मुद्दा : कोस्टल रोड एक उत्तम पर्याय!

50

>> पुरुषोत्तम कृ. आठलेकर 

मुंबईतील  सद्य परिस्थिती अनुभवता वाढती लोकसंख्या, वाहनांची संख्या, वाहतूक वर्दळ आणि अपुरी जागा त्यामुळे होणारी वाहतुकीची कोंडी, होणारा त्रास, वाया जाणारा वेळ आणि मनुष्यबळाची कमी होणारी उत्पादन क्षमता या सर्वांवर मेट्रो-मोनोसारखे प्रकल्पसुद्धा अपुरे पडत आहेत. या सर्वांवर मुंबईकरांचे स्वप्न असलेला ‘कोस्टल रोड’ हा प्रकल्प कार्यान्वित होत आहे. ज्याप्रमाणे वांद्रे ते वरळी हा (सी लिंक) सागरी सेतू प्रकल्प साकारला गेला. त्यामुळे वाहतुकीचा भार काही प्रमाणात कमी होऊन मुंबईला एक वेगळे वैभव प्राप्त झाले. त्याचप्रमाणे या प्रकल्पानेसुद्धा वेळ, त्रास नक्कीच वाचणार आहे, परंतु हा प्रकल्प साकारताना सर्व बाधित लोकांचा योग्य विचार झालाच पाहिजे.

आजकाल कोणताही प्रकल्प, उद्योग साकारताना त्याला विरोध, मोर्चे, आंदोलने, वेळप्रसंगी बंदची हाक असे करत दळभद्री राजकारण केले जाते जे महाराष्ट्रला परवडणारे नाही. याचासुद्धा अभ्यास होणे गरजेचे आहे.  80 टक्के समाजकारणाच्या माध्यमातून विकास, उद्योग याला चालना मिळालीच पाहिजे. ज्याप्रमाणे नाण्याच्या दोन बाजू असतात त्याप्रमाणे फायदे आणि तोटे असतातच. त्या अंगाने विचार करून तोट्याच्या समस्या जास्तीत जास्त कशा कमी होतील याचा विचार करून प्रकल्प साकारले गेले पाहिजेत. अर्थातच ते साकारताना संबंधितांच्या उपजीविकेवर जर घाला येत असेल, उद्योग-व्यवसायावर परिणाम होत असेल तर त्यासाठी पर्यायी व्यवस्था, पुनर्वसन होणे महत्त्वाचे आहे. एका अंगाने जर विचार केला तर विकास साधायचा कसा? चर्चेतून सर्व प्रश्न, समस्या सुटू शकतात. त्यासाठी संवाद होणे महत्त्वाचे आहे. मुंबईत आज सर्वात मोठी समस्या भेडसावत आहे ती म्हणजे दैनंदिन प्रवास, होणारी वाहतूककोंडी, सोसाव्या लागणार्‍या यातना. अशा वेळेला ज्या मुंबईला निसर्गाने समुद्र दिला त्या नैसर्गिक संपत्तीला धोका न लावता ‘कोस्टल रोड’सारखा सुंदर, आखीव-रेखीव प्रकल्प मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून साकारला जात असेल तर ते सर्व मुंबईकरांचे श्रेय नाही का? आणि तो साकारत असताना सर्व संबंधित बाधित लोकांची शासनामार्फत काळजी घेतली जाईल असे आश्वासन देऊन योग्य तो मोबदला, पुनर्वसन केले जाईल. त्यासाठी शासन व महापालिका वचनबद्ध आहे. मग विरोध कशासाठी ?

आज मुद्दाम आठवण करून द्यावीशी वाटते की, 1990 पासून जेव्हा जागतिकीकरण, मुक्त आर्थिक धोरण या प्रवाहात अनेक खासगी कंपन्या बंद पडल्या, स्थलांतरित झाल्या. आज तेथे उंच उंच टॉवर्स, मॉल्स साकारले गेले, पण तेथील कामगार मात्र कामापासून व आर्थिकदृष्ट्या वंचितच राहिले. कारण त्यांचा वाली कोण नव्हता. आज हा प्रकल्प साकारताना शासन, मुंबई महापालिका त्याच्या पाठीशी उभ्या आहेत. इतकेच नव्हे तर या प्रकल्पाच्या उद्घाटनाच्या वेळी शिवसेनेने कोळी बांधवांच्या पाठीशी पूर्णपणे ताकदीनिशी उभे आहोत असे सूतोवाचसुद्धा केले आहे. हा प्रकल्प साकारताना समुद्रात टाकण्यात येणार्‍या भरावामुळे भरतीच्या वेळी राहत्या घराचा प्रश्नसुद्धा उभा राहणारा आहे. मच्छीमार व्यवसाय, मासळी प्रजनन या सर्व गोष्टींचा विचारविनिमय झाला पाहिजे. त्याचबरोबरीने राज्याच्या विकासात एक नागरिक या दृष्टीने आपले काही योगदान असले पाहिजे या दृष्टिकोनातूनसुद्धा विचार झाला पाहीजे. मरीन ड्राइव्ह ते कांदिवली असा अंदाजे 35 किलोमीटर लांबीच्या या रोडने वेळ वाचून इंधन बचत होईल तसेच ध्वनी व वायुप्रदूषणाला आळा बसेल. असा हा ‘कोस्टल रोड’ मुंबईच्या वैभवात नक्कीच भर टाकेल आणि दैनंदिन वाहतुकीला एक उत्तम पर्याय ठरेल हे निश्चित!

आपली प्रतिक्रिया द्या