
महाराष्ट्रातल्या एका राजकीयदृष्टय़ा अत्यंत जागरूक असलेल्या शहरात चोरांनी घरफोडीचा आणि घरातील माल लंपास करण्याचा धूमधडाकाच सुरू केलेला होता. रोज सामान्यतः वीस ते पंचवीस मोठय़ा चोऱ्या होऊन कोटय़वधी रुपयांची चोरी व्हायची. पोलिसांनाही याचा थांग लागेना आणि चोऱ्या वाढतच राहिल्या. अखेरीस एक जबाबदार सामाजिक कार्यकर्ता असे म्हणाला की, आपण आता आपला शेजारधर्म विसरत चाललो असल्याने अशा चोऱ्या होत राहणार आणि भविष्यात त्या वाढत जाणार. पोलिसांची गस्त अथवा गुरख्याची फेरी ही यातील काही शाश्वत वाटावी अशी सुरक्षिततेची योजना नव्हे. पण कधीकाळी आपण शेजारधर्म पाळून त्याचा पुरेपूर अंमल करून गुण्यागोविंदाने नांदत होतो. पैसे फार नसायचे पिंवा एक रुपया गाडीच्या चाकाएवढा दिसायचा हे खरेच आहे. पण एवढय़ा कमी चलनवलनाच्या काळात आपण आजच्यापेक्षा काल सुखी होतो असे म्हणण्याची वेळ आज आलेली आहे. आपले जगणे जसे जसे आणि ज्या वेगाने भौतिकतेकडे झुकते आहे त्यातून आपल्या सुरक्षिततेचे प्रश्न पण तितकेच गुंतागुंतीचे होत आहेत. घराला टाळे ठोकले की आपण बाहेर पडायला रिकामे अशीच आपली धारणा बनून गेली आहे. कारण काही झाले अथवा न झाले तरी हाती मोबाईल असतोच आणि त्यातून क्षणार्धात कुणाशीही संपर्क साधता येतो. त्यामुळे आपण मोठय़ा हौसेने प्रचंड रकमा खर्चून बांधलेल्या बंगल्याच्या बाबतीतसुद्धा बेफिकिरीने वागू लागलो आहोत. पूर्वी जर घराला कुलूप लावण्याची वेळ येत असे तर आपण आजूबाजूच्या म्हणजे उजव्या आणि डाव्या अशा दोन्ही बाजूंच्या शेजाऱ्यांना घराकडे लक्ष ठेवा असे सांगून जात असू. इतकेच नव्हे तर त्यांना आपली परतण्याची तारीखपण सांगत असू. आता आपण दिवसेंदिवस आत्ममग्न होऊ लागल्यामुळे आपणाला असे पुणाला सांगण्याची गरजच वाटेनाशी झाली आहे. त्यामुळे घरफोड्या या तर वाढतच राहणार पण त्यापुढे जाऊन एक वेळ अशी येईल की, आपल्या घरात काय शिल्लक राहणार, असा प्रश्न आपणाला पडल्याशिवाय राहणार नाही. आपण महापालिकेने रस्ते बनविण्याकरिता टाकलेली खडीसुद्धा आपली समजून बिनधास्तपणे घरात आणून त्याचे काय करायचे ते करत असतो. कदाचित घरपह्डय़ा करणारी चोर मंडळीसुद्धा ही माणसे उघड-उघड सार्वजनिक मालमत्ता लुटत असतील तर आपण त्यांच्या मालावर डल्ला मारला तर बिघडले कुठे, असाही विचार करण्याची शक्यता आहे. आणि पुन्हा माणूस जेव्हा चोऱ्या करण्याकडे वळतो तेव्हा तो निर्ढावलेलाच असतो. यामुळे चोऱ्यांची जागा आपोआपच दरोडे घेऊ लागतात. आणि पुन्हा रात्रीची लूटमार सुरू होत असते. पण आपल्याकडे प्रभातच्या चित्रपट काळात ‘शेजारी’ असा फार नितांतसुंदर चित्रपट काढलेला होता. आज त्याची आठवण होते आहे. पोलिसांच्या दंडुकेशाहीने चोऱ्या काही काळाकरिता थांबवता येतील, तसे भास निर्माण करता येतील. पण खरोखरच जर अशा चोऱ्या कमी व्हाव्यात असे वाटत असेल तर आपण आज ज्या शेजारधर्माकडे दुर्लक्ष करू लागलो आहोत त्याचा तितक्याच गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. कारण कधीकाळी शेजारधर्म इतका मनस्वीपणे जपला जात असे की, शेजाऱ्याचे घर हे आपलेच घर आणि आपले घर तेसुद्धा शेजाऱ्याचे घर असे मानण्याइतपत आपण शेजारधर्मात एकजीव होऊन गेलेलो होतो. आता पुन्हा नव्याने अशा शेवटाकडे चाललेल्या शेजारधर्माला पुन्हा पूर्वपदावर आणण्याची गरज आहे. त्याशिवाय आपले समाजजीवन बिनधोक आणि अशा प्रकारच्या विवंचनांनी जे ग्रस्त होऊ पाहत आहेत ते पुन्हा सुरळीत मार्गावरून वाटचाल करू शकणार नाही. ’एक बंगला बने न्यारा’ हे प्रत्येकाचे स्वप्न असते आणि हा बंगला जेवढा सुरक्षित तेवढा तो सुंदर हे नव्याने सांगण्याची गरज आहे असे वाटत नाही.
वैजनाथ महाजन

























































