हवामान बदल – एक आव्हान

634

>> रविराज गंधे

कोरोनामुळे आपली जीवनशैली बदलली गेली आणि याचा लाभ झाला तो निसर्गाला, पर्यावरणाला. हा घडलेला बदल पर्यायाने मानवाला अनुकूल असाच म्हणायला हवा आणि यावरून हवामान-बदल, प्रदूषण यांचे गांभीर्य जाणून घ्यायला हवे. निसर्गाने आपल्याला भरभरून दिले. तेच आपण ओरबाडत आहोत. आता हे निसर्गचक्र व त्यावर आधारित परिसंस्था नव्याने जीवित करणे हे मोठे आव्हान आहे.

लॉक डाऊनदरम्यान सामाजिक, राजकीय, आर्थिक अशा विविध पातळ्यांवर अनेक विचार-निरीक्षणं सामान्य जनतेकडून वेळोवेळी मांडली गेली. त्यात पर्यावरणविषयक बदलासंदर्भात आपण जागरूक झाल्याचं दिसत आहेच. हिंदुस्थानातल्या अनेक मोठ्या शहरांची प्रदूषण पातळी 50टक्क्यांनी घसरून हवेची गुणवत्ता कमालीची सुधारून सरासरी 100 पी.पी.एम.इतकी झाली. आकाश निळेभोर झाले, चिमण्या परतल्या, मोर अंगणात नाचायला लागले, डॉल्फिन समुद्र किनार्‍यांवर जलक्रीडा करू लागले, फ्लेमिंगोचे थवे आकाशात दिसू लागले. गंगेसह असंख्य नद्यांचं पाणी पिण्यायोग्य स्वच्छ झालं. हे सारे बदल खूप सुखावह असेच आहेत. अर्थात माणसाने हे बदल जाणीवपूर्वक घडवून आणले नाहीत तर टाळेबंदीच्या निर्णयामुळे अपघाताने झाले हे विसरता कामा नये. टाळेबंदीनंतर हे चित्र असेच राहील का? राहू शकेल… जर माणसांनी पर्यावरणाची काळजीपूर्वक जोपासना केली तर!

आपल्या जीवनशैलीतील बदल पर्यावरणासाठी जसा योग्य ठरला, यावरून हवामान-बदल, प्रदूषण यांचे गांभीर्य जाणून घेतले पाहिजे. ‘ज्या देशाची माती सुपीक असते, तो देश खर्‍या अर्थाने संपन्न असतो’ असे विधान जॉर्ज वॉशिंग्टन यांनी केले होते. एकेकाळी आपल्या देशाच्या बाबतीत ते सार्थही होते. आपल्या देशातील मातीला सोन्याची खाण असे संबोधले जायचे. सुपीक जमीन आणि मुबलक पाण्याचा संपन्न वारसा लाभलेल्या नद्यांच्या किनार्‍यावर अनेक संस्कृती उदयास आल्या. परंतु आजचं चित्र अगदी वेगळं आहे. देशात आज शेती आणि पाण्याच्या नावाने गरीब जनतेच्या डोळ्यांत अश्रूंचा महापूर लोटलेला दिसतो. या अवस्थेचे मूळ झपाट्याने बदलणार्‍या हवामानात आणि पर्यावरणाच्या असंतुलनात दडले आहे.

गेल्या 70 वर्षांत आपण तापमानवाढीशी सुसंगत असे कुठलेच पर्यावरणविषयक ठोस धोरण, तंत्रज्ञान आणि कार्यक्रम कठोरपणे राबवले नाही. वास्तविक मुळात पर्यावरण असा काही विषय असू शकतो याची जाणीव जगाला फार उशिराने झाली. 1962 साली जीवशास्त्रज्ञ राशेल कार्सन यांनी आपल्या ‘सायलेंट स्प्रिंग’ या पुस्तकातून पर्यावरणविषयक धोक्याची पहिली घंटा वाजविली, पण जग अजूनही जागे झाले नाही. जगात सगळ्यात जास्त कार्बनचे उत्सर्जन अमेरिकेत होते तरी तेथील राष्ट्राध्यक्ष पर्यावरणाचे असंतुलन ही एक अफवा आहे असेच मानतात.

