चर्च : उगम आणि स्थित्यंतर

>> संगीता वाझ

ख्रिश्चन धर्म हा लोकसंख्येच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा धर्म असून त्याला जवळ जवळ दोन हजार वर्षांचा इतिहास आहे. ख्रिस्तपूर्व काळ हा वेगवेगळ्या धार्मिक विधी व रीतिरिवाजाशी निगडित असला तरी ’चर्च’ ही संकल्पना मात्र येशू ख्रिस्तानंतरच उदयास आली. सीरियन सीमेवरील उत्तर जॉर्डनमधील रिहाब येथील ’सेंट जॉर्ज चर्च’ हे जगातील सर्वात प्राचीन चर्च मानले जाते. येशू ख्रिस्ताने आपल्या बलिदानाच्या एक दिवस आधी शिष्यांसोबत शेवटचं भोजन (Last supper) घेतलं. त्या दिवशी त्याने आपल्या आठवणीप्रीत्यर्थ शिष्यांना भाकर व द्राक्षरस देऊन जनसेवेचा संदेश दिला. इथेच पवित्र मिस्साबलीची (येशू ख्रिस्ताच्या बलिदानाची स्मृती) मुहूर्तमेढ रोवली गेली. पुढे हा मिस्साबली अर्पण करण्यासाठी वास्तूची गरज भासू लागली व त्यातूनच ’चर्च’ ही संकल्पना उदयास आली. ख्रिस्तानंतर चर्चला वास्तुरूप लाभायला चौथे शतक उजाडावे लागले. आयताकृती चर्चेस क्रुसाच्या आकाराची होऊ लागली. सुरुवातीला युरोप खंडात रोमन संस्कृतीचा ठसा असलेली चर्चेस बांधली गेली. रोमन शैलीतील चर्चसोबतच अलेक्झांिड्रयन, आर्मेनियन, सीरियन, बेझंटाईन, जॉर्जियन या शैलीतही विविध प्रकारच्या चर्चेसचे निर्माण झाले. कालांतराने ’आपले चर्च’ हा लोकांना अस्मिता नि प्रतिष्ठsचा प्रश्न वाटू लागल्याने चर्च अधिकाधिक सुशोभित व देखणी करण्यासाठी प्रयत्न होऊ लागले. सुधारित जगाची छाप चर्चच्या स्थापत्यशास्त्रावर उमटू लागली.

आर्मेनियन बांधकाम शैलीत चर्चचा आकार हा ग्रीक पद्धतीच्या क्रॉससारखा म्हणजेच बेरीज चिन्हासारखा असतो आणि त्यात बांधकामातील सुबकता महत्त्वाची मानली जाते. चर्चच्या आतील भागात छताखाली त्रिमितीय कमानी असून त्यावर टोकदार मिनारी असतात. चर्चचे छत किमान तीस फूट उंच ठेवले जात असे. जॉर्जियन शैलीत हाच आकार रोमन कॅथोलिक चर्चच्या क्रुसासारखा लांब आयताकृती असतो, पण इथे बांधकामातील सुबकतेपेक्षा रंगसंगतीवर जास्त भर दिला जातो.

