लेख – एका नव्या युगासाठी… न्यू नॉर्मलसाठी…!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> वैद्य विक्रांत जाधव

संस्कारांचे पुनःस्मरण ही व्याधीपासून दूर राहण्याची गुरुकिल्ली आहे. अर्थात आपल्याला हे उमजायला कोरोनाचा काळ यावा लागला. गरम ताज्या पदार्थांची चव, वेळेवर जेवण, झोप, आराम यांचा फायदा कोरोनाने दाखवला. ती आता काळाची गरज झाली आहे. व्याधी लांब ठेवण्याचे हे सोपे कृत्य आहे. जेवणानंतर गरम पाणी, सकाळी उषःपान हे सध्या घराघरात दिसत आहे. म्हणून पावसाळा असूनही तुलनेने साध्या व्याधी कमी आहेत. हे जाणून घ्या व आपल्या पूर्वीच्या सवयी घेऊन ‘न्यू नॉर्मल’ होऊया. मग कोरोना काय, इबोला काय, सगळे दूर राहतील.

कोरोना या व्याधीने काय दिले, काय हिसकावले, भविष्य कसे असेल याची चिंता तरुण वर्ग व मध्यमवयीन व्यक्तींना अधिक त्रासू लागली आहे. कारण त्यांना आयुष्य काढायचे आहे. कोविड-19ने मृत्यू होणाऱयांमध्ये मधुमेही व हृदयरोगी यांचे प्रमाण अधिक दिसत आहे. अमेरिकेसारख्या देशामध्ये 42 टक्के मधुमेही व 48 टक्के मधुमेही आहेत. यावरून कल्पना येईल की, ज्या व्यक्तींनी अस्तित्वात असलेल्या व्याधीची औषधे वक्तशीरपणे घेतली नाहीत, त्यांना कोविडने तडाखा दिला. खरे तर अजून कोविड कुणालाच कळला नाही, पण कोविडने विश्वाला एक नवीन जन्म दिला व त्याला ‘न्यू नॉर्मल’ असा शब्द प्रचलित झाला आहे. या पार्श्वभूमीवर तरुण व मध्यमवयीन व्यक्तींना अनुवांशिक व्याधी कशी थांबवता येईल, कशी जास्तीत जास्त काळ दूर ठेवता येईल याचा विचार करणे आवश्यक आहे. तीन गोष्टींचा प्रामुख्याने विचार करावा लागेल. एक – मधुमेह टाळण्यासाठी काय करायचे, हृदय आनंदी ठेवण्यासाठी आणि निरोगी मनासाठी काय करायचे. दोन्ही व्याधी मनाच्या संबंधित असल्याने व अनेक व्याधी मनाच्या विळख्यात अडकलेल्या असतात. म्हणून मन प्रसन्न ठेवणे तेवढेच महत्त्वाचे.

