लेख – कोरोनानंतरचे लाभदायक उद्योग

>> शेखर चरेगावकर

कोरोनामुळे देशाची आर्थिक परिस्थिती काही प्रमाणात विस्कळीत झाली. येणार्‍या काळामध्ये आर्थिक परिस्थिती पूर्वपदावर आणण्याकरिता केंद्र सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. कोरोना येण्यापूर्वीची उद्योगधंद्याची परिस्थिती आणि कोरोनानंतरची उद्योगधंद्यांची परिस्थिती यामध्ये नक्कीच काहीअंशी फरक असणार आहे. तो फरक स्वीकारून इथून पुढे उद्योगधंदे क्षमतेने करावे लागतील. अशा परिस्थितीत कोणते उद्योग लाभदायक व सहजतेने करता येतील याचा विचार करता 17 यशस्वी उद्योग आहेत. 15 प्रभावित उद्योग आहेत. ज्यामध्ये प्रत्येकाला पूर्ण क्षमतेचा वापर करावा लागेल.  

कोरोना व्हायरस संसर्गामुळे निर्माण झालेली व होणारी परिस्थिती कशी आहे? हिंदुस्थानसह इतर देशांची तुलना कोरोना व्हायरसच्या वाढीच्या प्रमाणात पाहता हिंदुस्थानमध्ये कोरोना रुग्णांची टक्केवारी लोकसंख्येच्या प्रमाणात कमी आहे. इतर देशांचे क्षेत्रफळ, जगाच्या एकूण क्षेत्रफळापैकी देशाचे प्रमाण टक्केवारीनुसार, लोकसंख्येची घनता आणि कोरोना रुग्णांचा विचार होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कोरोना व्हायरसमुळे जग ठप्प झाले होते. ते हळूहळू पूर्वपदावर येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन केल्यामुळे देशाची उद्योग व्यवस्था विस्कळीत झाली असे वाटत असले तरी 17 यशस्वी उद्योग आजही तितक्याच सक्षमपणे करता येण्याजोगे आहेत.

कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे देशाची भयावह परिस्थिती निर्माण होण्यापूर्वीच केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. रुग्णसंख्या वाढू नये यासाठी देशभरामध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. संपूर्ण देशातील उद्योगधंदे बंद राहिले. दरम्यान, देशातील गोरगरीब जनतेला दोन वेळचे अन्न मिळावे यासाठी केंद्र सरकारने व राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली. यामुळे देशात व महाराष्ट्रात एकही नागरिक एक दिवस उपाशी राहिला नाही. कोरोना काळातील परिस्थिती पाहता येणारा काळ कसा असेल यावर आता विचारमंथन होणे आवश्यक आहे.

कोरोनामुळे देशाची आर्थिक परिस्थिती काही प्रमाणात विस्कळीत झाली. येणार्‍या काळामध्ये आर्थिक परिस्थिती पूर्वपदावर आणण्याकरिता केंद्र सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. कोरोना येण्यापूर्वीची उद्योगधंद्याची परिस्थिती आणि कोरोनानंतरची उद्योगधंद्यांची परिस्थिती यामध्ये नक्कीच काहीअंशी फरक असणार आहे. तो फरक स्वीकारून इथून पुढे उद्योगधंदे क्षमतेने करावे लागतील. अशा परिस्थितीत कोणते उद्योग लाभदायक व सहजतेने करता येतील याचा विचार करता 17 यशस्वी उद्योग आहेत. 15 प्रभावित उद्योग आहेत. ज्यामध्ये प्रत्येकाला पूर्ण क्षमतेचा वापर करावा लागेल.

शेती व शेतीपूरक व्यवसाय, बागकाम, पर्यायी ऊर्जा, उपचार, नेटवर्क मार्केटिंग, सागरी वाहतूक, शाकाहार, ऑनलाइन कोचिंग, विमा, आरोग्यसेवा डेटा विज्ञान, कृषी पर्यटन, शेअर बाजार गुंतवणूक, मानसिक आरोग्य, पर्यायी औषध, अध्यात्मशास्त्र, डिजिटल उत्पादने. येणार्‍या काळामध्ये या उद्योगांवर अधिक भर द्यावा. तरुणांनी या उद्योगांकडे वळावे. मार्गदर्शन घ्यावे. उद्योग उभारणी करावी. त्याचबरोबर प्रभावित उद्योगांमध्ये नोकरी, प्रवास, पर्यटन, दवाखाने, चित्रपट व चित्रपट उद्योग, यातायात, स्थानिक वाहतूक, हॉटेल, खेळ, स्थावर मिळकत, तेल आणि गॅस, बांधकाम, कार्यक्रम, पायाभूत सुविधा, वाहन उत्पादन याचा समावेश होतो. सदरचे उद्योग आपल्या उत्पादनात, उत्पादन प्रक्रियेत तज्ञांचा सल्ला घेऊन बदल करावेत.

