लेख- कोरोना लस – अजून किती वेळ लागेल?

731

>> अक्षय दिलीप पाटील  

कुठल्याही लसीला बाजारात येण्यासाठी मोठय़ा दिव्यातून जावं लागतं तेव्हा वेळ हा लागणारच आणि ते योग्यदेखील आहे. कारण औषधांचा थेट संबंध हा रुग्णांच्या आयुष्याशी असतो. असे असले तरी जमेची बाजू म्हणजे कोरोनाच्या काही लसी या मानवी चाचणीच्या अंतिम टप्प्यात आहेत आणि त्यांचे परिणाम आशादायी आहेत. म्हणून घाबरून न जाता आशादायी राहा. कोरोनाची लस लवकरच उपलब्ध होईल आणि पुन्हा एकदा पूर्वीसारखे आयुष्य हे सुरू होईल, अशी अपेक्षा करूया.

कोरोनाने संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. संपूर्ण जगात आतापर्यंत 1.7 कोटीपेक्षा जास्त लोकांना या महामारीचा संसर्ग झाला आहे. संसर्ग झालेल्या लोकांच्या संख्येनुसार अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे (45 लाख +), तर ब्राझील द्वितीय क्रमांकावर आहे (25 लाख +) आणि त्यानंतर हिंदुस्थान तृतीय क्रमांकावर आहे (15 लाख +). मागील काही दिवसांपासून हिंदुस्थानात कोरोनाचा संसर्ग होण्याचा वेग वाढलेला आहे.

या संसर्गापासून संपूर्ण जगात मृत्यू झालेल्या लोकांची संख्या ही 6.7 लाखांपेक्षा अधिक आहे (6%), तर या संसर्गातून पूर्णपणे बरे झालेल्या लोकांची संख्या ही 1.06 कोटीपेक्षा जास्त आहे (94%). सध्या जगात 58 लाखांपेक्षा जास्त लोक हे कोविड-19 संक्रमित रुग्ण आहेत.

झपाटय़ाने पसरणाऱया या रोगाचा रिकव्हरी रेट जरी चांगला असला तरी प्रत्येक व्यक्ती आणि संपूर्ण जग हे वाट बघतेय ती लस तयार होण्याची. सध्या प्रत्येक व्यक्ती फक्त एकच प्रश्न विचारात आहे, लस कधी येणार?

लस म्हणजे काय?

लस हे एक जैविक औषध असते, जे एखाद्या विशिष्ट संसर्गजन्य रोगास सक्रिय प्रतिकारशक्ती प्रदान करते.

लसीमध्ये सामान्यतः एक घटक असतो, जो रोगास कारणीभूत सूक्ष्म जीवासारखा असतो आणि बहुतेकदा सूक्ष्म जंतू (Micro-organism), त्याचे विष (Toxins) किंवा त्याच्या पृष्ठभागावरील प्रथिने (Surface Proteins) किंवा कमकुवत अथवा मृत स्वरूपातला सूक्ष्म जंतू असतो.

हा घटक शरीराच्या रोगप्रतिकारक यंत्रणेस उत्तेजित करतो आणि बाहेरील घटकाला ओळखण्यासाठी, त्याला नष्ट करण्यासाठी आणि भविष्यात त्या घटकाशी संबंधित कोणत्याही सूक्ष्म जीवांना ओळखण्यासाठी आणि नष्ट करण्यासाठी उपयोगी असतो.

लस रोगप्रतिबंधक (उदाहरणार्थ पोलिओ, चिकन पॉक्स, गोवर, गालगुंडा, रुबेला, इन्फ्लुएन्झा (फ्लू) आणि हिपॅटायटिस ए आणि बी) किंवा उपचारात्मक औषध असू शकते.

corona-vaccine

लस रोगप्रतिकारक यंत्रणेस विषाणू किंवा जिवाणू ओळखण्यास आणि त्यांच्याशी लढण्यासाठी प्रशिक्षण देऊन कार्य करते. हे करण्यासाठी व रोगप्रतिकारक शक्ती उत्तेजित करण्यासाठी रोगजनकांचे काही घटक शरीरात आणले जाणे आवश्यक असतात.

त्यांना अँटिजेन म्हणतात आणि ते सर्व व्हायरस आणि बॅक्टेरियांवर असतात. रोगप्रतिकारक शक्ती त्यांना शत्रू म्हणून ओळखते आणि अँटिबॉडी तयार करते, भविष्यासाठी त्यांना लक्षात ठेवते. जर बॅक्टेरिया किंवा विषाणू पुन्हा दिसू लागले तर रोगाचा प्रसार होण्यापूर्वी आणि रोगराई पसरण्याआधी रोगप्रतिकारक शक्ती ताबडतोब त्यांना ओळखते आणि त्यांच्यावर आक्रमण करते.

लस बाजारात कशी येते?

