आयुर्वेद आणि कोरोना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आज कोरोनावर ऍलोपॅथीमध्ये लस शोधण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. काही देशांनी लस शोधून काढल्याचा दावाही केला आहे. या प्रयत्नांना यश येईल तेव्हा येईल, पण आपल्या घरातील आयुर्वेद या प्राणघातक संकटाला दूर ठेवण्यासाठी कधीचाच सज्ज आहे.

आयुर्वेद शास्त्रानुसार कोरोना वैश्विक महामारीचा उल्लेख ग्रंथात जनपदोध्वंस आजार असा केला जातो. यात सध्याच्या भौगोलिक परिस्थिती आणि शारीरिक लक्षणांचा उल्लेख सापडतो. दूषित हवा, दूषित पाणी, दूषित जमीन आणि दूषित काळ या सर्व दूषित घटकांमुळे समाज व्यवस्थेत गंभीर आजार निर्माण होऊन मोठय़ा प्रमाणात संसर्ग आणि मृत्यू होतो. या परिस्थितीला आयुर्वेदात जनपदोध्वंस म्हणतात. या कोरोना महामारीत हवा, पाणी, जमीन, काळ हे सगळेच दूषित झालेले आहे. या जनपदोध्वंसाचे कारण सांगताना शास्त्रात ‘अधर्म’ या शब्दाचा उल्लेख आढळतो. अधर्म म्हणजे मानवी शरीराने त्यांच्या शारीरिक आणि मानसिक स्थितीचा केलेला अतिवापर तसेच चुकीचा वापर. त्यामुळे शरीराची, मनाची प्रतिकारशक्ती कमकुवत होते. यालाच आपण व्यावहारिक भाषेत रोगप्रतिकारशक्ती म्हणतो.

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी शरीराचा धर्म पाळावा. म्हणजे अधर्म हे रोगप्रतिकारशक्ती कमी होण्याचे कारण असेल तर माणसाने माणुसकी हा धर्म पाळल्यास रोगप्रतिकारशक्ती नक्कीच सुधारेल. शरीरधर्म म्हणजे काय तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी नक्की काय कराल…

ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्यानंतर आयसीयूमध्ये ऑक्सिजन लावण्यापेक्षा शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यासाठी फुप्फुसाचे आणि शरीराचे ऑक्सिजन वहन कार्य (O2 Carring Capacity) वाढवण्यासाठी, शरीरातील सर्व अवयव सुस्थितीत राहण्यासाठी दररोज सकाळी प्राणायाम करा.

कॅल्शियम वाढीच्या गोळ्या घेण्यापेक्षा रोज सकाळचं कोवळं ऊन घ्या.

जेवणात दुधाचे पदार्थ, कडधान्य, मनुका, बदाम, अंजीर, अक्रोड, शेंगदाणे या पदार्थांचा आवर्जून समावेश करा.

‘लवकर निजे लवकर उठे, त्यास ज्ञान, संपत्ती, आरोग्य भेटे’ हा लहानपणी शिकवलेला श्लोक म्हणजे आरोग्याची गुरुकिल्ली आहे. त्यामुळे शरीर निरोगी राहते. या नियमाचं पालन करा. पाश्चिमात्य पद्धतीपेक्षा आयुर्वेदाचे पालन करा, जेणेकरून शरीर निरोगी राहण्यास मदत होईल.

कोरोनाची लागण किंवा साखळी तोडण्याकरिता…

यामध्ये गरम पाण्यात मीठ, हळद घालून गुळण्या करणे, गरम पाणी पिणे, वाफ घेणे, धूप करणे, बाहेरून आल्यावर अंघोळ करणे हे नियम पाळल्यास शरीराची शुद्धी होईल. घरात कडुलिंब , कापूर अशा औषधी वनस्पतींच्या धुपामुळे घरातील आणि शरीरातील नकारात्मकतेचे सकारात्मक ऊर्जेत रूपांतर होण्यास मदत होईल. घरातील फरशी मिठाच्या पाण्याने आणि गोमूत्राने पुसून घ्यावी. बोलताना अंतर राखावे. स्वच्छ कापडाने नाक, तोंड झाकावे. कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये.