सध्या कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या आहेत. त्याचबरोबर आर्थिक जडणघडणीमध्ये ग्रामीण भागाचा मोठा वाटा आहे. नव्याने ‘वर्क फ्रॉम होम’ नवीन कार्यप्रणाली सुरू झाली आहे.परकीय बाजारपेठ सुरळीत चालू होईपर्यंत देशातल्या देशात उद्योग वाढतील अशी परिस्थिती आहे. छोटे व्यापारी, उद्योजक कर्ज कमी असल्याने नव्याने उभारी घेतील हे आशादायक चित्र आहे. युरोपियन राष्ट्रांच्या मानाने हिंदुस्थान हा तरुणांचा देश म्हणून सर्वश्रुत आहे. औषध निर्यातदार म्हणून हिंदुस्थान स्वावलंबी बनेल. चीनबरोबर इतर राष्ट्रांचा वाढता विरोध पाहता चीनमधील अन्य देशांचे उद्योग हिंदुस्थानात येतील. काही उद्योग येण्याची नांदी सुरू झाली आहे. हे आशादायक चित्र आहे.

हिंदुस्थानातील शाकाहारी पाककृतीकडे संपूर्ण जग कौतुकाने पाहतो. यामुळे येणार्‍या काळांमध्ये ऑरगॅनिक आहाराला महत्त्व प्राप्त होईल. हिंदुस्थानातील सूर्यप्रकाश, निरोगी हवामानाचे परकीयांना प्रचंड वेड आहे. यामुळे पर्यटन वाढेल. केवळ पर्यटनामुळे अर्थक्रांती होऊ शकते हे गोवा राज्य उत्तम उदाहरण आहे. हिंदुस्थानातील परदेशात स्थलांतरित झालेल्या युवकांना पुन्हा आपल्या हिंदुस्थानकडे यावे असे चित्र निर्माण होईल आणि हिंदुस्थान एक ‘नॉलेज हब’ बनेल व ‘मेक इन इंडिया’ प्रत्यक्षात येईल हा आशावाद आहे. कोरोना संसर्गामुळे निर्माण झालेली परिस्थिती व येणारी परिस्थिती एकंदरीत अशी असेल.

इतर देशांशी तुलना

हिंदुस्थान आणि इतर देशांशी कोरोनासंदर्भात तुलना करताना काही मूलभूत फरक लक्षात घेणे जरुरी आहे. त्यात देशाचे क्षेत्रफळ, जगाच्या एकूण क्षेत्रफळाशी त्या देशाच्या क्षेत्रफळाचे असलेले प्रमाण, देशाची लोकसंख्या, त्या लोकसंख्येची प्रतिकिलोमीटर घनता आणि त्या तुलनेत कोरोना रुग्णांचे प्रमाण अशा पद्धतीने विचार करावा लागेल. हिंदुस्थानचा विचार केला तर जगाच्या क्षेत्रफळाच्या तुलनेत आपले क्षेत्रफळ 2.30 टक्के आहे आणि लोकसंख्येची घनता 464 एवढी मोठी आहे. तरीही कोरोनाची रुग्णसंख्या त्या प्रमाणात 33,062 एवढीच आहे. त्याचवेळी चीनचे क्षेत्रफळ जगाच्या तुलनेत 6.50 टक्के आहे आणि लोकसंख्येची घनता 153 आहे. मात्र त्याप्रमाणात कोरोनाचे रुग्ण 82 हजारांपेक्षा जास्त आहेत. जर्मनीचे क्षेत्रफळ जगाच्या तुलनेत 0.24 टक्के आहे आणि लोकसंख्येची घनता 240 इतकी आहे. मात्र कोरोनाचे रुग्ण 1 लाख 61 हजार 539 एवढी आहे. दुसरीकडे अमेरिकेसारख्या देशाचे क्षेत्रफळ जगाच्या तुलनेत 6.50 टक्के आणि लोकसंख्येची घनता फक्त 36 आहे. तरीही तेथे कोरोनाची रग्णसंख्या 10 लाख 64 हजार 950 एवढी भयंकर दिसते. अशावेळी हिंदुस्थानमधील परिस्थिती तुलनेत बरी म्हणावी लागेल.

(लेखक सहकारतज्ञ, सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष आहेत.)

शब्दांकन : गोरख तावरे

आपली प्रतिक्रिया द्या