
>> पंढरीनाथ सावंत
कोरोना तथा कोविड-19 नावाच्या भयंकर महामारीच्या तडाख्यात सगळे जग सापडले असताना त्याला कारणीभूत ठरलेल्या व्हायरस नावाच्या सुक्ष्मातिसूक्ष्म जंतूचा साक्षात्कार माणसाला जवळजवळ रोजच्या वर्तमानपत्रांमधून होत असतो. पण काम कसे चालते याची माहिती आतापर्यंत तरी कोण्या वृत्तपत्राने दिल्याचे पाहण्यात नाही. ती ‘फिलिप्स’च्या ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान’ कोशाच्या आधारावर सादर करीत आहे.
व्हायरस हा अत्यंत सूक्ष्म असा संसर्गजन्य सजीव आहे. त्याचा आकार 10 पासून 200 पर्यंत नॅनोमीटर्स इतका सूक्ष्म असतो. त्याच्यात फक्त डीएनए किंवा आरएनए यापैकी कोणत्या तरी एकाच प्रकारचे ‘जेनेटिक’ साहित्य असते. ते कॅपसिड या नावाने ओळखल्या जाणाऱया प्रोटीनच्या आवरणात बंदिस्त असते.
व्हायरस स्वतंत्र अस्तित्व उपभोगू शकत नाही. तो बॅक्टेरिया अथवा प्राण्यांच्या पेशीत शिरतात तेव्हाच त्याची वाढ होते आणि पैदास होते. कारण त्यांच्यात ऊर्जानिर्मिती आणि प्रोटीन पृथक्करण होत नाही. ते जेव्हा एखाद्या पेशीत शिरतात त्यावेळी त्या यजमान पेशीच्या चयापचयाची क्रिया बिघडवतात. त्यामुळे व्हायरसचे पुनर्निर्माण-पैदास सुलभ होते. व्हायरसची संख्या वाढत चालली की, यजमान पेशी मरते किंवा तिची चयापचय क्रिया बदलते.
व्हायरसेसचे नियंत्रण करणे अत्यंत अवघड असते. कारण त्यांना ठार करण्यासाठी पराकोटीचे उपाय करावे लागतात.प्राण्यांच्या शरीराने यावर काही संरक्षक उपाययोजना तयार केल्या आहेत. त्या ‘हंटरफेटॉन’ आणि ‘ऍण्टिबॉडीज’ तयार करतात, पण त्या विशिष्ट व्हायरसेसवरच काम करतात.
बहुतेक प्रकरणांमध्ये व्हायरल रोगांचा एक हल्ला रुग्णाला आयुष्यभरासाठी ‘इम्युनिटी’ बहाल करतो. म्हणजे तो रोग पुन्हा होत नाही. जसे देवी येऊन गेल्या की पुन्हा येत नाहीत.जिथे विशिष्ट एजंट वेगळा काढता येतो तेव्हा ‘व्हॅक्सिन’ विकसित करणे शक्य असते. पण काही व्हायरसेस उदा. एन्फ्लुएंझाचा व्हायरस इतक्या झपाटय़ाने वाढतात की व्हॅक्सिन परिणामशून्य बनते. ऍण्टिव्हायरल ड्रग्ज फार थोडी आहेत.
व्हायरसचा संसर्ग हा मनुष्य जातीसमोरचा सर्वात मोठा आरोग्यविषयक सवाल आहे. ऍण्डिबायोटिक्सनी बॅक्टेरियापासून होणाऱया या संसर्गावर बऱयापैकी नियंत्रण मिळविले आहे.अनेक व्हायरस संसर्ग केवळ विशिष्ट व्हॅक्सिन्सच्या सहाय्याने बरे करता येतात. माणसाला होणाऱया व्हायरसजन्य रोगांमध्ये खास आहेत. पिवळा ताप, रेबीज, इन्फ्लुएंजा (फ्लू), मिसल्स (गोवर) आणि पोलिओ मायलिटीस व्हायरसेस वनस्पतींच्या अनेक रोगांना जबाबदार असतात. त्यांना नियंत्रित करणे अवघड असते.
कॅन्सर होणाऱया व्हायरसेसच्या भूमिकेवर 1908 सालापासून मोठय़ा प्रमाणावर संशोधन चालू आहे. जिवंत पेशींना त्यांच्या स्वतःच्या ‘इंटरफेरॉन’ उत्पादनापासून काही संरक्षण मिळते. ते व्हायरसला पायबंद घालणारे दुसरे प्रोटीनपण करते.
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)




























































