
>>स्वरा सावंत
लोकमान्य टिळकांनी समाजबांधव एकत्र यावेत या उद्देशाने सार्वजनिक श्रीगणेशाची स्थापना केली. त्यामुळे समाज एकत्र आला आणि पुढे अनेक चळवळी घडल्या. आता या समाजावर वेळ आली ती सामाजिक भान जपण्याची. सध्या सुरू असलेला आदिमाया आदिशक्तीचा जागर समाजातील घटकांना अधिक जागरुक करील या भावनेने प्रेरित होऊन ठाण्यातील काही नवरात्रोत्सव मंडळे समाजाप्रति असलेले कर्तव्य निभावत आहेत. त्याचा घेतलेला हा आढावा.
व्यथा बांबू विणकरांची
पूर्वी कुडाची घरे असायची. त्यामुळे बांबूचा वापर व्हायचा. त्यानंतर टोपल्या, सूप, परडय़ा बनवणे एवढेच काम या कारागीरांकडे उरले. मात्र काळानुरूप प्लॅस्टिकचा वापर वाढला आणि दैनंदिन वापराच्या वस्तूंमध्ये तत्सम गोष्टींनी जागा घेतली. याचा मोठा फटका बांबूचे विणकाम करणाऱया जमातीला बसला आणि या कारागीरांच्या पोटावर अक्षरशः पाय आला. आता सर्वत्र दुष्परिणाम जाणवू लागल्याने शासनाने प्लॅस्टिक बंदी केली, पण या कामगारांच्या हातचे काम गेले ते गेले. या कामगारांच्या हाताला पुन्हा काम मिळेल का? त्यांची ही व्यथा मांडली आहे ठाण्याच्या खोपट येथील सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाने. पूर्वी असणारे बांबूचे महत्त्व आणि आरोग्यासाठी त्याचे फायदे आजही तितकेच आहेत हे या मंडळाने अधोरेखित केले आहे. यासाठी चक्क दुर्गादेवीलाच बांबूच्या झोपडीत बसवले आहे. विशेष म्हणजे हा देखावा टोपल्या बनवणाऱया एका आई, लेकराने साकारला आहे. यानिमित्ताने गेले काही दिवस आपल्या हाताला रोजगार मिळाल्याचे समाधान कारागीर मंगेश चंदनशिव आणि सुमनबाई चंदनशिव यांना वाटत आहे. नवरात्रानंतर बांबूचे सर्व साहित्य या कारागीरांना दान करण्यात येणार आहे. या मंडळाचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे या ठिकाणी शैक्षणिक साहित्य दानाची पेटी ठेवण्यात आली आहे. यामध्ये दान केलेलं साहित्य आदिवासी पाडय़ावरील शाळेत दिले जाणार आहे.
मूठभर धान्यातून धन्यता
नौपाडा परिसरात कार्यरत असलेल्या हिंदू जागृती नवरात्रोत्सव मंडळाचा हा एक स्तुत्य उपक्रम. या मंडळाने तांदूळ, ज्वारी, डाळ, कणकेचं पीठ असं वाटेल ते धान्य एक-एक मूठ आणण्याचे आवाहन भक्तांना केलं आहे. प्रत्येक वर्षी हा उपक्रम राबविण्यात येते. त्यामुळे वाडा, जव्हार, मोखाडा येथील 35 बालवाडय़ांमधील 500 आदिवासी विद्यार्थ्यांचे पोट भरले जाते. याशिवाय सामाजिक देणं जपत हे मंडळ गोरक्षणाचे कर्तव्य पार पाडतात. मंडळात आलेल्या निधीचा उपयोग खाटकांकडून सोडवलेल्या गाईचे पालनपोषण करण्यासाठी केला जाते. याशिवाय वर्षभर रक्त संकलनाचे काम करून वामनराव ओक रक्तपेढीला रक्त साठवण्याचा उपक्रमही राबवला जातो. सणांमध्येच संधी मिळते आपल्या आयुष्याचे देणं फेडण्याची. यासाठी प्रत्येक वेळी आम्ही नवीन उपक्रम राबविण्याचा प्रयत्न करतो, असे मंडळाचे अध्यक्ष विकास घांगरेकर यांनी सांगितले.
‘संकल्प’ निरोगी आरोग्याचा
दिवसेंदिवस वाढणारी रोगराई, होणारे गंभीर आजार आर्थिक दृष्टय़ा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहेत. ही बाब हेरून ठाणे पश्चिम येथील संकल्प मित्र मंडळाने निरोगी आरोग्याचा संकल्प सोडला आहे. यंदा हे मंडळ आपले 24 वे वर्ष उत्सव साजरा करीत आहे. या मंडळाचे संयुक्तरित्या सामाजिक उपक्रम वर्षभर सुरू असतात. तसेच विविध नामांकित सामाजिक संस्थाबरोबरही अनेक उपक्रम राबवत आहे. ज्यात लायन्स क्लब बरोबर मोफत आरोग्य शिबीर, रक्तदान, विविध प्रकारच्या तपासण्या बरोबर डोळ्यांचे मोफत ऑपरेशन ही गरजू रुग्णांना उपलब्ध करून दिले. तसेच गरजू मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप, विविध स्पर्धा माध्यमातून विद्यार्थ्यांना नवे मार्ग दाखवले. आजच्या घडीच्या सर्व आघाडीवर पुढे असलेल्या महिलांच्या विशेष कामकाजाबद्दल त्यांना गौरवले जाते. तसेच गृहीणींना नवीन रोजगार संधी उपलब्ध करून दिल्या असेच अनेक उपक्रम हे मंडळ राबवत असते.
सोसायटीचे आरोग्याचे दान
एखाद्या गृह संकुलात राहताना विविध जातीधर्माच्या बांधवांनी एकत्र येत सध्याच्या महिषासुररूपी अनारोग्याच्या दैत्याला समाजातून बाहेर करायचे ठरवले. यासाठी उत्सवासारखे कोणतेही व्यासपीठ नाही हे जाणून लव्ह नेस्ट सोसायटी व श्री विश्वतेज आयुर्वेद चिकित्सालय यांच्या वतीने नवचंडी यागाबरोबरच आरोग्य यागाचेही आयोजन केले. यामध्ये सर्वरोग व रक्त तपासणी शिबिर, मार्गदर्शन, ई. सी. जी., आयुर्वेद चिकित्सालय तर्फे संधिवात, मणक्याचे आजार, आम्लपित्त, पोटाचे विकार, दमा, सर्दी, पचनाचे विकार, मूळव्याध, सोरियासिस, पिंपल्स, त्वचा विकार, लहान मुलांचे किडनीचे विकार, मुतखडा, मधुमेह, हृदयाचे आजार, लिव्हरचे आजार, पॅरालयसिस इ. विकारांची तपासणी उपचार मार्गदर्शन केले जाणार आहे. विशेष म्हणजे हे आरोग्यदान सर्वांसाठी खुले राहणार आहे.
व्यापाऱयांचे मोलाचे सहकार्य
कळवा परिसरात असणाऱया सर्व मंडळांच्या उत्सवात मोलाचे सहकार्य आणि मार्गदर्शन करणारे कळवा व्यापारी वेल्फेअर असोसिएशनचे मंडळ. नवरात्रोत्सवात अन्नदान, प्रसाद वाटप, पाणीपुरवठा, मनुष्यबळ सहकार्य करण्यात हे मंडळ सतत तत्पर असते. हल्ली कोणीही स्वार्थाशिवाय मदतीला धावून येत नाही, मग अशा वेळी वाटतं की, सामाजिक भान जपण्यासाठी हेही नसे थोडके…


























