आज मधुमेह हिंदुस्थानात वाढत आहे, पण जागतिक संघटनेने वर्तविलेली भविष्यवाणी ‘हिंदुस्थान मधुमेहाची राजधानी असेल’ मात्र खरी ठरलेली नाही. म्हणजे हिंदुस्थानी संस्कृतीतील आहार, दिनचर्या यामध्ये मधुमेह कमी करण्याची योजना दडलेली आहे. आपण मधुमेहाला समजूनच घेतले नाही. त्याच्याशी शत्रू म्हणून वागतो की मित्र? ‘मित्र’ म्हणून जवळीक करून मैत्री जपली तर मधुमेहाचा त्रासच होणार नाही. आपल्या तारुण्यातील विहार, आचार व आहार आपल्या पुढील वयातील आरोग्याचे भविष्य ठरवते. प्रथम आपल्याला आपल्या गावच्या, आपल्या देशाच्या आहार पद्धतीचा अवलंब करायला हवा. आपल्या वातावरणाला पूरक अशा आहाराचा वापर न करता आपण पाश्चात्त्य देशांतील पदार्थांचा, विचारांचा, समीकरणांचा स्वीकार केला, ज्यामुळे आपली शक्ती, प्रतिकारक्षमता असेपर्यंत शरीराने साथ दिली, पण एका बिंदूनंतर त्रास वाढतोच असे दिसून आले आहे. आपण नैसर्गिक पोषक घटकांना सोडून रासायनिक व गोळ्यांमध्ये पोषित घटक शोधू लागलो. नाश्त्याच्या सवयी बदलल्या, इतर प्रांतातील नाश्ता जवळ केला. ताज्या गरम नाश्त्यावरून तळलेला, शिळा, जिभेचे चोचले पुरवणारा, मैद्याचा फुगवणारा नाश्ता करू लागलो. तूप, साखर, पोळी, दडपे पोहे, सांजा, भाजणीचे थालीपीठ, उपमा, घावने, असे विविध पोषक चवदार पदार्थ अगदी सणाप्रमाणे बाहेर जाऊन खाण्याचे झाले आणि कधीतरी वेगळेपण म्हणून खायला हवे ते रोजच्या खाण्यातील पदार्थ झाले. आहाराची संकल्पनाच बदलली. का? कधी? आपण प्रश्नच केला नाही. तो प्रश्न आता कोरोनाने विचारायला भाग पाडले. आपणच काय, संपूर्ण अमेरिकेत आता 72 टक्के लोक घरी बनवून खायला लागले आहेत. त्यामुळे त्यांचे आरोग्य सुधारू लागले ही सत्य परिस्थिती आहे. आपणही बदललो, पण निरोगी आयुष्याच्या भविष्यासाठी अशी दिनचर्या कायमस्वरूपी हवी. जसे अधिक मास हा हिंदू कालगणनेला सम स्थितीत आणतो तसे कोरोना काळ आपल्याला सम स्थितीत आणण्यासाठी आहे असे समजावे.

