिद्दीला, मेहनतीला मानाचा मुजरा!

 [email protected]