लेख : गेला! गेला!! गेला!!! इमान गेला

931

>> सुरेंद्र मुळीक ([email protected])

पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गात अद्यापही पायाभूत सुविधांचा पत्ताच नाही. पर्यटकांसाठी अंतर्गत दळणवळणाची सोय नाही. त्यातच मध्य रेल्वेने सुरू केलेली वेगवान आलिशान तेजसगाडी, ‘व्हीस्ताडोमकोच आणि लवकरच सुरू होणारा महामार्ग या सगळय़ा गोष्टींमुळे सिंधुदुर्ग जिह्याच्या शेवटच्या ठिकाणी भविष्यात अवघ्या पाच तासांत मुंबईहून पोहोचता येणार त्यामुळे देशी असो किंवा विदेशी पर्यटक असो तो सहजासहजी विमानाचा वापर तूर्तास करणे तेवढेसे शक्य नाही. त्यामुळे गेला! गेला!! गेला!!! इमान गेला असे सिंधुदुर्गवासीयांना तूर्तास तरी बोलायला हरकत नाही.

इला! इला!! इला!!! इमान इला’ अशी ओरड करीत मागील वर्षी ऐन गणेशोत्सवात सिंधुदुर्गवासीयांनी एकच धमाल उडवून दिली आणि जणूकाही सिंधुदुर्गातील ‘चिपी’ विमानतळाचे उद्घाटनच झाले अशा आविर्भावात सगळे नाचू-डोलू लागले. त्यात सामाजिकदृष्टय़ा जबाबदार असलेली प्रसारमाध्यमे आघाडीवर होती. किंबहुना त्यांनीच कोणतीही खातरजमा न करता ‘चिपी’ विमानतळाच्या बातम्या हवेत सोडल्या. परिणामी त्या हवेतच विरल्या गेल्या. बातम्या अशा काही पसरविण्यात आल्या की, उद्याच मुंबई-दिल्ली आणि परदेशातून विमाने ‘चिपी’ विमानतळावर उतरणार असेच सर्वांना वाटू लागले. त्यातच कोणी एकाने सांगितले की, नोव्हेंबर महिन्यात पर्यटकांना घेऊन कॅनडातून पहिले विमान चिपी विमानतळावर लॅण्ड होणार. आणि कहर म्हणजे चिपी विमानतळावर विविध पदांसाठी भरती सुरू झाली असे सोशल मीडियाने व्हायरल केले. या सर्व घटनांमुळे सिंधुदुर्गवासीय बुचकळय़ात तर पडलेच, पण विमानातून प्रवास करू पाहणारे मुंबईकरही संभ्रमात पडले. नेमके काय होत आहे हेच न समजू शकल्याने चिपी विमानतळाबाबत नाहक गोंधळ उडाला.

चिपी विमानतळाची कहाणी काही आजची नाही. एक आटपाट नगर होते. तेथे एक राजा राहत होता. तशाच पद्धतीने चिपी विमानतळाची 20 वर्षांपूर्वी कहाणी सुरू झाली. अर्थात सिंधुदुर्गातील अनेक तथाकथित सुभेदारांनी ही कहाणी सुरू केली. त्याला कारणही तसेच होते. महाराष्ट्र शासनाने 1999 साली सिंधुदुर्ग जिह्याला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केले.

पर्यटन जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिह्याला विशेष दर्जा मिळताच कश्मीरप्रमाणेच येथील अनेकांचे घोडे चौफेर उधळू लागले. शेतकऱ्यांच्या मोक्यावरच्या जमिनीचे भाव ठरू लागले आणि खरेदी-विक्री जोर धरू लागली. यातूनच मग विमानतळाचा प्रश्न उपस्थित झाला. कारण जर पर्यटक व तेही विदेशी आले नाहीत तर शेतकऱ्यांकडून मोक्याच्या ठिकाणी घेतलेल्या जमिनीचे करणार काय, असा प्रश्न सतावू लागला आणि मग विमानतळाचा शोध सुरू झाला. त्यातच केंद्र शासनाकडून महाराष्ट्र-गोवा हद्दीवरील पेडणे तालुक्यात ‘मोपा’ येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याचा प्रस्ताव आला. अस्तित्वात असलेले गोव्यातील ‘दाबलीम’ विमानतळ हे नौदलाचे असल्याने गोव्यातील वाढत्या विमान वाहतुकीस अडचणीचे होऊ लागले. त्यातूनच ‘मोपा’ विमानतळाचा प्रस्ताव आला व सदर विमानतळाचा उपयोग पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केलेल्या सिंधुदुर्ग जिह्यानेही करावा असे सूचविण्यात आले. पण कोकणी माणूस आणि त्यात तो सिंधुदुर्गाचा ताठ कण्याचा स्वाभिमानी ‘मीया उपाशी ऱहवान, पण तुझ्याकडे जेवूक येवचंय नाय’ अशी त्याची ख्याती. या त्याच्या स्वाभिमानामुळेच त्याने म्हणजे तेथील नेत्यांनी ‘मोपा’ विमानतळाचा प्रस्ताव धुडकावून लावला आणि मग सुरू झाली ‘चिपी’ विमानतळाची कहाणी.

