आगळं वेगळं – बल्लवाचार्यांचं गाव

>> शुभांगी बागडे 

तामीळनाडू म्हटलं की, अप्रतिम निसर्गसौंदर्य आणि कलाकुसरयुक्त मंदिररचनाच आपल्यासमोर येतात. असाच सांस्कृतिक वारसा तिथल्या खाद्य संस्कृतीतही दिसून येतो. रामेश्वरमपासून जवळच असणाऱ्या कलईयूर या  गावातील प्रत्येक घरातला पुरुष स्वयंपाक कलेत निपुण आहे.

मेजवान्या झोडणं हा स्थायिभाव असणाऱ्या पुरुष वर्गाच्या हातात कलथा आणि कढई येऊन बरीच वर्षे झाली तरीही सुगरण असण्याची मक्तेदारी मात्र कायम समस्त स्त्री वर्गाचीच राहिलेली आहे, परंतु तामीळनाडूमधील कलईयूर हे गाव मात्र तिथल्या सुगरण पुरुषांसाठी प्रसिद्ध आहे. हे गाव बल्लवाचार्यांचं म्हणजेच शेफ्सचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे.

तामीळनाडू म्हटलं की, अप्रतिम निसर्गसौंदर्य आणि कलाकुसरयुक्त मंदिररचनाच आपल्यासमोर येतात. असाच सांस्पृतिक वारसा तिथल्या खाद्य संस्कृतीतही दिसून येतो. पदार्थ बनविण्याच्या निरनिराळ्या पद्धतींसोबतच काही आगळ्या परंपराही इथे दिसतात. अशीच पाचशे वर्षांची परंपरा जपणारं गाव म्हणजे कलइयूर. पाँडिचेरी आणि रामेश्वरमपासून जवळच असणाऱया या छोटय़ाशा गावात पुरुषांनी मेजवानी बनवण्याची परंपरा आहे. त्यामुळेच या गावातील प्रत्येक घरातला पुरुष स्वयंपाक कलेत निपुण आहे.

इथे नांदणारी पाचवी पिढी स्वयंपाकातली आपली कला आजमावण्यात मशगूल आहे. मागच्या पिढय़ांपासून चालत आलेली खाद्य परंपरा आणि पद्धतीचं जतन करत त्यांनी या गावाला विशेष ओळख मिळवून दिली आहे. म्हणूनच इथल्या शेफ्सना अगदी जागतिक पातळीवरही नावाजलं जातं. कलइयूरची खासीयत असणाऱया या रेसिपी अजूनही सिव्रेट रेसिपी म्हणूनच ओळखल्या जातात.

कलइयूरला एका अर्थाने स्वयंपाक कलेचं विद्यापीठच मानायला हवं. कारण इथे घरातल्या प्रत्येक पुरुषाला चांगला स्वयंपाक येण्यासाठी रीतसर शिक्षण घेणं भाग असतं. बाराव्या वर्षापासूनच हे शिक्षण द्यायला सुरुवात होते. हा कालावधी साधारण दहा वर्षांचा असतो. या कालावधीत इथले ज्येष्ठ शेफच्या मार्गदर्शनाखाली स्वयंपाकाचं शास्त्रशुद्ध शिक्षण दिलं जातं. भाज्या कापणं, चिरणं, मसाला तयार करणं हे प्राथमिक पातळीवरचं शिक्षण तर दिलं जातंच, पण त्याआधी शेतातून भाजीपाला खुडून आणणं, निवडणं हे कामही शिकवलं जातं. पदार्थाला येणारी चव अशा छोटय़ा छोटय़ा कृतीमध्ये दडली असते याचेच शिक्षण त्यांना यातून मिळत असावे. केवळ पदार्थ तयार करण्याच्याच नव्हे तर स्वयंपाकाची भांडी स्वच्छ धुऊन घेण्यापासूनचं शिक्षण इथे दिलं जातं. स्वयंपाकासाठी नियोजन किती गरजेचं असतं हेच यातून दिसून येतं. यामुळेच अगदी हजार लोकांचा स्वयंपाकही केवळ दोन-तीन तासांत उरकला जातो असं इथले ज्येष्ठ शेफ रंगनाथन सांगतात. त्यांच्या मते, या नियोजनामुळेच दिलेल्या वेळेत परिपूर्ण आणि चविष्ट बनवण्यात कलइयूरमधील शेफ्सचा हातखंडा आहे आणि म्हणूनच ते जगभरात प्रसिद्धही झाले आहेत. जगभरात कलइयूरमधील शेफ्सना मागणी असते.

पाचशे उंबरे असलेल्या या गावात सध्या 300 पेक्षा अधिक पुरुष शेफ आहेत, जे जगभरातील विविध रेस्टॉरंट आणि हॉटेलमध्ये काम करत आहेत. स्वयंपाक बनवण्याच्या या कलेला 500 वर्षांपूर्वी ओळख मिळाली. इथला वनियार हा मच्छीमार समाज या कलेसाठी प्रसिद्ध होता. इथला संपन्न वर्ग म्हणजे रेडियार समाज. शेती आणि मासेमारीमधून अत्यल्प उत्पन्न मिळत असताना या रेडियार समाजाने वनियार समाजातील स्वयंपाकाची कला जाणली आणि आपल्या स्वयंपाकघरात त्यांना स्थान दिलं. तेव्हापासून स्वयंपाक कला हीच त्यांची मुख्य ओळख बनली.

कलइयूरमधील अनेक शेफनी या क्षेत्रात नवनवे विक्रम केले आहेत. सेलेब्रिटी शेफ दामू यांनी 24 तासांत 617 पदार्थ तयार करून गिनीज बुकमध्ये आपलं नाव नोंदवलं आहे. कलइयूर स्वयंपाक कलेसाठी आणि चविष्ट पदार्थांसाठी प्रसिद्ध असलं तरी इथलं सी फूड आणि त्याच्या सिव्रेट रेसिपी ही यांची मुख्य खासीयत आहे. कांदा-मिरचीची स्पेशल चटणी, पुरुवरू टुपू आणि चन्ना पुनी हे पदार्थ मत्स्यप्रेमींना कलइयूरला येण्यासाठी खुणावतात. कलइयूरने जपलेला हा वारसा आणि खाद्य संस्कृती अनुभवण्यासाठी अनेक पर्यटक या गावाला भेट देतात.

जाता जाता- कलइयूर हे गाव पुरुष शेफ्सचं गाव म्हणून जरी प्रसिद्ध असलं तरी इथल्या स्वयंपाकघराच्या चाव्या मात्र इथल्या गृहिणींच्या हातातच आहेत बरं का…

 [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या