लेख – कोरोनाची साथ – संकट आणि संधी

816

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन ([email protected])

जगामध्ये आलेल्या प्रत्येक संकटाकडे हिंदुस्थानने एक संधी म्हणून बघितले पाहिजे. कोरोना हे संकट असले तरी त्यातून हिंदुस्थानसमोर अनेक आर्थिक संधी निर्माण होत आहेत, त्यांचा आपण पुरेपूर वापर केला पाहिजे. गेल्या काही दिवसांमध्ये चीन, जो जगातला सर्वात मोठा तेल खरेदी करणारा देश आहे, त्याने तेलाची आयात थांबवली आहे. त्यामुळे तेलाचे भाव कोसळले आहेत. ही आपल्या अर्थव्यवस्थेकरिता मोठी संधी आहे आहे. हिंदुस्थान औषधे निर्यात करणारा एक मोठा देश आहे. चिनी कारखाने बंद पडल्यामुळे जगातल्या कुठल्याही देशात औषधे निर्माण करण्याकरिता लागणारा कच्चा माल मिळत नाही. याचा हिंदुस्थानने फायदा उठवून कच्चा माल हिंदुस्थानमध्ये निर्माण करून जगाला निर्यात करणे फायद्याचे आहे.

चीनमध्ये 10 फेब्रुवारीपर्यंत कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या बळींची संख्या 722 झाली असून एकाच दिवशी 86 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यातील बहुतांश मृत्यू हुवेई प्रांतातील आहेत. चिनी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या 34 हजार 546 इतकी झाली आहे. चीनच्या बाहेर एकूण 4 हजार 214 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आता जगभरात होत आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेला कमकुवत आरोग्य व्यवस्था असलेल्या देशांमध्ये कोरोना विषाणूचा फैलाव होण्याची चिंता भेडसावत आहे. कोरोना विषाणूचा फैलाव आतापर्यंत 15 देशांमध्ये झाला आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी चीनने वुहानसह काही शहरे पूर्णपणे बंद केली आहेत. वुहान हे कोरोना विषाणूच्या फैलावाचे मुख्य केंद्र आहे.

चिनी अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम

या साथीच्या आजाराची बातमी फुटली त्या दिवशी वुहान प्रांतातील भांडवली बाजार कोसळला. साथीची खातरजमा होण्याआधी चीनच्या आर्थिक प्रगतीचा दर जेमतेम सहा टक्के इतका होता. त्यात या विषाणूने किमान दोन टक्क्यांनी घट केल्याचे दिसते. कोरोना विषाणू चीनची अर्थव्यवस्था पोकळ बनवत आहे. गेल्या 30 वर्षांत प्रथमच चीनची अर्थव्यवस्था इतकी ढासळली आहे. अमेरिकेबरोबर चाललेल्या व्यापार स्पर्धेमुळे चिनी कारखाने आधीपासूनच दबावात आहेत आणि आता कोरोना व्हायरसने त्यांना आणखी एक धक्का दिला आहे. गेल्या 30 दिवसांत 42 हजार दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक बुडल्यामुळे चीनच्या अर्थव्यवस्थेवर प्रचंड मोठा ताण आला आहे.

चीनचा शेअर बाजार नऊ टक्क्यांहून अधिक खाली आला आहे. त्याचबरोबर 2020च्या सुरुवातीपासूनच चीनचे चलन युआन आतापर्यंत 1.2 टक्क्यांनी कमकुवत झाले आहे. या परिस्थितीला पूर्ववत करण्यासाठी सरकारकडून शेअर बाजारात नव्याने 174 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्यात येणार असल्याचे चीनच्या मध्यवर्ती बँकेने म्हटले आहे.

या साथरोगाची एवढय़ा झपाटय़ाने लागण झाली की, अख्खे वुहान शहर आता ठप्प पडले आहे. हुवेई प्रांतातील हे एक महत्त्वाचे शहर असून त्यापाठोपाठ राजधानी बीजिंग, शांघाय, शेनझेन, ग्वांगझू या चीनमधील मोठय़ा शहरांमध्ये वेगाने त्याची लागण झाली. सन 2002-03 मध्ये चीनमधूनच पसरलेल्या ‘सार्स’ या रोगामुळे चीन आणि हाँगकाँगमध्ये 800 जणांचे बळी गेले होते.

