लेख – हे राज्य व्हावे उद्धवांचे, ही तर ‘श्रीं’ची इच्छा!

>> हरिभाऊ राठोड

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून एक वर्षही पार केले नाही आणि कोरोनासारखे संकट पुढे आले, परंतु त्यांच्या संयमी आणि धैर्यशील कार्यशैलीने या संकटावर महाराष्ट्र लवकरच मात करेल असा विश्वास निर्माण झाला आहे. महाराष्ट्रासाठी खूप काही करण्याचा आणि विकासात्मक वारसा ते पुढे गतिशील करतील यात शंका नाही. उद्धव ठाकरे यांचा जन्म 1960 मध्ये झाला आणि ते वर्ष महाराष्ट्र स्थापनेचे. थोडक्यात, ‘‘हे राज्य व्हावे उद्धवांचे, ही तर ‘श्रीं’ची इच्छा’’ होती असेच म्हणावे लागेल.

‘राकट देशा कणखर देशा, सुजलाम् सुफलाम् देशा’ अशा शब्दांत आपल्या पुरोगामी महाराष्ट्राचे गोडवे अटकेपार आजही गायिले जातात. आपल्या राज्याला थोर महापुरुष, समाजसुधारक, क्रांतिकारक, संत, ऋषी, गुणीजनांचा एक समृद्ध असा वारसा लाभलेला आहे. महाराष्ट्रात प्रबोधनकार ‘ठाकरे’ म्हणून सुपरिचित असलेले एक आगळेवेगळे पुरोगामी व्यक्तिमत्त्व आणि हिंदू अस्मितेचे वलय निर्माण करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असा देदीप्यमान वारसा लाभलेले, ठाकरी बाणा, ठाकरी शैली, भगवा झेंडा अशा वातावरणात रमलेले उद्धव ठाकरे यांनी नोव्हेंबर 2012 नंतर शिवसेनेची धुरा खऱया अर्थाने खांद्यावर घेतली. खरं तर हा काळ त्यांची परीक्षा घेणारा होता, परंतु अत्यंत शिताफीने त्यांनी शिवसेना पक्ष मजबूत करत त्याचा विस्तार केला आणि आज ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून महाविकास आघाडी सरकारचे यशस्वी नेतृत्व करीत आहेत.

‘संजयकाल’

मुख्यमंत्री हा ठाकरे घराण्यातला होईल अशी तयारी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधी दर्शवली नव्हती. परंतु बाळासाहेबांचा काळ हा वेगळा होता आणि सध्याचा काळसुद्धा वेगळा आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात रंजक, परिवर्तनीय आणि चुरशीचा खेळ 2019 च्या निवडणुकीदरम्यान पाहायला मिळाला. शिवसेनेच्या संबंधात ‘हीच ती वेळ’ ही टॅगलाइनच शिवसेनेला सत्तेकडे ओढणारी होती, परंतु यात खऱया अर्थाने खिंड लढण्याची चतुरस्र कामगिरी जर कोणी केली असेल तर ती शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी! या रणसंग्रामात संजय राऊत यांनी खिंड लढवून महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळीच कलाटणी दिली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबतीने शिवसेनेची नव्या समीकरणाची मांडणी केली. संजय राऊत यांचा पुढाकार आणि त्यावेळच्या पत्रकार परिषदा म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यासाठी मुख्यमंत्री म्हणून मुकुट प्रदान करायला लावणारा ‘संजयकाल’ ठरला असे म्हणायला काही हरकत नाही.

धीरोदात्तपणाची अखंड परंपरा

महाराष्ट्राच्या एकूणच राजकीय पर्यावरणात सुसंस्कृत, संयमी आणि धीरोदात्तपणाची परंपरा थोर राजनीतिज्ञ वसंतराव नाईक यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या लोकाभिमुख कारकीर्दीत रुजवली. ती परंपरा आजच्या कोरोनाच्या संकटाच्या काळात मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे जपताना दिसून येत आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात नाईक यांनी एक वेगळीच लोकाभिमुख संयमी आणि सृजनत्वाची परंपरा रूढ केलेली पाहायला मिळते. कारण सर्वाधिक संकटे आणि तेही राज्य उभारणीचा कालखंड, अशातही नाईक यांनी दाखवलेले धैर्य आजही तितकेचअनुकरणीय मानले जाते. भीषण दुष्काळ, राष्ट्रीय आणीबाणी, जातीय दंगली, भूकंप अशा स्थितीतही राज्याला दिलेला दिलासा आणि सुजलाम्-सुफलाम् राज्य म्हणून राज्याची केलेली उभारणी आजही नजरेसमोर आहे. 1962 ते 1972 सारख्या कालखंडानंतरही राज्यात विविध आपदा आल्या. त्याप्रसंगी त्या-त्या मुख्यमंत्र्याने आपापल्यापरीने प्रयत्नही केले, परंतु कोरोना हे आरोग्याचे संकट मात्र वेगळेच अनुभवायला मिळाले. या भीषण प्रसंगी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे एका कुटुंबप्रमुखाप्रमाणेच पाहायला मिळाले. हेच तर खऱया अर्थाने आपल्या महाराष्ट्राच्या वैभवशाली धीरोदात्त परंपरेचे वैशिष्टय़ आहे.

महाराष्ट्राचे वैभव

पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण कलश पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांच्या हाती सोपवला. राज्य निर्मितीच्या काळात आजच्यासारख्या भौतिक आणि तंत्रज्ञानाच्या सुविधा नव्हत्या, परंतु दूरदृष्टी आणि विकासाभिमुख ध्यासाने महाराष्ट्र भारावलेला होता. आधुनिक महाराष्ट्राची पायाभरणी यशवंतराव चव्हाण यांनी, तर उभारणी वसंतराव नाईकांनी केली. ‘दी प्रोग्रेसिव्ह स्टेट ऑफ महाराष्ट्र इन इंडिया’ ही गौरवाची विकासाभिमुख बिरुदावली वसंतराव नाईकांच्या उभारणीतून महाराष्ट्राला मिळाली. सर्वाधिक धोरणे नाईक यांच्या कालखंडातच राबविली गेली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि वसंतराव नाईक यांचे स्नेहबंध अतूट होते.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून एक वर्षही पार केले नाही आणि कोरोनासारखे संकट पुढे आले, परंतु त्यांच्या संयमी आणि धैर्यशील कार्यशैलीने या संकटावर महाराष्ट्र लवकरच मात करेल असा विश्वास निर्माण झाला आहे. महाराष्ट्रासाठी खूप काही करण्याचा आणि विकासात्मक वारसा ते पुढे गतिशील करतील यात शंका नाही. उद्धव ठाकरे यांचा जन्म 1960 मध्ये झाला आणि ते वर्ष महाराष्ट्र स्थापनेचे. थोडक्यात, उद्धवजीच्या रूपाने साठीच्या उंबरठय़ावर मिळालेले मुख्यमंत्रीपद म्हणजे ‘‘हे राज्य व्हावे उद्धवांचे ही तर ‘श्रीं’ची इच्छा होती’’ असेच म्हणावे लागेल.

आईभवानी जगदंबा, उद्धव ठाकरे यांना उदंड, निरामय आयुष्य देवो हीच शुभकामना!

आपली प्रतिक्रिया द्या