स्वयंपाकघर- आपली माणसं

>> तुषार प्रीती देशमुख

उर्मिलासारख्या आज असंख्य घरकाम करणाऱया महिला किंवा पुरुष आहेत, ज्यांनी आपल्या मेहनतीने स्वतच्या व अनेकांच्या स्वयंपाकघराची व संपूर्ण घराची जबाबदारी स्वीकारून नोकरीधंद्यात व्यस्त असलेल्यांना आधार देण्याचे काम केले आहे, ज्यामुळे आपण त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवून निर्धास्त असतो. आपल्या घरात काम करणाऱया या व्यक्तींना पाहून आयुष्यात सकारात्मक कसे राहायचे हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे असते.

स्वयंपाकघरात स्वयंपाक करणं जितकं सोपं, तितकंच त्यानंतरचा पसारा आटपणं कठीण. तसंच सगळ्यांना जेवायला वाढून खाऊ घालणं जितकं सोपं, तितकंच त्यानंतरची भांडी घासणं कठीण, नाही का? मग त्यासाठी आपण गडी, कामवाली बाई ठेवतो. म्हणजेच त्यांना आपण आदराने ‘स्वच्छता कामगार’ म्हणू शकतो.

लहानपणी आजीकडे राहायला गेलो की, तिच्याकडे घरकामासाठी ‘सीता’ नावाची आजी दुपारी व रात्री यायची. खूप खोडकर होती. तिला मी ‘सीतामाई’ म्हणून हाक मारायचे. तसंच मित्राकडे एकदा राहायला गेलो तेव्हा त्यांच्याकडे अनेक वर्षं घरकाम करणाऱया ‘सुमित्रा सुर्वे’ आजी होत्या. त्यांना सगळे ‘पांडूची आई’ म्हणून हाक मारायचे. त्यांची ओळख झाली. आयुष्यभर अनेकांच्या घरी जाऊन हेच काम करून त्यांनी कष्टाने पैसे कमावून आपला संसार सांभाळला.

आपल्या घरी जेव्हा कुणी पाहुणे येतात आणि म्हणतात, “काय स्वच्छ आहे तुमचं घर! किती टापटीप आहे!’’ तेव्हा आपल्याला खूप आनंद होतो. त्याचं सर्व श्रेय जातं ते आपल्या घरामध्ये काम करणाऱया अशा व्यक्तींना.

अशीच आमची ‘उर्मिलाताई’, जिच्याकडे आमच्या स्वयंपाकघराची व घराच्या साफसफाईची सर्व जबाबदारी असते. रोज दिवा ते दादर हा दिव्य प्रवास कधी महाकाय गर्दीतून, तर कधी डब्याच्या दरवाजाला लटकून, स्वतचा जीव टांगणीला लावून उर्मिला येते. सकाळी स्वतच्या घरातील जेवण करण्यापासून ते स्वच्छतेपर्यंतची सर्व कामं आटपून वेळेवर आमच्या घरी पोहोचते. स्वयंपाकघरातला  पसारा आणि भांडय़ांचा ढीग पाहून हसतमुखाने ओढणी कमरेला बांधून घराची स्वच्छता करण्यासाठी ती सज्ज होते.

संपूर्ण घराची स्वच्छता केल्यानंतर ती स्वयंपाकघराकडे वळते. भांडी लख्ख घासून, स्वयंपाकघरातला ओटा आवरून, स्वच्छ करून, भांडी पुसून जागेवर लावून, मग ती पोटाला आधार मिळावा म्हणून खाऊन घेते. त्यासाठीदेखील तिच्या मागे लागावं लागतं. तिला मी नेहमी चिडवत असतो, “आज कितीजणांनी सेल्फी काढला ट्रेनमध्ये आमच्या उर्मिला मातोंडकरबरोबर…’’

कधी तिचा मूड नसला किंवा ती थोडीशी टेन्शनमध्ये असल्याचं जाणवलं की, मी तिची आणखी मस्करी करून किंवा काहीतरी खोडय़ा काढून तिला टेन्शनमधून बाहेर काढण्याचा नेहमीच प्रयत्न करतो. उर्मिलासारख्या असंख्य हातावर पोट असणाऱया मेहनती, जिद्दी महिला संकटांना हसतमुख सामोऱया जातात. आपल्या घरात काम करणाऱया या व्यक्तींना पाहून आयुष्यात सकारात्मक कसं राहायचं हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं असतं. तिच्या कष्टाळू प्रवासात तिला मोलाची साथ मिळते ती तिचे पती उदय वाक्कर, मुलगी प्राची, आई व संपूर्ण कुटुंबाची.

तिला कोणतीही कामं करायला सांगावं लागत नाही. ती सर्व कामं तिच्याप्रमाणे करते. जी कामे तिची नाहीत तीसुद्धा वेळ पडली तर ती करते. आमच्या घरी कुणीही आजारी पडलं तर ती त्याचीदेखील काळजी घेते. यालाच तर ‘आपली माणसं’ म्हणतात ना! ही सर्व जुळलेली नाती म्हणजे पूर्वजन्मीचे ऋणानुबंध जणू.

उर्मिला नेहमी स्वयंपाकघरात एखादा पदार्थ करत असताना मी रील किंवा शूट करतो, त्याचा तिला खूप आनंद होतो. तिलादेखील स्वयंपाकाची प्रचंड आवड असल्यामुळे एखादा पदार्थ मी तयार करताना ती मला आवडीने मदत करते.  एका रविवारी मटणवडय़ाचा  बेत असताना तिने वडे हाताने थापून, तळून टम्म फुगलेले गरमागरम वडे आम्हाला खाऊ घातले. ती हाताने थापलेली भाकरीदेखील उत्तम बनवते. तिचा काम करताना आणि जेवण करताना एक रील बनवून पोस्ट केला होता तेव्हा तो पाहून तिच्या चेहऱयावरचा आनंद पाहून खूप भरून आलं होतं. तिच्या घरच्यांना तिच्या कामाबद्दल वाटणारा अभिमान हीच खरी तिच्या कामाची तिला मिळालेली पोचपावती होती.

उर्मिलासारख्या आज असंख्य घरकाम करणाऱया महिला किंवा पुरुष आहेत, ज्यांनी आपल्या मेहनतीने स्वतच्या व अनेकांच्या स्वयंपाकघराची व संपूर्ण घराची जबाबदारी स्वीकारून नोकरीधंद्यात व्यस्त असलेल्यांना आधार देण्याचं काम केलं आहे, ज्यामुळे आपण त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवून निर्धास्त असतो व ते आपलं घर स्वतचं घर समजून स्वच्छ ठेवण्यात यशस्वी होतात. अशा या सर्व घरकाम करणाऱयांना मानाचा मुजरा!

[email protected]

(लेखक युटय़ूब शेफ आहेत.)