मोनेगिरी- बिंडू सोनाळकर

 

>> संजय मोने

 

आमच्या कट्टय़ावरच्या सगळय़ांच्या पदव्या एकत्र केल्या असत्या तरी कमी पडल्या असत्या अशा असंख्य पदव्या नावापुढे असणारे बिंडू सोनाळकर. रस्ते बांधणाऱया कंपनीत सर्वेसर्वा असणारे सोनाळकर, नेत्यांना त्यांची योग्य जागा जरूर दाखवायचे. पण पुढे या प्रयत्नांनंतर त्यांनी वसुधैव कुटुंबकम म्हणत स्वतच्या कामाची चुणूक परदेशातही दाखवली.

 

लेखाच्या सुरुवातीलाच सांगतो, बिंडू असं लिहिलंय त्यात ‘बिं’च्या ऐवजी ‘गां’असं आहे किंवा तसं वाचावं. घाबरू नका, पण त्या अक्षरात जो बदल केला आहे तो आपला समाज किंवा वाचकवर्ग अजूनही भंपक आणि तथाकथित सभ्यतेच्या मर्यादा पाळत असल्याच्या दिवास्वप्नात आहे, यामुळे बदलला आहे. अर्थात निवडणुका आणि त्या वेळी किंवा त्याच्या आधी विभागीय नेते आणि वक्ते यांच्याकडून वापरल्या जाणाऱया भाषेपेक्षा हा बदल अत्यंत मवाळच म्हणायला पाहिजे. अर्थात आमचे हे जे सोनाळकर आहेत त्यांचं दुःख किंवा समस्या, त्यांच्या तोंडून ज्या शिव्या जातात त्याहून आगळ्याच होत्या.

मुळात ते आमच्या स्वघोषित बुद्धिमान कट्टय़ाचे मानकरी नव्हते. पण एके संध्याकाळी सोनाळकर आलिशान गाडीतून उतरले आणि कट्टय़ावर बसता बसता त्यांनी शिवी हासडली.

“बिंडू साला सगळी मेहनत फुकटची. समोरच्याला कळत नाही, पण कोसडीचा साला मंत्री  झालाय.” तिथेच त्यांना आम्ही बिंडू सोनाळकर ही पदवी बहाल केली.

“नेमकं काय झालंय आणि इथे या आमच्या ठिकाणी येऊन अशा शिव्या घालणारे तुम्ही कोण?”

आमच्यातल्या एकाने विषयाला तोंड फोडलं, हे जरा घातक आहे. कारण असंच एका विषयाला तोंड फोडता फोडता त्याचंच तोंड फोडलं गेलं होतं.

“मी सोनाळकर.” असं म्हणून त्यांनी आपला परिचय दिला. असंख्य पदव्या त्यांच्या नावापुढे होत्या. आमच्या कट्टय़ावरच्या सगळय़ांच्या पदव्या एकत्र केल्या असत्या तरी त्यांच्यापेक्षा कमी होत्या. आमच्यातल्या एकानेही कबूल केलं नाही, पण मनातून सोनाळकर सगळय़ांना आवडले होते, पटले होते, असं म्हटलं तर ते जास्त योग्य झालं असतं.

नेमकं काय झालंय, या त्यांना विचारल्या गेलेल्या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिलं नाही. त्याऐवजी म्हणाले, “जाऊ दे हो. आपलीच मोरी आणि थुकायची चोरी.” त्यांच्या तोंडून बाहेर पडणाऱया त्या वाक्यगंगेला प्रतिशब्द शोधणं हा लेख लिहिताना अत्यंत कठीण गेलेलं आहे.

“च्यायला! आपण प्रत्येक वेळेला नेमक्या चुकीच्या लोकांनाच निवडून देतो आणि मग ते पुढे आपली… जाऊ दे! मी तुमच्यात बसायला संध्याकाळी आलो तर चालेल का? 2-3 दिवस चाचणी घ्या आणि मग पाहिजे तर मांडीवर लाथ घालून…”

आम्ही या त्यांच्या वाक्यावर त्यांना आपल्यात घेतलं आणि त्या दिवसापासून आमची संध्याकाळ रंगायला लागली. हे सोनाळकर अत्यंत गरीब घरातले. वडील अचानक वारले तेव्हा ते आठ वर्षांचे होते. एक मोठी बहीण आणि लहान भाऊ असं वडिलांच्या मागे उरलेलं कुटुंब. आई त्या काळातली मॅट्रिक पास, पण गृहिणी. उत्कृष्ट स्वयंपाक करायची. त्यामुळे तिने आपल्या पोळपाट आणि लाटण्याला गरिबी व परिस्थिती याच्याशी लढण्यासाठी हत्यार बनवलं. घरात जेवायला लोक येऊ लागले, पण आपल्या मुलांनी शिकावं ही तिची इच्छा होती. आपण ज्या जातीत जन्माला आलो त्या जातीला आता कोणी विचारत नाही. त्यामुळे आपणच आपला मार्ग शोधायला हवा.

सोनाळकर एकदा म्हणाले, “आम्ही भावंडं शिकत होतो, आईला मदत करण्यासाठी काय काय केलंय? पहाटे तीन वाजता उठायचो. भाज्या चिरायचो, बाकी सगळे व्याप होतेच. 20-25 किलो डाळिंब्या आम्ही तिन्ही भावंडं मिळून सोलायचो. सगळं सहा वाजेपर्यंत संपायचं. मग व्यायामशाळा. तब्येत उत्तम पाहिजे असं आई म्हणायची. मग सगळे कॉलेजमध्ये जायचो. आम्ही तीनही भावंडं कायम हुशारच होतो. बुद्धिमत्तेमुऴे, शिवाय नाईलाज तर होताच.”

