
>> प्रतीक राजूरकर
धर्म कोणताही असो. मृत्यूची शाश्वतता सगळेच मान्य करतात. प्रत्येक धर्मानुसार अंत्यविधींची विशिष्ट जागा असते. अख्रचं विसाव्याचं स्थान असलेली स्मशानभूमी ही काही पर्यटनाची जागा असू शकत नाही. स्मशानभूमीत जाणं ही कल्पनाही काटा आणणारी. गूढ वाटणाऱया, अनामिक भीती दर्शवणाऱया या स्मशानभूमीचं आगळं सौंदर्य काही छायाचित्रकार आणि लेखकांनी टिपलं आहे. जगातील अशाच काही वैशिष्टय़पूर्ण स्मशानभूमीची माहिती देणारा हा लेख.
स्मशान ही पर्यटनाची जागा असू शकते का? या स्मशान शांतता पसरविणाऱया प्रश्नाला सॅनफ्रान्सिस्को येथील लॉरेन ऱहोडस या लेखिकेने आपल्या लेखणी आणि छायाचित्रातून स्मशानांचे सौंदर्य दाखवून उत्तर दिलेले आहे. Cemetarytravel.com ह्या संकेस्थळावर त्यांनी भेट दिलेल्या विविध देशांतील अनेक स्मशानभूमींबाबत विस्तृत लिखाण केले आहे. १९९ Cemetries You should visit before You die या नावाने त्यांनी लिहिलेले पुस्तकसुध्दा प्रकाशित आहे. त्या १९९९ पासून स्मशानभूमी अभ्यासक संघटनेच्या सदस्य म्हणून कार्यरत आहेत. पुढे याच विषयाशी निगडित असलेल्या Association of Graveyard Rabbits सोबत त्यांचा संबंध आला. वास्तविक एका कवीने पाश्चात्त्य देशातील अंधश्रध्दा असलेला स्मशानातील सशाचे तिथे पुरलेल्या मृतकांसोबतच्या जिव्हाळय़ाच्या नात्यावर काव्यपंक्ती रचल्या, त्या सशाच्या नावे ही संघटना कार्यरत आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक साप्ताहिकांसोबत त्या संलग्न आहेत आणि या विषयावर जगभर त्या भ्रमण करत असतात. अनेक माध्यमांनी त्यांच्या कार्याची दखल घेऊन निवडक स्मशानभूमींचे ऐतिहासिक, नैसर्गिक सौंदर्य, वास्तुशिल्प, भौगोलिक इत्यादी माहिती प्रकाशित केली आहे.
लंडन येथील हायगेट स्मशानभूमी :
लंडन येथील प्रेक्षणीय स्थळांपैकी एक असलेल्या या स्मशानभूमीतील हिरवळ आणि घनदाट वनराई लंडनच्या निसर्गसौंदर्यात भर घालणारी आहे. म्हणून अनेक नागरिक इथे सहलीसाठी जातात. इथल्या पक्ष्यांच्या प्रजाती आणि त्यांच्या कोकिळा गाण्यांसाठी प्रसिद्ध. अर्थात, सात वर्षांखालील मुलांना इथे प्रवेश निषिद्ध आहे. इथे भेट द्यायची असल्यास मार्गदर्शक (गाईड) सोबत नेणे अनिवार्य आहे. इजिप्शियन वास्तुशिल्पांचे विविध प्रकार इथे बघावयास मिळतात. प्रसिद्ध तत्त्वज्ञनी कार्ल मार्क्स इथे चिरनिद्रेत विसावले आहेत. आजवर १ लाख ७० हजार मृतक इथल्या भूमीत विसावा घेत आहेत हे या स्मशानभूमीचे वैशिष्टय़ आहे.
नेपच्यून मेमोरियल रीफ की बिस्कायन, अमेरिकाः
जगातील सर्व स्मशानभूमीहून वेगळे ४० फुट समुद्राखालचे एकमेव मानवनिर्मित १६ एकर परिसरात विस्तारलेले स्मशान आणि येथील वास्तुशिल्प हे येथील अजून एक वैशिष्टय़ आहे. या स्मशानभूमीची अवस्था हरवलेल्या शहरासारखी आहे. इथे बोटीने जाऊन स्कूबा डायव्हर्सच्या मदतीने पाण्याखाली जाता येते अथवा डुबकी मारण्याचे प्रशिक्षण असल्यास प्रमाणपत्रे देण्यात येतात. जेणेकरून आप्त स्वकीयांना आदरांजली देण्यास जाता यावे. इथे जाण्यास मृतकाचे नातेवाईक असणे अनिवार्य नसून सहल आयोजन करणाऱया अनेक संस्थांमार्फत भेट देता येऊ शकते. एका अर्थाने मृत्यूपश्चात जलसमाधी प्राप्त होणारी ही स्मशानभूमी आहे.
