मंथन – चिनी सैन्य माघारीमागील वास्तव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
chinese-soldiers-in-ladakh

>> कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त)  

गेल्या वर्षी संपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना या संधीचा फायदा घेत चीनने आपले विखारी रूप दाखवत लडाखमध्ये हिंदुस्थानी हद्दीजवळ  सैनिकांना तैनात केलं होतं. मात्र आता पूर्व लडाखमधील पँगाँग लेकच्या उत्तर व दक्षिणेकडील बाजूस तैनात असलेल्या चीनच्या सैन्यदलाने माघार घेतली आहे. 

पूर्व लडाखमधे 6 मे 2020 रोजी झालेल्या चिनी घुसखोरीनंतर जून 2020 पासून 24 जानेवारी 2021 पर्यंत हिंदुस्थान व चीनमध्ये नऊ लष्करी व दोन मंत्रीस्तरीय वार्ता झाल्या. अखेरीस या प्रदीर्घ प्रयत्नांना यश आले आणि मागील दहा महिन्यांपासून सुरू असलेल्या सामरिक कुचंबणेतून (मिलिटरी स्टॅण्ड ऑफ) बाहेर पडण्यासाठी 10 फेब्रुवारी 2021 ला सुरुवात झाली. लडाख प्रश्न सोडवण्यासाठी दोन्ही देशांनी एक पाऊल मागे घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदुस्थानातील चिनी राजदूत, सून वेईडोंग यांनी आपल्या लेखात केले.

त्याच दिवशी चीनने सैन्य माघार सुरू केली. त्याआधी 24 जानेवारीला दोन्ही देशांच्या कोअर कमांडर्समध्ये झालेल्या बैठकीनंतर पँगाँग सरोवराच्या उत्तर किनाऱयातून चिनी आणि दक्षिण किनाऱयातून हिंदुस्थानी सैन्य आपल्या ताब्यातील जागांवरून पूर्व तैनात जागांपर्यंत माघार घेतील, असा सर्व संमत निर्णय घेण्यात आला. या महत्त्वाच्या चिनी घोषणेनंतर हिंदुस्थानी सैन्य मुख्यालय किंवा चीफ ऑफ डिफेन्स स्टाफकडून यावर लगेच कोणतीही प्रतिक्रिया आली नाही.

वरील संबोधनामधून हे स्पष्ट झाले की, 9 फेब्रुवारी 2021 ला दोन्ही देशांच्या स्थानिक कमांडर्सनी सैन्य माघारीच्या बारकाव्यांवर विचारविनिमय सुरू केला होता आणि दोघांचे रणगाडे/सैनिकांनी 10 फेब्रुवारीला पँगाँग सरोवराच्या उत्तर/दक्षिण किनाऱयांवरील ‘प्रेझेंट पोझिशन्स’मधून माघार घेणे सुरू केले आहे.

निदान सध्या तरी ही माघार सरोवर क्षेत्रापुरतीच सीमित असेल. पूर्व लडाखमधील इतर विवादित संघर्षबिंदू आणि हिंदुस्थानने ताब्यात घेलेल्या उत्तुंग शिखरांचा यामध्ये समावेश नाही. पँगाँग सरोवराचा उत्तर आणि दक्षिण किनारा संवेदनशील, सामरिक महत्त्वाचा आहे. मे 2020 मध्ये आधी दक्षिण किनाऱयावर झालेली झटापट आणि नंतर उत्तर किनाऱयावर झालेल्या हिंसक चकमकीनंतरच सध्याची सामरिक कुचंबणा सुरू झाली.

सध्या सुरू असलेल्या हिंदुस्थान-चीन सामरिक संघर्षात पँगाँग सरोवर हा एक विवाद बिंदू (फ्रिक्शन एरिया) आहे. बाकीचे सरोवराच्या उत्तरेस आहेत. 2020 मध्ये चीनने पेट्रोलिंग पॉइंट (पीपी) 17 ए जवळील गोग्रा पोस्ट, पीपी 15 जवळच हॉट प्रिंग एरिया जेथे 15 जून 20 ला कर्नल बाबू आणि त्याचे 20 सहकारी शहीद झाले होते आणि 45 चिनी सैनिक मारले गेले ते पीपी 14 जवळील गलवान खोरे आणि चीन किंवा संरक्षणमंत्र्यांनी अनुल्लेखाने मारलेला काराकोरम खिंडीवर वर्चस्व राखणारा दौलत बेग ओल्डी विमानपट्टीजवळील डेस्पांग एरियाचादेखील ताबा घेतला होता.

उर्वरित संघर्ष बिंदू आहेत. हिंदुस्थानी अधिकाऱयांनुसार देस्पांग पूर्वीपासूनच चीनच्या ताब्यात आहे. कारण काहीही असो, याच्या परिणामस्वरूप एलएसीच्या 18 किलोमीटर पश्चिमेला आणि दौलत बेग ओल्डीपासून 30 किलोमीटर दक्षिण-पूर्वेला असणाऱया वाय जंक्शन/बॉटलनेकवरील चीनच्या ताब्यामुळे पीपी 10, 11, 11 ए, 12 आणि 13 पर्यंतच्या पारंपरिक इलाक्यात हिंदुस्थानी सैन्य आजमितीला पेट्रोलिंग करू शकत नाही.