संसर्ग हिंदुस्थानात पसरू नये म्हणून आंतरराष्ट्रीय विमानतळांवर बाधित देशांमधून येणाऱ्या प्रवाशांचे ‘स्क्रीनिंग’ जातीने केले जात आहे. अशा प्रवाशांमधून आढळलेल्या संशयित रुग्णांचा व त्यांच्या निकट सहवासितांचा पाठपुरावा आणि आवश्यक कार्यवाही एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत केली जात आहे. या विषाणूजन्य आजाराच्या निदानाची सोय पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत उपलब्ध आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर चीनमधील वुहान प्रांतातून हिंदुस्थानात परतणाऱ्या हिंदुस्थानी विद्यार्थ्यांच्या तपासणीसाठी हिंदुस्थानी सैन्यातर्फे विशेष सुविधा करण्यात आली आहे. सैन्यातर्फे हरयाणातील मानेसर येथे विशेष वैद्यकीय कक्ष स्थापन करण्यात आला असून तेथे सुमारे 300 जणांना ठेवण्याची सुविधा आहे. या कक्षात विद्यार्थ्यांची तज्ञ डॉक्टरांतर्फे तपासणी करण्यात येणार असून त्यांना किमान दोन आठवडे देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. हिंदुस्थानमध्ये आतापर्यंत कोरोना विषाणूचा फक्त एक रुग्ण आढळला आहे.

संसर्गाचा प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी लोकांना आरोग्य शिक्षण, वैयक्तिक स्वच्छता, जैव-वैद्यकीय कचऱ्याची सुयोग्य पद्धतीने विल्हेवाट तसेच रुग्णालयांची तयारी, विलगीकरण कक्ष, गंभीर रुग्णांसाठी व्हेंटिलेटर आणि जीवनावश्यक प्रणाली सुविधा सक्षमपणे कार्यरत राहतील याची दक्षता घेण्यात येत आहे. रुग्णांनी आणि नातेवाईकांनी घ्यावयाची काळजी याबाबत जनतेचे प्रबोधन होण्यासाठी ‘आरोग्य शिक्षण’ कार्यक्रम राबविण्यात येत आहे. आपण देशाच्या स्तरावर याचा चांगला मुकाबला करत आहोत.

ज्यांनी नुकताच नवीन ‘कोरोना’ विषाणूबाधित देशात प्रवास केला आहे, अशा व्यक्तींनी विनाविलंब वैद्यकीय सल्ला घ्यायला हवा. गंभीर आजार असणाऱ्या रुग्णांना रुग्णालयात भरती करून योग्य उपचार मिळण्यासाठी व्यवस्था करायला हवी. रुग्णांना उपचार देणाऱ्या डॉक्टर, नर्सेस आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांना सदर आजाराचा प्रादुर्भाव होऊ शकतो. म्हणून संबंधितांनी काळजी घ्यायला हवी. अशा प्रकारे ‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक आणि नियंत्रणात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबवणे गरजेचे आहे.

जगामध्ये आलेल्या प्रत्येक संकटाकडे हिंदुस्थानने एक संधी म्हणूनसुद्धा बघितले पाहिजे. कोरोनामुळे हिंदुस्थानला निर्माण होणाऱ्या संकटाचा मुकाबला केला पाहिजे, जे सरकार नक्कीच करत आहे. मात्र त्यामुळे हिंदुस्थानसमोर अनेक आर्थिक संधी निर्माण होत आहेत, त्यांचा आपण पुरेपूर वापर केला पाहिजे. गेल्या काही दिवसांमध्ये चीन, जो जगातला सर्वात मोठा तेल खरेदी करणारा देश आहे, त्याने तेलाची आयात थांबवली आहे. त्यामुळे जगात तेलाचे भाव कोसळले आहेत. यामुळे हिंदुस्थानमध्ये तेलाचे दर तीन ते चार रुपयांनी खाली आले आहेत. ही आपल्या अर्थव्यवस्थेकरिता एक मोठी संधी आहे आहे. हिंदुस्थान औषधे निर्यात करणारा एक मोठा देश आहे. चिनी कारखाने बंद पडल्यामुळे जगातल्या कुठल्याही देशात औषधे निर्माण करण्याकरिता लागणारा कच्चा माल मिळत नाही. याचा हिंदुस्थानने फायदा उठवून कच्चा माल हिंदुस्थानमध्ये निर्माण करून जगाला निर्यात करणे फायद्याचे आहे.  आशा करूया की, हिंदुस्थान सरकार या संधीचा नक्कीच फायदा घेईल.

आपली प्रतिक्रिया द्या