जल-जंगल-जमीन ही पर्यावरणाची त्रिसूत्री आहे. गेल्या अनेक दशकांपासून जंगल, जमीन, पाणी, माती, वाळू, खाणीचे साठे, पशु-पक्षी आदी नानाविध नैर्सिगक संपत्ती इतक्या मोठ्या प्रमाणावर आपण ओरबाडून संपविली की आता हे सारे निसर्गचक्र आणि त्यावर आधारित परिसंस्था पुन्हा जीवित करणे हे आपल्यासमोर मोठे आव्हान आहे. पर्यावरण या विषयाची व्याप्ती आणि परीघ खूप मोठा आहे. जीवसृष्टी मानव जातीचे भरण-पोषण, रक्षण आपल्या नकळत करीत असते. परंतु त्याची जाणीव माणसाला नसल्याने अतिहव्यासाने तो ती उद्ध्वस्त करीत आपला आणि पृथ्वीचा नाश ओढवून घेत आहे.

सागरी किनार्‍यांचे आणि नद्यांचे प्रदूषण, ध्वनी-प्रकाश-रंगांचं प्रदूषण, ई-कचरा, जैव-वैद्यकीय कचरा, सागरी प्रवाळ, तिवरांची जंगलं, देवराया, वन्य प्राणी जीवन, कीटकांचं विश्व, मातीमधील सूक्ष्मजीव, औषधी वनस्पती अशा नानाविध निसर्गसंस्था प्रदूषणाने प्रभावित होऊन विनाशाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपल्या आहेत. या सर्वांमध्ये हवा आणि पाण्याचं प्रदूषण, अन्न-धान्य आणि शेती उत्पादन तसेच मोठ्या प्रमाणावर होणारा अनिर्बंध कचरा हे सर्वात चिंतेचे विषय आहेत. या संदर्भातील हानीबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागरण केले जाते. उपाययोजना आखल्या जातात. परंतु आपल्या समाजात याविषयी पुरेशी जागरूकता व साक्षरता नसल्याने त्याचे परिणाम दिसत नाहीत.

सार्वजनिक स्वच्छता राखणे यासाठी सरकारच्या नियमांची गरज नाही. कचरा आपल्या घरात किंवा अंगणात नको, याचा अर्थ तो दुसर्‍याच्या दारात टाकणे नव्हे. सार्वजनिक जागी कचरा करण्याच्या आपल्या सवयीने आता समस्येचे उग्र स्वरूप धारण केले आहे. आपण दररोज अंदाजे 2 लाख टन कचरा निर्माण करतो. एकट्या मुंबईत 10 हजार टन कचरा रोज उचलला जातो. हा कचरा नद्या, तलाव, समुद्रामधील पाणी प्रदूषित करतो. यातील दूषित घटक पावसाळ्यात जमिनीत मुरून अन्न-धान्य, भाजीपाला दूषित होतो. गाई-गुरे, जलचर प्राणी हा कचरा खातात. त्याचा परिणाम दूध-मासे दूषित होण्यावर होतो. कचर्‍याचं वर्गीकरण, पुनर्वापर, इंधन-वायू आणि खत र्नििमती असे अनेक प्रकल्प देशभर राबविले जातात. परंतु लोकसंख्येच्या तुलनेत असे प्रयत्न कमी पडतात.ते कठोरपणे अमलात आणले पाहिजेत. कचरा होणे जर अटळ असेल तर तिचे संपत्तीमध्ये रुपांतर व्हायला हवे.