प्रदीर्घ सैनिकी तैनातीनंतर चीनने सर्व जग कोविड-19 कोरोनाच्या प्रकोपाला तोंड देत असताना उद्भवलेल्या संधीचा उपयोग करून हिंदुस्थानला योग्य तो सामरिक धडा शिकवल्यानंतर माघार घेतली की आशियात त्याच्या तोडीची सामरिक शक्ती बनत चाललेल्या हिंदुस्थानला वठणीवर आणल्यानंतर माघार घेतली की हिंदुस्थानच्या कश्मीरसंबंधी घेतलेल्या/अमलात आणलेल्या निर्णयामुळे नाराज होऊन सीमित लष्करी बळजबरीद्वारा (लिमिटेड मिलिटरी कोअर्शन) त्याला पूर्व पदावर आणण्यासाठी केलेल्या कारवाईनंतर माघार घेतली याची मीमांसा व पुष्टी संरक्षणतज्ञांना करता आलेली नाही. उलटपक्षी समन्वयी माघारीला मान्यता देऊन चीनने आपली सामरिक/राजकीय प्रतिष्ठा व समंजसपणा जगासमोर उजागर केला आणि आपल्या येथील विपक्षाच्या हातात कोलीत दिले असे म्हटल्यास ते वावगे होणार नाही.

सामरिक कुचंबणेच्या समाधानासाठी नेहमीच्या शिरस्त्यानुसार होणाऱया राजकीय/मुत्सद्दी/ मंत्रीस्तरीय वार्तालापांची जबाबदारी सरकारने या वेळी लष्करी अधिकाऱयांवर सोपवली. या नऊ महिन्यांच्या वार्तालापीय कालखंडात लष्कराने वैचारिक बौद्धिक व व्यावहारिक दृष्टिकोन अंगीकारून प्रश्नाचे सफल उत्तर मिळवले.

सुरुवातीला कोअर कमांडर स्तरीय वार्तालापात झालेल्या सामंजस्य माघारीच्या करारानंतर चीनने जाणीवपूर्वक गलवान खोऱयामध्ये आगळिक केली. हिंदुस्थान लष्कर दगाबाज, कुटील चीनवर कधीच डोळे झापून विश्वास ठेवणार नाही. जून 2020 मध्ये गलवानमध्ये हेच झाले होते जे चीनला आवडले नाही.

सांप्रत झालेल्या करारानंतरही लष्कर तेच करेल यात शंकाच नाही. अर्थात सांप्रतचा करार हा अंतिम नाही हे लष्कराला माहीत आहे. वार्तालापात पँगाँग सरोवराच्या उत्तर किनाऱयावर काय होईल त्याचा पूर्ण तपशील आखण्यात आला असला तरी दक्षिण किनाऱयाबाबत काय हे स्पष्ट झालेले नाही.

या करारात फलस्वरूप हिंदुस्थानने एलएसीची जमिनीवर वास्तविक आखणीचा अंतिम आग्रह धरला पाहिजे. दोन्ही देशांनी आपापल्या परीने केलेले एलएसीच आकलन हा एकमेव विवादास्पद विषय आहे. चीनच्या ल्हासा झिंगजियांग व्यापारी हमरस्त्याला सामरिकदृष्टय़ा मोठी हानी पोहोचवू शकणाऱया डेस्पांगला चीनकडून गंभीर धोका संभवतो. पुठलाही सामरिक फायदा (ऑपरेशनल /टॅक्टिकल अॅडव्हांटेज) न घेता जर या क्षेत्रातील आणि कैलास पर्वतराजींवरील शिखरांवर असलेली तैनाती काढण्याला हिंदुस्थानने मान्यता दिली तर भविष्यात चीनशी वाटाघाटीचे सर्व मार्ग बंद होतील. बहुतेक हे भविष्यातील वार्तालापांमध्ये स्पष्ट होईल. कारण आजमितीला तरी संपूर्ण लष्करी सामरिक/डावपेचात्मक पारदर्शता दर्शवणे किंवा जाहीर करणे शक्य नाही,

या करारानंतर उत्तर सीमेचा प्रश्न सुटला किंवा आता या पुढे सारे कसे शांत शांत असेल हे मानणे राजकीय आणि लष्करी हाराकिरी असेल. कारण हा नवीनतम करार आणि त्याची निर्दोष अंमलबजावणी हेच हिंदुस्थान-चीन संबंधात सुधार आणण्यासाठी पुरेसे नाहीत. नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश यांसारख्या आपल्या भोवतालच्या राष्ट्रांना चीन आपल्याविरोधात उभा करतो आहे. दक्षिण चीन सागर/हिंद महासागरात चीनविरोधी क्वाड करार आणि अमेरिकेच्या इंडो-पॅसिफिक रिजनमधील हिंदुस्थानी भूमिकेलाही चीनचा विरोध आहे. पण शेवटी हिंदुस्थानला आपल्या हिताची जाणीव ठेवून चीनच्या या अवास्तवी मागण्यांना विरोध करावा लागेल आणि नकार द्यावा लागेल.

उत्तर सीमेवरील चीनची सैन्य माघारी आणि मवाळ भूमिका तात्पुरती आहे याची खूणगाठ बांधून चीनसंबंधात सध्या सकारात्मक पाऊल उचलणे हे आपल्या फायद्याचे असले तरी भविष्यात हिंदुस्थानला चीनबाबत सतत सतर्क, सावध आणि सशंक राहावेच लागेल, हे एक मात्र कटू वास्तव आहे.