 • प्रत्येक लस एफडीएच्या (Food Drug Administration) मंजुरीपूर्वी त्यांची सुरक्षा आणि कार्यक्षमता सुनिश्चित करण्यासाठी कठोर चाचण्या घेण्यात येतात.
 • प्रथम प्राण्यांवर या लसीच्या चाचण्या घेण्यात येतात. चाचणीच्या वेळी संशोधक उंदीर, ससे, गिनी पीग आणि माकडांसह प्राण्यांमध्ये लसींचा अभ्यास करतात.
 • चाचणीच्या या टप्प्यात उत्तीर्ण (सुरक्षित आणि प्रभावी) झालेल्या लसींना एफडीए मानवी चाचणीची तीन टप्प्यांची मालिका सुरू करण्यास मान्यता दिली जाते.
 • या चाचण्यांमधील लोक स्वेच्छेने सहभागी होतात आणि त्यांना अभ्यासाचा हेतू आणि संभाव्य जोखीम समजावणे आवश्यक असते.
 • पहिल्या टप्प्यातील चाचणीदरम्यान लसीच्या सुरक्षिततेचे मूल्यांकन करण्याचे प्राथमिक लक्ष्य असलेल्या सुमारे 20 लोकांच्या गटामध्ये लसची चाचणी केली जाते.
 • दुसऱया टप्प्यातील चाचण्यांमध्ये चाचणी विस्तृत केली जाते, ज्यामध्ये 50 ते शेकडो लोक समाविष्ट होतात. या टप्प्यात लसीच्या सुरक्षिततेचे मूल्यांकन करणे चालू राहते आणि संशोधकदेखील लसचा प्रभावीपणा आणि लसीची मात्रा याबद्दल माहिती गोळा करतात.
 • सुरक्षित आणि कार्यक्षम असल्याचे निश्चित केलेल्या लसी नंतर तिसऱया टप्प्यातील चाचण्यांमध्ये प्रवेश करतात, ज्या शेकडो ते हजारो स्वयंसेवकांच्या घेण्यात येतात आणि लसीच्या कार्यक्षमतेविषयी माहिती गोळा करतात .
 • लस तपासणीच्या सर्व टप्प्यांमधून पास झाल्यास उत्पादक एफडीएकडे लस परवान्यासाठी अर्ज करू शकतो.
 • एफडीए सामान्य लोकांमध्ये लसीचा वापर मंजूर करण्यापूर्वी क्लिनिकल चाचण्या, सुरक्षा चाचण्या, शुद्धता चाचण्या आणि उत्पादन पद्धतींच्या निकालांचा विस्तृतपणे परीक्षण करते.
 • एफडीएच्या परवानगीनंतर लस बाजारात उपलब्ध होते.
 • तथापि, एफडीएच्या मंजुरीनंतरही लसींची सुरक्षितता तपासणी कधीही संपत नाही.
 • एफडीएची मॅन्युफॅक्चरिंग प्रोटोकॉल, बॅच शुद्धता आणि मॅन्युफॅक्चरिंग सुविधेवर नजर असतेच.
 • याव्यतिरिक्त बऱयाच लसींवर चतुर्थ टप्प्या चाचण्यादेखील होतात, ज्या हजारो किंवा त्याहून अधिक लोकांमध्ये होतात आणि ज्या लसींच्या सुरक्षित आणि कार्यक्षमतेचे परीक्षण करतात.

कोविड-19 लसीची सद्यस्थिती

जगभरातील संशोधक 160 पेक्षा जास्त लसींवर काम करत आहेत. कोरोना व्हायरसविरुद्ध 25 पेक्षा जास्त लसी मानवी चाचण्यांच्या स्थितीत आहेत. लस बाजारात पोहोचण्यापूर्वी साधारणतः कित्येक वर्षे संशोधन आणि चाचणी आवश्यक असते, परंतु वैज्ञानिक पुढील वर्षापर्यंत सुरक्षित आणि प्रभावी लस तयार करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

कुठल्याही लसीला बाजारात येण्यासाठी मोठय़ा दिव्यातून जावं लागतं तेव्हा वेळ हा लागणारच आणि ते योग्यदेखील आहे. कारण औषधांचा थेट संबंध हा रुग्णांच्या आयुष्याशी असतो. असं असले तरी जमेची बाजू म्हणजे कोरोनाच्या काही लसी या मानवी चाचणीच्या अंतिम टप्प्यात आहेत आणि त्यांचे परिणाम आशादायी आहेत. म्हणून घाबरून न जाता आशादायी राहा. कोरोनाची लस लवकरच उपलब्ध होईल आणि पुन्हा एकदा पूर्वीसारखे आयुष्य हे सुरू होईल, अशी अपेक्षा करूया.

[email protected]

(लेखक फॉर्म्युलेशन डेव्हलपमेंट रिसर्चर आहेत)

आपली प्रतिक्रिया द्या