दिनचर्या आणि ऋतुचर्या

आयुर्वेद शास्त्र नियमबद्ध पद्धतीने जीवन कसं जगावं हे शिकवणारं शास्त्र आहे. या महामारीत लोकांना याचे महत्त्व नक्कीच पटले आहे. यातील सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे वेळेचे पालन करणे. सकाळी लवकर उठणे, लवकर झोपणे, जेवणाच्या वेळा पाळणे, घरचे अन्न खाणे, व्यायाम, योगासने, प्राणायाम करणे त्यामध्ये सातत्य ठेवणे आता महत्त्वाचे आहे.

करोना आणि लॉकडाऊन हा आपल्यासाठी निसर्गाने विचारमंथनासाठी दिलेला कालावधी आहे. जे आपण चुकलोय ते पुन्हा करणार नाही आणि शरीरासाठी, आरोग्यासाठी जे आवश्यक आहे, ते सर्वतोपरी पाळण्याचा निश्चय करूया. त्यामुळे कोरोनासारखी महामारी जाईल, पण अशा महामारीविरुद्ध लढण्यास आपण सक्षम होऊ! चला, आयुर्वेदाची सोबत करूया…आरोग्य निरोगी अन् समृद्ध करुया!

लहान मुलं आणि वृद्धांकरिता…

लहान मुलं आणि वृद्ध यांच्या तब्येतीची या काळात विशेष काळजी घेतली पाहिजे. रोगसंसर्ग टाळावा म्हणून घराबाहेर पडू नये. तुळशीचे पान, हळदीचे पान घालून केलेला चहा घ्यावा. चहाची पातही वापरावी. प्राणायाम करावा. गच्चीत, गॅलरीत पाचदहा मिनिटे फेऱया माराव्यात. मनाची शक्ती वाढवण्यासाठी पुस्तकं वाचावीत, संगीत ऐकावे, प्रवचने ऐकावीत. त्यामुळे चिडचिड होणार नाही. मनात भीती निर्माण होईल अशा बातम्या बघू नयेत.

घरगुती सोपे उपाय

  • तहान लागेल तेव्हा गरम केलेलं पाणी कोमट करून पिणे. घशाला चटका बसेल असे पाणी पिऊ नये.
  • तुळशीपान, सुंठ, दालचिनी, काळी मिरी, हळद यांमध्ये गूळ मिसळून केलेला काढा घ्यावा. ज्यांना पित्ताचा त्रास असेल त्यांनी किंवा पित्त प्रकृती असलेल्यांनी दालचिनी, मिरे कमी प्रमाणात वापरावे किंवा वापरू नये.
  • उपाशी राहणे टाळावे. दोन वेळा घरचे सात्त्विक, पचायला हलके अन्न खावे. खूप तिखट, तेलकट खाऊ नये.
  • घसा खवखवत असल्यास लवंग, गूळ एकत्र करून चघळावी.
  • चहामध्ये आलं, गवती चहा वापरावा.
  • सितोपलादी चूर्ण, लवंगादी वटी, कंठसुधारक वटी, महासुदर्शन काढा, शृग्यादी काढा, श्वासकुठार रस, श्वासकासचिंतामणी रस अशी औषधे घरात असावीत. वैद्यांच्या सल्ल्याने घ्यावीत.
  • नियमित स्वच्छता पाळावी. मास्क वापरावा.
  • लक्षणे जाणवल्यास टाळाटाळ करू नये.

कोरोना सेंटर्स-ठाणे

  • पाटीलपाडा फ्लायओव्हरखाली, हिरानंदानी इस्टेट, जी. बी . रोड , ठाणे
  • शंकरराव  पेडणेकर रोड पोलीस क्वार्टरसमोर, टेंबिनाका, ठाणे (प)
  • नामदेववाडी, नितीन कंपनी समोर, रामबाण आंबेडकर नगर,  गणेशवाडी ठाणे (प)
  • ठाणे हेल्थ चेअर, गोखले रोड, नौपाडा, ठाणे (प.)
  • लाइफ केअर हॉस्पिटल, वर्तन नगर, ठाणे (प.)
  • एकता हॉस्पिटल, एल एल पी ऍण्ड आय सी सी यू, आर डब्ल्यू सावंत रोड, एफ बिल्डिंग, माजिवडा रोड, ठाणे
  • पणंदीकर हॉस्पिटल, ठाणे स्टेशन रोड, उथळसर.
  • Toll free no. 1800222108
  • Helpline no. 022 25371010
  • https://www.covidbedthane.in