आपला आहार हा मुळातच षड्रसात्मक आहे. पालेभाज्या, फळभाज्या, कडधान्ये, पोषक मधूर पदार्थ, पाचक मसाले, निवडक वेगळेपणा म्हणून मांसाहार असा विविधतेने नटलेला आहे. आज मात्र एकाच गुणाचा आहार, शिळा आहार, बंद डब्यातील आहार, नासवलेले पदार्थ, इतर देशांतील तिथे उपयुक्त असलेला आहार यांची ओढ अधिक दिसून येते. आयुर्वेद आणि धर्मशास्त्र यांचा मेळ करून समाजाच्या आरोग्याचा विचार करून आपला पूर्वापार आहार योजलेला आहे. त्याऐवजी इतर आहार घेणाऱया देशांमध्ये काय घडतेय ते आपण पहात आहोत. सर्व रसात्मक आहार हा शरीराच्या सर्व धातूंची वाढ करणारा आहे. एकाच रसाच्या सेवनाने विकारांची वृद्धी होते हे काळाने दाखवले आहे. आपल्या आहारात तूप, दूध, दुग्धजन्य पदार्थ हवेतच. तुपाचे गुणात्मक फायदे अनेक आहेत व तोटे अगदी थोडे आहेत. तुपाला स्नेह म्हणतात. शरीर व मनाचा स्नेह वाढवणारे तूप आहे, वाताचा उद्रेक कमी करणारा आणि शरीरस्थ अग्नी सम स्थितीत ठेवणारा हा पदार्थ आहे. म्हणूनच सर्व यज्ञांमध्ये प्रथम तुपाची आहुती दिली जाते. तूप आपल्या जिभेपासून, रस धातूपासून ते शुक्र धातूपर्यंत सर्व क्रियांना समस्थित करणारे आहे. म्हणून जेवणाच्या पहिला घासाबरोबर तुपाचे सेवन करावे. अति पौष्टिक, पचायला जड असे पदार्थ जेवणाच्या सुरुवातीला सेवन करायला हवेत. आज गोड पदार्थ, अतिशीत पेय, थंड अनैसर्गिक पदार्थ जेवणाच्या अखेरीस खाण्याची प्रथा तरुण व मध्यमवयीन वर्गात प्रचलित झाली ती पाश्चात्त्य देशातील आहे. तिथे षडरसात्मक आहार नाहीच. पाणी पिण्याचे प्रमाण अगदी थोडे आहे म्हणून ते द्रव पदार्थ घेतात व त्यातील अति पोषक मूल्येही ओढवून घेतात. आपली ती गरज नाही. मधुमेहाला आपण त्याने आमंत्रण देतो. आपल्याकडे घरी येताच पाणी देण्याची प्रथा आहे. म्हणून पाणी प्रकृतीप्रमाणे घ्यावे. पाच लिटर ही पाश्चात्त्य देशांची गरज आहे. मधुमेह हा मेदाचा, क्लेदाचा व्याधी वर्णन केला आहे. म्हणून पाण्याचे नियोजन आवश्यक आहे. अनुवंशिकता असल्यास त्या पिढीने अधिक काळजी घ्यायला हवी. आहार- विहारासोबत व्यायाम महत्त्वाचा ठरतो. तीही आपली परंपरा आहे. संपूर्ण शरीर व मनाला उल्हसित करणारा व्यायाम हवा. नुसत्या पिळदार व्यायामापेक्षा अगदी रोज घरी होईल असा व्यायाम निवडायला हवा. दोरीच्या उडय़ा, जोर- बैठका, जिन्याची चढउतर, श्वासाचे व्यायाम, जागीच धावणे अशा शारीरिक व्यायामांमुळे शरीर व मन सुदृढ राहते. योगासने, अगदी प्राणायाम, शवासन, त्रिकोणासन, हलासन यांचा अवलंब केल्यास शरीरक्रिया व अवयव उत्तम राहतात. हल्ली बऱयाच रहिवासी इमारती उंच आहेत. आठवडय़ातून तीनवेळा आपल्या सदनिकेपर्यंत जिन्यातून चालत गेलात तर आपली STRESS TEST होऊन हृदयालासुद्धा सुदृढ करील. शरीरस्थ चरबीही कमी करील. प्रमाणात नैसर्गिक गोड खावे. गोड फळे, घरात बनवले जाणारे पदार्थ खाण्याकडे अधिक कल ठेवा. अति थंड पदार्थ जेवणानंतर टाळा. भुकेचा विचार करून खा. अवेळी सतत खाणे टाळावे. हे अनुवांशिक व्याधी टाळण्याचे सूत्र आहे. बाहेर जाताना नाकात आतून तूप, तेल लावणे ही प्रथा आता अवलंबायला हवी. नमस्कार हा शेकहॅंड्सपेक्षा चांगला. आपले मसाले हे आपले रक्षक आहेत हे या कोरोना काळात सिद्ध झाले. संपूर्ण हिंदुस्थान मसाल्याचा काढा घेतोय. मसाले खाणाऱया देशामध्ये प्रतिकारक्षमता उत्तम आहे हे सिद्ध झाले.

मन हे संचारी असून मस्तिष्क व हृदय येथे संचार करीत असते. म्हणून मनाला लागले की, या दोन्ही ठिकाणी त्याची छटा उमटते. या दोघांच्या आरोग्यासाठी आपल्या संस्कारांमध्ये सकाळ, संध्याकाळी, जेवताना, झोपताना प्रार्थना, विशिष्ट दिवशी स्तोत्र पठण हे योजले होते. फक्त मंदिरामध्ये जाऊन नारळ फोडल्याने हे होत नाही. या संस्कारांचे पुनःस्मरण ही व्याधीपासून दूर राहण्याची गुरुकिल्ली आहे. अर्थात आपल्याला हे उमजायला कोरोनाचा काळ यावा लागला. गरम ताज्या पदार्थांची चव, वेळेवर जेवण, झोप, आराम यांचा फायदा कोरोनाने दाखवला. ती आता काळाची गरज झाली आहे. थंड जेवणाने होणारे वात व कफाचे विकार कमी होतात म्हणून गरम आहाराला महत्त्व आहे. व्याधी लांब ठेवण्याचे हे सोपे कृत्य आहे. जेवणानंतर गरम पाणी, सकाळी उषःपान हे सध्या घराघरात दिसत आहे. म्हणून पावसाळा असूनही तुलनेने साध्या व्याधी कमी आहेत. हे जाणून घ्या व आपल्या पूर्वीच्या सवयी घेऊन ‘न्यू नॉर्मल’ होऊया. मग कोरोना काय, इबोला काय, सगळे दूर राहतील.