हिंदुस्थानला जवळपास 7500 किलोमीटरहून अधिक लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. यामध्ये औद्योगिक वसाहतीतील दूषित रसायनयुक्त पाणी तसेच नागरी वस्त्यामधील मैला मोठ्या प्रमाणावर सोडला जातो. नद्यांची हीच स्थिती आहे. त्यामुळें सागरी जीवसृष्टी, वनस्पती नष्ट होत आहेत. आज नद्या-तलावांचे प्रदूषित पाणी शुद्ध करण्यासाठी सरकारला करोडो रुपये खर्च करावे लागत आहे. परदेशात सारे पाण्याचे स्रोत काटेकोरपणे संरक्षित केले जातात. मिनरल पाणी वापरले जात नाही.

आज हिंदुस्थानात प्रदूषित हवेमुळे दमा, खोकला, सर्दी-पडसे विकारांनी अनेक लोक ग्रासलेले दिसतात. हवेत प्राणवायूचे पुरेसे प्रमाण नसल्याने फुफ्फुसाचे क्षय आणि कर्करोग होण्याचे प्रमाण वाढले आहे. हवेतील प्रदूषण कमी करून आपण या समस्येवर मात केली नाही तर आज जसे आपण मास्क लावून काम करीत आहोत तसे ऑक्सिजन सिलिंडर घेऊन फिरावे लागेल! आपण रोज श्वसनाद्वारे 500 लिटर्स ऑक्सिजन शरीरात घेत असतो. त्याची बाजारभावाने किंमत 8000 रुपयांच्या आसपास आहे. खरेच असे संकट समोर उभे ठाकले तर आपली काय अवस्था होईल? प्रदूषित हवेमुळे दिल्लीसारखी अनेक शहरे बंद करण्याची गरज भविष्यात भासू शकते.

आपल्या देशातील पर्जन्यमान हे मोसमी पावसावर अवलंबून आहे. दक्षिण ध्रुवीय प्रदेशातील हिमनग वितळून हिंदी महासागरात येतात. त्यामुळे तेथील पाण्याचे तापमान कमी होऊन ते तापते आणि त्याची वाफ होऊन हवेत ढग तयार होऊन ते बरसतात. या मोसमी ढगांचा प्रवास पाश्चिम घाटामुळे सुकर होतो. बेसुमार जंगलतोड, उद्योगधंदे, खाणी, घाट परिसरातील रस्ते आणि वाहतूक यामुळे जागतिक वारसा असलेल्या या घाटांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. याविषयी जनजागरण आणि कायदेशीर कारवाई अधिक प्रभावीपणे व्हायला हवी.

कोरोनाने माणसाच्या जीवितालाच आव्हान दिले आहे. जीवाच्या भीतीपोटी आपण मास्क लावून, स्वत:ला घरात कोंडून घेऊन जगत आहोत. वर्ष-सहा महिने परिस्थिती अशीच राहणार आहे. हवामान-बदलाचे आणि पर्यावरणाच्या र्‍हासाचे संकट आपल्या जीविताला आव्हान देणारे आहे. ते गांभीर्याने घेण्याची गरज आहे. पर्यावरणाचे संवर्धन करणे हा एक संस्कार आहे. तो वेळीच अंगी बाणवला पाहिजे. भविष्यकाळात युद्धं अन्न-धान्य आणि पाण्यावरून होतील असं म्हटलं जातं. सध्याची स्थिती पाहता यात अतिशयोक्ती नक्कीच नाही. कोरोनाची साथ संपून जनजीवन पूर्ववत होईलही; परंतु निसर्गर्निर्मिती जीवसृष्टी आणि परिसंस्थांचा विनाश झाला तर ती पुनरुज्जीवित व्हायला शेकडो-हजारो वर्षं लागतात याचे भान आपण जपले पाहिजे.

(लेखक माध्यमतज्ज्ञ आहेत.)

आपली प्रतिक्रिया द्या