ठसा : जयपाल रेड्डी

537

जयपाल रेड्डी यांच्या निधनाने काँग्रेस पक्षातील एक ज्येष्ठच नव्हे तर ‘स्वतंत्र’ बाण्याचा नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. दिवंगत इंदिरा गांधींच्या आणीबाणीच्या निर्णयाला विरोध करून काँग्रेसमधील जे नेते पक्षाबाहेर पडले, आणीबाणीविरोधी आंदोलनात सक्रिय सहभागी झाले त्यापैकी जयपाल रेड्डी हे एक होते. आणीबाणी लादण्याच्या निर्णयाला रेड्डी यांनी कडाडून विरोध केला. इतर अनेक नेत्यांप्रमाणे तेदेखील जनता पक्षात सहभागी झाले. एवढेच नव्हे तर 1980 मध्ये तेलंगणामधील मेडक लोकसभा मतदारसंघात त्यांनी थेट इंदिरा गांधींनाच आव्हान दिले होते. हा मतदारसंघ त्यावेळी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. तरीही जयपाल रेड्डी यांनी हिमतीने इंदिराजींविरोधात निवडणूक लढवली. त्यात त्यांना पराभव पत्करावा लागला, पण त्यावेळी मेडक मतदारसंघातील या लढतीने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले होते. इंदिराजींची 1984मध्ये निर्घृण हत्या झाली त्यावेळी त्या याच मेडक मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत होत्या. आणीबाणीनंतर केंद्रात जनता राजवट आली. पुढे अडीच वर्षांतच हे सरकार गेले आणि जनता पक्षाचीही शकले झाली. तरीही जयपाल रेड्डी यांनी पुन्हा काँग्रेस प्रवेश केला नव्हता. राजीव गांधी यांच्यानंतर नरसिंह राव यांचे सरकार आले आणि पुढे देशात राजकीय अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले. आघाडी सरकारांचा काळ सुरू झाला. काँग्रेसच्या टेकूवर औट घटकेची दोन-तीन ‘बिगर काँग्रेसी’ सरकारे त्यावेळी देशाने पाहिली. त्यापैकी एक होते इंदरकुमार गुजराल यांचे. त्यांच्या सरकारात जयपाल रेड्डी यांना मंत्रीपद मिळाले. पुढे 1999 मध्ये म्हणजे जवळजवळ 21 वर्षांतर रेड्डी पुन्हा स्वगृही काँग्रेस पक्षात परतले. त्याचे फळही त्यांना मंत्रीपदाच्या रूपाने मिळाले. काँग्रेस आघाडीचे डॉ.मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये (यूपीए-1) रेड्डी नगरविकास खात्याचे मंत्री होते. यूपीए-2 सरकारातही नगरविकास आणि पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाची जबाबदारी त्यांनी सांभाळली. आताचे तेलंगणा आणि पूर्वीच्या हैदराबादमधील मुदगुल येथे जन्मलेल्या जयपाल रेड्डी यांची राजकीय कारकीर्द खूप मोठी राहिली. अविभाजीत आंध्र प्रदेशमध्ये ते चार वेळेस विधानसभेवर निवडून गेले. पाच वेळेस लोकसभेवर विजयी झाले. राज्यसभेच्याही दोन टर्म्स त्यांना मिळाल्या. याशिवाय तीन सरकारांत महत्त्वाचे मंत्रीपद त्यांनी सांभाळले. अत्यंत बुद्धिमान आणि सुस्पष्ट विचार असलेले जयपाल रेड्डी बोलतानाही त्याच अंदाजात बोलत. इंग्रजीवर असलेले प्रभुत्व आणि बोलताना शब्दांवर जोर देत स्पष्ट आवाजात बोलण्याची त्यांची खास लकब होती. इंदिरा गांधींच्या आणीबाणीला विरोध करणाऱया जुन्या-नव्या काँग्रेस नेत्यांची एक फळीच त्याकाळी काँग्रेसबाहेर पडली होती. हे सर्वच नेते आपापल्या ठिकाणी दिग्गज आणि तालेवार होते. त्यातील काहीजण जनता राजवटीनंतर ‘इंदिरा राज’ आल्यावर लगेच काँग्रेसवासी झाले. काही जणांनी शेवटपर्यंत काँग्रेस आणि इंदिरा विरोधाचेच राजकारण केले. काहींना मधल्या काळातील आघाडी सरकारांमध्ये मंत्रीपदाची लॉटरी लागली, तर काहींना पुढे वाजपेयी सरकारमध्ये. जयपाल रेड्डी हे इंदिरा पर्वातील याच आणीबाणीविरोधी ‘स्क्वॉड’चे एक बिनीचे शिलेदार होते. ते पुन्हा काँग्रेसवासी जरूर झाले, पण आणीबाणीविरोधातील आणि नंतरच्या काळातील त्यांची राजकीय कारकीर्द यामुळे ते अधिक लक्षात राहिले. या आणीबाणीविरोधी ‘स्क्वॉड’चे अनेक शिलेदार गेल्या काही वर्षांत काळाच्या पडद्याआड गेले. आता जयपाल रेड्डीही गेले.

आपली प्रतिक्रिया द्या