“सोनाळकर, तुम्ही काय करता?” काहीही न करणाऱया आमच्यातल्या एकाने विचारलं. व्याजाचे लाखभर रुपये पूर्वजांमुळे येतात ही त्याची कमाई.

“मी एका रस्ते बांधणाऱया कंपनीत सर्वेसर्वा आहे. बरेचदा बाहेर असतो. ठिकठिकाणच्या अधिकारी आणि सत्तेत असलेल्यांना भेटतो. रस्त्यांचा मार्ग, त्यासाठी वापरलं जाणारं साहित्य, म्हणजे खडी, सिमेंट किंवा रेती आणि इतर अनेक गोष्टी आहेत, तुम्हाला नाही कळणार.”

“सोनाळकर, आजकाल रस्ते एकदम खराब का असतात? पूर्वी आमच्या समोर एक छोटासा रस्ता बांधला होता. चाळीसएक वर्षं झाली तरी अजूनही ठणठणीत आहे. असं कसं होतं?”

“नको त्या लोकांच्या हातात हव्या त्या गोष्टींच्या चाव्या गेल्या तर तिजोरी फुटायला वेळ लागत नाही.”

“म्हणजे?”

“वाघाचे पंजे. आम्ही जेव्हा रस्त्याच्या बाबतीतले आराखडे घेऊन समोरासमोर बसतो तेव्हा त्यांना ताट पण कळत नसतं (‘ता’ ऐवजी जो शब्द तुमच्या डोक्यात आहे तोच), पण एवढं माहीत असतं की, शेवटी पैसा कसा काढायचा. मग त्यांच्या मागण्या सुरू होतात. मागण्या म्हणजे आज्ञाच. टेंडर पास झालं तर अमुक गोष्टी तमुककडूनच घ्या, फलाण्या गोष्टी ढिकाण्याकडूनच घ्या आणि हे अमुकतमुक म्हणजे सगळी त्यांचीच माणसं. एका ठिकाणी असाच एकजण मला अक्कल शिकवत होता. कुठेतरी बघितलेला चेहरा. शेवटी न राहवून विचारलं, साहेब तुम्हाला त्या एका प्रकरणात कैद झाली होती ना? च्यायला आपल्याला कोणी विचारलं असतं आणि झालीच असती अटक तर शरमेनं मेलो असतो. पण तो म्हणाला जुनी गोष्ट झाली हो! दोन टर्म आमदार आहे मी. सांगतो तेव्हढय़ाचं टेंडर भरा, पास करून देतो. मग आपली टक्केवारी ठरवून घेऊ. तुरुंगाची हवा खाऊन आलेला माणूस रक्ताचं पाणी करून, अर्धपोटी राहून शिक्षण घेतलेल्या माणसाशी टक्केवारीच्या भाषेत बोलतो? सणक जाणार नाही तर काय? डोक्याचा कुकर होतो गच्च वाफेने भरलेला. इथे कट्टय़ावर येऊन एक शिवी हासडली की वाफ सुटते आणि या शिव्या मी त्या विशिष्ट माणसाला देत नाही स्वतलाच देतो. साला शिक्षण घेतो आयुष्यात प्रगती व्हावी म्हणून आणि समोरचा खुर्चीतला माणूस ‘खां’ड खाजवायची अक्कल नाही मला शिकवतो? कशाच्या जोरावर? की कोणाच्या जोरावर?”

“इतका त्रास होतो, मग नोकरी का नाही सोडत?”

“का? सोडायची का? ते निर्लज्जपणे पैसे मागतात. त्यांनी बंद करावं ना? मला काय इतर अनेक ठिकाणी नोकऱया मिळतील. त्यांना काय मिळेल सत्ता गेली तर?” बिनतोड सवाल होता त्यांचा. त्यांचा राग ते मग आमच्या समोर मोकळा करायचे. माणूस फार खिलाडू होता. बाहेरगावाहून आले तर काहीतरी तिथला खास पदार्थ खायला आणायचे. घरी कधीतरी जोरदार पार्टी द्यायचे. एकेदिवशी ते यायचे बंद झाले. काही दिवस चुटपूट वाटली. पाच-सहा महिन्यांनंतर ते अचानक पुन्हा उगवले.

“अरे, बिंडू होतात कुठे?”

“हिंदुस्थान सोडला. आता परदेशात असतो. तिथल्या देशात रस्ते बांधायचं काम करतो. सोपा सरळ व्यवहार. काम किती? त्याचे पैसे इतके. चोख कारभार! मस्त चाललंय. जे शिकलो त्याचा पुरेपूर मोबदला मिळतो आणि समाधान.”

“आणि मग आपल्या देशाचं काय?” राष्ट्रगीत वाजल्यानंतर बसल्या जागेतून तसूभरही न हलणाऱया आमच्या एका मित्राने विचारले.

“शिक्षणाला मान नाही आणि बुद्धिमत्तेला बिनडोक राज्यकर्ते विकत घ्यायला बघतात तिथे राहायचेच कशाला आणि वसुधैव कुटुंबकम हे आपणच शिकलो ना?”

बिंडू म्हणाले आणि कधी नव्हे तो कट्टय़ावरच्या सगळय़ांनी विचारात मग्न असल्याचा अभिनय सुरू केला. जसा आपण सगळे देशभक्त असल्याचा करतो अगदी तसा.