बी पॉझिटिव्ह : मनापासून…मनापर्यंत!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कुठून बरे आणत असेल सोनाली इतकी सकारात्मक ऊर्जा? हे मला आजही न सुटलेले कोडे आहे… सांगतेय प्रसिद्ध कोरिओग्राफर फुलवा खामकर.

‘एज इज जस्ट अ नंबर’ या वाक्याचा खरा अर्थ कळतो तो ऊर्जेने सळसळणारा उत्साहाचा एक झरा पाहून. 72 वर्षांच्या तरुणाचे नाव आहे नानूभाई जयसिंघानी. नुकतेच आम्ही त्यांच्यासोबत कश्मीरला शूटिंगसाठी जाऊन आलो. प्रत्येक बारीकसारीक गोष्टींचे डिटेलिंग करून, त्याचा होमवर्क आदल्या दिवशी, दुसऱया दिवशी त्याचे एक्झिक्युशन लीलया करायचे नानूभाई. मी त्यांना आदराने आणि प्रेमाने नेहमीच म्हणते की, ‘‘जेव्हा मी तुमच्या वयाची होईल तेव्हा मला तुमच्यासारखे अविरत, अविश्रांत काम करायचेय हीच माझी मनोमन इच्छा आहे.’’ माझे हे वाक्य ऐकल्यावर तथास्तु म्हटल्यासारखी त्यांची नजर… किंबहुना आश्वासक नजर मला हजार हत्तींचे बळ देऊन जाते. आयुष्यातले इतके उन्हाळे, पावसाळे पाहिल्यानंतर आलेल्या अनुभवाची एक ‘ग्रेस’ त्यांच्या चेहऱयावर चमकत असते आणि ती मला नेहमीच एक सकारात्मक ऊर्जा देऊन जाते.

‘प्रोफेशनल’ या शब्दाचा समानार्थी शब्द म्हणजे सोनाली कुलकर्णी असे माझे मत आहे. माझी जिवलग मैत्रीण सोनाली कुलकर्णी. कोणताही प्रोजेक्ट असो, त्या प्रोजेक्टची पूर्वतयारी, प्रोजेक्टची अंमलबजावणी आणि तो सिनेमा रिलीज झाल्यानंतर न थकता त्याचे प्रमोशन करण्यासाठी दिवसातले 24 ताससुद्धा संपूर्ण युनिट्सच्या मागे खंबीरपणे उभे राहणे हे तिच्याकडून शिकण्यासारखे आहे. केव्हा तरी असेही होते की, मनासारखे नाही होत एखादा प्रोजेक्ट किंवा सिनेमा. एखादा आर्टिस्ट म्हणतो, ‘‘जाऊ दे ना काय करायचं? एवढा काय खास नाही. मी कशाला प्रमोशनसाठी वेळ देऊ?’’ पण सोनाली याच्या अगदी विरुद्ध विचार करते. ती म्हणते की, ‘‘तुमचा प्रोजेक्ट आहे, तुम्ही काम केले आहे. तुमचे प्रोजेक्टवरती जिवापाड प्रेम हवे आणि तो सिनेमा यशस्वी करण्यासाठी तुम्ही सर्वतोपरी सहाय्य केले पाहिजे.’’

मला आजही आठवते ‘नटरंग’च्या वेळेला तालमीसाठी 24 तास अपुरे पडतील की काय अशा पद्धतीने ती तालीम करत राहायची. न थकता, न पंटाळता आणि आज एक दशक उलटून गेले तरीही तीच नवनवीन शिकण्याची सोनालीची उमेद, जिद्द मला एक कोरिओग्राफर म्हणून प्रचंड भावते. तिचा आणखीन एक आवडणारा गुण म्हणजे पर्सनल रिलेशन आणि प्रोफेशनल रिलेशन यांची सरमिसळ ती करत नाही. समोरच्या व्यक्तीला पारखून, निरखून सीमारेषा आखून कसे वागायचे हे तिला अचूक जमलेय.
एका मल्याळम सिनेमासाठी आम्ही काम करत होतो. तेव्हा माझ्यासोबत फार मोठा लवाजमा नव्हता. मी माझ्या परीने तिकडे कामात जीव ओतत होते. तेव्हा तिथल्या युनिटमधली स्टाफची काहीतरी चूक झाली तेव्हा माझी बाजू घेऊन तिने सज्जड दम भरला साऱया युनिटला. परक्या लोकांसमोर बाजू घेणारं एक ‘आपलं माणूस’ असणं म्हणजे काय हे मला त्याक्षणी अचूक कळलं. भक्कम आधार मला मिळाला. कदाचित औपचारिक वाटेल वाचताना, पण आज सोनालीला ‘बी पॉझिटिव्ह’ कॉलमच्या निमित्ताने थँक्यू म्हणावेसे वाटतेय. धन्यवाद सोनाली! मनापासून…मनापर्यंत!!

शब्दांकन – निनाद पाटील