वेंगुर्ले तालुक्यातील परुळे गावातील ‘चिपी’ हे ठिकाण. तसे उंचावर, पण पूर्णतः कातळ भाग असल्याने या जागेची विमानतळासाठी निवड झाली आणि कामाला सुरुवात झाली. त्यानंतर एक दिवसआड करून या विमानतळाच्या सुरस कथा ऐकू येऊ लागल्या. कोण म्हणायचे चिपी हे आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार, कोण म्हणायचे ते राष्ट्रीय विमानतळ आहे तर कोणी म्हणायचे आपत्कालीन परिस्थितीत प्रत्येक जिह्यात जशी धावपट्टी केली जाते तशी ती आहे. यामुळे गोंधळात भर पडतच गेली. त्यातूनही मग विमानतळाच्या कामाला सुरुवात झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या. कोणी सांगितले भिंतीचे काम सुरू आहे, कोणी सांगितले धावपट्टीचे काम सुरू आहे तर कोणी म्हणायचे इमारतीचे काम सुरू आहे. या सगळय़ा कथा ऐकण्यात 15 वर्षे निघून गेली. या कालावधीत कोकण रेल्वेने मात्र जोर लावला. 1997 साली एका गाडीने मार्गक्रमण सुरू केलेल्या कोकण रेल्वेने 78 गाडय़ांपर्यंत मजल मारली. रोहापासून वीर (महाड) पर्यंत दुपदरी मार्गिकेचेही बांधकाम शेवटच्या टप्प्यावर नेऊन ठेवले. विद्युत्तीकरणाचीही तयारी पूर्ण केली. अत्याधुनिक यंत्रणेची देशातील पहिली गाडी तेजसही धावू लागली.

पाठोपाठ पनवेल-गोवा महामार्गाचा प्रस्तावही आला आणि मंजूर होऊन पूर्णत्वाच्या दिशेने सरकू लागला. तरीही ‘चिपी’चे विमानतळ सुरू होण्याचे मात्र नाव नाही. पण सुरस कथांची मालिका काही थांबली नाही, ती सुरूच आहे. बॉलीवूडमध्ये एखादा चित्रपट रिलीज करण्यापूर्वी प्रथम त्याच्या टीझरचे उद्घाटन होते. कालांतराने त्या चित्रपटाच्या गाण्याचे विमोचन होते. अशी अनेक उद्घाटने असतात.  ‘चिपी’ विमानतळाबाबत काहीसे असेच झाले. कधी धावपट्टीचे उद्घाटन तर कधी इमारतीचे उद्घाटन असेच वर्षभर सुरू आहे. त्यामुळे उद्या मुख्य गेटचे उद्घाटन, आतील कॅण्टिनचे उद्घाटन, त्यानंतर आतील शौचालयाचे उद्घाटन झाले तर आश्चर्य वाटू नये. म्हणूनच हे विमानतळ सुरू होणे आणि या विमानतळावर विमान उतरणे सद्यस्थितीत तरी कठीण आहे असे म्हटल्यास ते अजिबात चुकीचे ठरणार नाही. कारण…

कारण पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गात अद्यापही पायाभूत सुविधांचा पत्ताच नाही. पर्यटकांसाठी अंतर्गत दळणवळणाची सोय नाही. विजेची सोय नाही आणि मुख्य म्हणजे विदेशी पर्यटकांना राहण्याची सोय अजिबात नाही.

पर्यटन जिल्हा म्हणून गेली 20 वर्षे मिरविणाऱ्या सिंधुदुर्गात एकही पंचतारांकित हॉटेल नाही. अगदी थ्री स्टारही नाही. जे आहेत ते लॉजिंग आहेत किंवा घरगुती निवासस्थान आणि येथे विदेशी पर्यटक राहण्याची रिस्क घेत नाहीत. यामुळे जर विदेशी किंवा आंतरदेशीय पर्यटकच येणार नसतील तर डोंबलाचे विमानतळ सुरू होणार? त्यातच मध्य रेल्वेने सुरू केलेली वेगवान आलिशान ‘तेजस’ गाडी, ‘व्हीस्ताडोम’ कोच आणि लवकरच सुरू होणारा महामार्ग या सगळय़ा गोष्टींमुळे सिंधुदुर्ग जिह्याच्या शेवटच्या ठिकाणी भविष्यात अवघ्या पाच तासांत मुंबईहून पोहोचता येणार त्यामुळे देशी असो किंवा विदेशी पर्यटक असो तो सहजासहजी विमानाचा वापर तूर्तास म्हणजे पुढील 5 ते 10 वर्षे करणे तेवढेसे शक्य नाही. यामुळे कोणी काहीही म्हणो, पण जोपर्यंत सिंधुदुर्ग जिह्यात पायाभूत सुविधा 100 टक्के होत नाही तोपर्यंत विमान उतरणे शक्य नाही. हे पाहता गेला! गेला!! गेला!!! इमान गेला असे सिंधुदुर्गवासीयांना तूर्तास तरी बोलायला हरकत नाही.

जत्रोत्सवते कोंकण कॉन्क्लेव्ह

कोकणी माणसात किती आमूलाग्र बदल झाला आहे हे मागील दोन दशकांतील कोकणी माणसाच्या कामगिरीकडे पाहता दिसून येते. परळच्या दामोदर सभागृहाच्या पटांगणात सुरू झालेल्या ‘मालवणी जत्रोत्सव’ पुढे ’कोंकण महोत्सव’, ‘कोंकणचा मालवणी महोत्सव’, ‘कोंकण व्हिजन’, ‘ग्लोबल कोंकण’ असे करीत पंचतारांकित सहारा हॉटेलमध्ये ‘कोंकण कॉन्क्लेव्ह’ म्हणून पोहचला. याच पद्धतीने कोंकणच्या जनतेने मेहनत घेतल्यास उद्या दिल्ली सोडाच त्यापुढे अमेरिका, युरोपमध्येही हा महोत्सव भरविला जाऊ शकतो. पण.. पण सिंधुदुर्गात लगतच्या काळात पर्यटन बहरेल, फुलेल, वाढेल हे आज तरी सांगणे ईश्वरालाही कठीण आहे.

आपली प्रतिक्रिया द्या