पॅरिस डू पेरे स्मशानभूमी, फ्रान्स :
या स्मशानभूमीत फ्रान्सची प्राचीन वास्तुशिल्प संस्कृती प्रकर्षाने दिसते. जगातील सर्वाधिक भेट देणाऱयांची संख्या असलेल्या ह्या स्मशानभूमीला दरवर्षी १.५ दशलक्ष लोक भेट देत असतात. लेखक ऑस्कर की वाईल्ड, अभिनेता सराह बर्नहार्डटसारख्या वलयांकित व्यक्तींचा इथे विश्रांती घेणाऱयांत समावेश आहे.
साऊथ पार्क, कोलकत्ता :
१७६७ सालची ही स्मशानभूमी इंग्रज राजवटीत जरी स्थापन झाली असली तरी या ख्रिश्चन स्मशानभूमीचे वैशिष्टय़ म्हणजे इथे अंत्यविधी झालेला इंग्रज मेजर जनरल चार्ल्स स्टुअर्ट याची हिंदू मंदिरसदृश समाधी आहे. त्यावरील दगडी नक्षीकाम लक्षवेधक आहे. ‘व्हाइट मुघल्स’ या पुस्तकात त्याने हिंदू संस्कृती अंगीकारल्याचे वर्णन आढळते. शिवाय इंग्रज राज्यकर्त्यांचे कुणाचे कोण इथे विसावले आहे याची नोंद या स्मशानभूमीची ऐतिहासिक ओळख निर्माण करणारी आहे. तीनशे वर्षांची परंपरा असलेल्या उष्ण कटिबंधीय जीवजंतूंची विविधता येथील स्मशानभूमीत बघावयास मिळते.
फोर्ट रोसक्रॅन्स स्मशानभूमी, सॅन दिएगो :
सॅन दिएगो महासागराच्या साक्षीने येथील स्मशानभूमीला निसर्गाने सौंदर्य बहाल केले आहे. १८०० च्या युध्दातील एक लाख १२ हजार सैनिकांचा दफनविधी इथे झाला आहे. मात्र २०१४ नंतर इथे अंत्यविधी बंद करण्यात आले आहेत.
जपानमधील माऊंट कोया जंगलातील दोन लाख समाध्या आणि १०० मंदिरे असलेले बौध्दांचे पवित्र तीर्थक्षेत्र ओकुनोईन ही सर्वात मोठी स्मशानभूमी आणि इराणमधील १०७२ सालापासूनचा इतिहास असलेली मकबरातील शोअरा ही दफनभूमी, कवी, शायर, वैज्ञानिक, विद्वानांच्या मृत्यूनंतरचे वास्तव्य म्हणून प्रसिद्ध असलेली, प्राचीन आणि आधुनिक वास्तुकलेने मान्यवरांच्या स्मृतींना मानवंदना देते आहे. अशा अनेक जगभरातील विविध जातीधर्माच्या स्मशानभूमींच्या सौंदर्याचे लॉरेन ऱहोडस यांनी आपल्या लेखणीतून वर्णन केले आहे.
कुठल्याही जिवातील चेतना गेल्यास ते केवळ शव राहतं. मात्र इतिहास, वन्यजीव, वृक्ष, हिरवळ, जलाशय, शिल्प इत्यादी अनेक नैसर्गिक बाबी निर्जीव स्मशानात चेतना निर्माण करून तिथला जिवंतपणा कायम ठेवत असतात, हिंदु संस्कृतीचा विचार केल्यास स्मशानातील अंतर्बाह्य चेतना म्हणजेच शिवतत्त्व शिवाष्टकात वर्णन केल्याप्रमाणे ‘स्मशाने वसंतम्’ आहे.





























































