लेख – स्वयंशिस्त, नियम पाळा…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दिलीप देशपांडे

कोरोना या संसर्गजन्य विषाणूच्या वाढत्या प्रसाराने एकूणच संपूर्ण देशात, जगभर भीतीचं वातावरण निर्माण झालंय. एक अनामिक भीती प्रत्येकाच्या मनात आहे असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. नुसतीच भीती नाही तर साशंकता आहे. आता काय होणार? पण अशी नुसतीच मनाशी भीतीची भावना बाळगून उपयोग नाही. आपण सरकारने घालून दिलेले नियम, दिलेल्या सूचना, वेळोवेळी डॉक्टर्सनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन किती करतोय? अनेक जणांना पोलिसांनी चोप दिल्याचे आपण वाचतो, पहातो. उगीच मारतात का त्यांना? ही अशी जी मार खाणारी उगीच कामाशिवाय रस्त्यावर येतात हे टाळायला हवे. ते स्वतःचं आयुष्य तर धोक्यात आणत आहेतच, त्याचबरोबर कुटुंबातील व्यक्तींनाही धोका निर्माण करत आहेत. त्याचबरोबर समाजालाही.

भीती प्रत्येकाच्याच मनात आहे. दुधाचा चटका बसला की माणूस ताकही फुंकून पीत असतो, तशीच काही अवस्था झाली आहे. भाजी आणायला, दूध आणायला बाहेर जाणारा प्रत्येक माणूस साशंक असतो. त्याच्या नजरेसमोर कोरोनाचा विषाणूच दिसत असतो. काहीशी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे, असे जाणवते. खरं तर शासन, प्रशासन, तज्ञ डॉक्टर्सकडून वेळोवेळी महत्त्वाच्या सूचना दिल्या जात आहेत, पण आपण त्या सूचनांकडे किती गांभीर्याने बघतोय, त्यांचे पालन करतोय, हा विचार करायला हवा आहे. मनाशी भीती बाळगून राहण्यापेक्षा सूचनांचे पालन करणे हे महत्त्वाचे आहे. घरातच राहा. कुठल्याही परिस्थितीत घर सोडून बाहेर जाऊ नका. घरातला जो कोणी भाजी, दूध, औषधे आणायला बाहेर जाईल त्याने सामाजिक अंतर पाळणे, तोंडाला रुमाल बांधणे, बाहेर कोणाशीही हस्तांदोलन न करणे, घरी आल्यावर हात पाय साबणाने स्वच्छ धुणे, आणलेल्या दुधाच्या पिशव्या, भाजी स्वच्छ धुवून घेणे, औषध बॉटल डेटॉल पाण्याने पुसून घेणे, या महत्वाच्या गोष्टी जरी केल्या तरी भीती बाळगण्याचे काम नाही. पण हेच जर पाळले नाही तर केव्हा आणि कसा धोका निर्माण होईल हे सांगता येत नाही. म्हणून या संकटाशी मुकाबला घरात राहूनच करायचा आहे. नियम पाळायचे नाहीत आणि उगीच भीतीच्या वातावरणाची निर्मिती करायची हेही योग्य नाही.

दोन प्रकार आहेत. भीतीची भावना होऊन घरात बसलेली कुटुंबे आहेत, तर काही बेजबाबदारपणे नियमांचे उल्लंघन करणारी आहेत. कोरोना हे जागतिक संकट, आपत्ती आहे. जवळपास एकशे साठ देशात हा रोग पसरला आहे. इटली, इराण, स्पेन, अमेरिका आदी देशांची परिस्थिती आपण बघतो, वाचतो, अतिशय भयावह आहे. अनेक देशांची आरोग्य व्यवस्था उत्तम होती, तरी पण त्या त्या देशातील जनतेने सरकारी आदेश गंभीरपणे घेतले नाही. मौजमजा केली. परिणामी आजच्या परिस्थितीला त्यांना सामोरे जावे लागत आहे. व्यवस्था कोलमडली आहे. त्या सरकारमध्येही अपयशाची भावना आली आहे. आपल्या सरकारने वेळीच उपाय योजले आहेत. फक्त जनतेचा प्रतिसाद महत्वाचा आहे.

सर्व मंदिरे दर्शनासाठी बंद केली आहेत. तरी पण काही लोक प्रार्थनास्थळी सापडतात. आता सर्व प्रार्थना घरी बसूनच करायला हवी. या परिस्थितीत नियम- कायदे सर्वांना सारखेच हवे. एकत्र जमणे टाळायला हवे. एक गोष्ट अशी की, भाजीपाला, दूध, किराणा, औषधे यांसाठी दिवसभर सवलत दिल्याने अनेक लोक दररोज या नावाखाली बाहेर निघतात. बँकांमध्ये अनुदानाच्या रकमांसाठी गर्दी होत आहे. सामाजिक अंतर ठेवण्याचा नियमही पाळला जात नाही. काही ठराविक शहरातच नियम पाळला जातो. अशा परिस्थितीत रोज रोज भाजीपाला, किराणा घ्यायला निघायलाच नको. तीनचार दिवसाआड चार तासाची सूट द्यायला हवी. तरच हे बाहेर निघण्याचे प्रमाण कमी होईल.

ही समस्या, हे संकट फार मोठे आहे. म्हणूनच, शाळा-महाविद्यालये, दुकाने, कंपन्या, बंद ठेवून कर्मचारी संख्या मर्यादित केली आहे.   सीमा बंद केल्या. परराज्यातील, राज्यातील, मजूर, स्थलांतर करणार्‍या कामगारांना निवारा केन्द्रात आश्रय दिला. जेवणाची व्यवस्था केली आहे. सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहे. प्रशासकीय अधिकारी, पोलीस यंत्रणा, डॉक्टर्स, संपूर्ण आरोग्य विभाग, बँक कर्मचारी अशाही परिस्थितीत सेवा देत आहेत. नियमांचे पालन करून आपण सहकार्य करायला हवे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुटुंबातील सदस्य म्हणून विनंती करत आहेत. उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, वारंवार विनंती करत आहेत, त्या मागचे गांभीर्य ओळखा. भीतीची भावना सोडा. नियम पाळा. घरातच राहा. महाराष्ट्र तिसNया टप्प्याच्या उंबरठ्यावर असल्याचे वारंवार सांगितले जातेय.

या निमित्ताने एक सांगावेसे वाटते. संकटाची तीव्रता लक्षात घेता ज्या शिस्तीत राहायला हवे ते तर सोडाच, बेशिस्तपणाचा कळस झालाय. लॉकडाऊन, संचारबंदीची जनतेने ऐशीतैशी करुन ठेवली आहे. ही अतिशय वाईट आणि तितकीच भयावह गोष्ट आहे. आता परत महाराष्ट्रात देशभरात ३ मेपर्यंत लॉकडाउन जाहीर झाले आहे. आतातरी परिस्थितीचे गांभीर्य ओळखा, डोळे उघडा. सरकार आपल्याला सांगत आहे, तुम्ही खबरदारी घ्या, आम्ही जबाबदारी घेतोय. तेव्हा प्रत्येकाने खबरदारी ही आपली जबाबदारी समजावी.

[email protected]