चर्चच्या वास्तूरचनेत गाभारा व वेदी ही स्थाने मुख्य भाग मानला जातो. वेदीमागील गाभाऱयात मुख्य स्थानी त्या चर्चचे बांधकाम ज्या रक्तसाक्षी किंवा संत व्यक्तीच्या स्मरणार्थ केले असेल त्याची पुरुषभर उंचीची इमाज (मूर्ती) असते. शक्यतो हा भाग उंच जागी एखाद्या घुमटाकार छताखाली असतो. वेदीपुढे व भाविकांच्या आसनामध्ये दोन्हीही बाजूला दोन उपवेद्या असतात. हा भाग व भाविकांच्या बसण्याची व्यवस्था यात लाकडाचे किंवा मार्बलचे तीन फूट उंच असे नक्षीदार बांधकाम असते, ज्या ठिकाणी भाविकांना ख्रिस्तप्रसाद दिला जात असे. चर्चच्या साधारण एकचतुर्थांश भागात छताखाली लाकडाचा माळा केलेला असे. या भागात चर्चचे क्वायर (भक्तिगीतं गाणाऱया लोकांचा समूह) असे. प्रार्थनागीतांना संगीत देताना ‘व्हायोलिन’ या वाद्याचा प्रामुख्याने वापर करण्यात येई. धर्मगुरूंशिवाय इतर कुणालाही वेदीवर जायची अनुमती नसायची. प्रभुशब्द म्हणजे बायबल वाचन हे फक्त धर्मगुरू करीत असत. संपूर्ण मिस्सा विधी भाविकांना पाठमोरे राहून पार पाडला जात असे. चर्चमध्ये येणाया विवाहित स्त्रियांना सर्वांग झाकणारा कपडा तर अविवाहित मुलींसाठी जाळीदार कपडय़ांचा मोठा रूमाल (स्कार्फ) डोक्यावर घेणे बंधनकारक होते. पुरुषांना मात्र डोक्यावरील टोपी चर्चमध्ये शिरताना काढून ठेवावी लागे.

येशू ख्रिस्तानंतर जवळ जवळ तीनशे वर्षे ख्रिस्ती लोकांनी अनन्वित छळ सोसला. कित्येक रक्तसाक्षी (मार्टिर) संतपदाला पोहोचले. त्यातीलच एक ’संत थॉमस’. या सुवार्तिकाने हिंदुस्थानच्या पश्चिम किनारपट्टीवरील केरळमध्ये सर्वप्रथम ख्रिस्ती धर्म आणल्याचा इतिहास आहे. केरळमधल्या त्रिसूर जिह्यातल्या पलायूर येथील ’सेंट थॉमस सीरो-मालाबार कॅथलिक चर्च’ हे हिंदुस्थानच्या पहिले चर्च जे इ.स.५२ मध्ये उभारले गेले. १५ व्या शतकात आलेले पोर्तुगीज व १८व्या शतकात आलेले इंग्रज यांनीही आपापल्यापरीने हिंदुस्थानात ख्रिस्ती धर्माचा प्रसार केला. हिंदुस्थानी लोकसंख्येच्या २.३ टक्के लोक हे ख्रिस्ती धर्मीय आहेत. वसई, दमण, गोवा व दीव या पश्चिम किनाऱयावर बहुतांशी चर्च ही पोर्तुगीज शैलीतील आहेत, जी पोर्तुगीजांनी बांधली. त्यानंतर हिंदुस्थानात आलेल्या इंग्रजांनी इथे दीडशे वर्षे राज्य केले, पण ते व्यावसायिक म्हणूनच वावरले. चर्चपेक्षा शैक्षणिक संस्था उभारून त्यांनी आपल्या हाताखाली काम करू शकणारे कारकून तयार करण्यात जास्त रस घेतला. मात्र पोर्तुगीजांनी बांधून ठेवलेल्या चर्चला सहभाग म्हणून काही अँग्लिकन चर्च त्यांनी बांधली, ज्यावर व्हिक्टोरियन शैलीची छाप आहे.

आज हा ख्रिस्ती धर्म हिंदुस्थानी संस्कृतीशी व समाजाशी एकरूप होत आहे. मात्र सद्यस्थितीत धर्माविषयी बरेच अपसमज आहेत, जे दूर होणे आवश्यक आहे. कृष्ण, बुद्ध, पैगंबराप्रमाणे ख्रिस्त हाही एक विचार आहे. प्रत्येक व्यक्तीची श्रद्धास्थाने वेगवेगळी असतीलही, पण धर्म एकच आहे, असावा. आमचा धर्म, तुमचा धर्म, श्रेष्ठ धर्म, कनिष्ठ धर्म, सनातन धर्म, पुरोगामी धर्म अशी गोष्टच मुळात अस्तित्वात नाही, नसावी. उगाच धर्मावरून आपापसात निरर्थक भांडून किडय़ामुंग्यांप्रमाणे मरण्यातून आपण काय साध्य करणार आहोत? प्रत्येकाने समोरच्या व्यक्तीत ईश्वर पाहिला म्हणजे वादविवाद उरणार नाहीत. माणसासाठी धर्म आहे, धर्मासाठी माणूस नाही. मानवधर्म हाच श्रेष्ठ धर्म आहे. सर्व मानवजात एकत्र येण्यासाठी धर्म हा अपरिहार्य आहे. म्हणूनच प्रत्येकाने स्वधर्म ओळखून त्याचे प्रामाणिकपणे आचरण केले तर त्यात मानवजातीचा उद्धार सहजशक्य आहे.

अशा प्रकारे हिंदुस्थानात रुजलेला हा ख्रिस्त विचार आज पूर्णपणे हिंदुस्थानी बनला आहे. संपूर्ण मिस्सा विधी हा कीर्तन, भजन, प्रवचन व गायनाच्या माध्यमातून प्रादेशिक भाषांमध्ये होत आहे. ख्रिस्ताच्या व मरिया मातेच्या प्रतिमा आज हिंदुस्थानी पेहरावात पाहायला मिळतात. हिंदुस्थानातील नवीन चर्चचा तोंडवळा बदलून ती हिंदुस्थानी शैलीत बांधली जात आहेत. प्रार्थनेबरोबरच चर्चचा वापर आज लोकोपयोगी समाज मंदिर म्हणूनही होत आहे. भाविकांच्या दानातून दुर्गम भागातील लोकांना जमेल तशी मदत चर्चमधून पाठवली जाते. ’वसुधैवकुटुंबकम’ समजून ’ख्रिस्ताठायी एकत्र असणे’ ही संकल्पना जातपात, धर्म, प्रांत न मानता राबवली जात आहे. तरीही काही समाजकंटक त्यावर शिंतोडे उडवत असतात, परंतु क्षमा हाच चर्चचा मूळ पाया असल्याने धर्मांतराचे आरोप, त्यातून होणारा छळ, मारहाण, धर्मभगिनींवर होणारे बलात्कार व अत्याचार सोसूनही आज सुखवस्तू घरातील तरुण पिढी धर्मगुरू, धर्मबंधू व धर्मभगिनी बनून दुर्गम भागात चर्चशी बांधिलकी म्हणून सेवा देत आहेत. स्थानिक लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सुरू झालेल्या शाळा, आरोग्य सुविधा पुरवणारी इस्पितळे आजही आपली गुणवत्ता टिकवून आहेत. कुष्ठरोगी व अनाथ बालकांना पाळणारी ’होम्स’ आजही सेवारत आहेत. पूर्वी फक्त वेदीवरून उपदेश करणारे धर्मगुरू आज समाजाभिमुख झाले आहेत. समाजकारण व राजकारणात शिरून मानवी मूल्याची पायमल्ली होऊ नये म्हणून आवाजही उठवत आहेत. याला अपवाद नाहीत असंही नाही. तरीही आपले सुवर्णसिंहासन बाजूला ठेवून लाकडी खुर्ची वापरणारे, आलिशान गाडय़ांचा ताफा नाकारून बसने प्रवास करणारे, दरवाजात उभ्या असलेल्या दारवानाला स्वतः चहाचा कप नेऊन देणारे, डार्विनच्या उक्रांतीवादाचे समर्थन करणारे, ’मानवसेवा हीच ईशसेवा’ हे कृतीतून दर्शविणारे क्रांतिकारी पोप फ्रान्सिस हे शिष्याचे पाय धुणाऱया येशूचे खरे अनुयायी.

– sangeetavaz@rediffmail.com