लेख – दलाई लामा यांचा उत्तराधिकारी

673

चीनला पुढचे दलाई लामा हे चीनमधलेच हवे आहेत. बौद्ध धर्मीय देशांचे धर्मगुरूपद चीनला मिळू नये म्हणून पुढचे दलाई लामा हे तिबेटची जनताच ठरवेल अशी अमेरिकेनेही भूमिका घेतली आहे. मात्र पुढचा दलाई लामा हे तिबेटी धर्मसंकेतांनुसार सध्याचे दलाई लामाच ठरवतील ही हिंदुस्थानची भूमिका आहे. आशा करूया, सध्याच्या दलाई लामांनी सूचित केले होते त्याप्रमाणे पुढचा दलाई लामा हा हिंदुस्थानातील असेल, तसेच होईल आणि जागतिक स्तरावर बौद्ध धर्मगुरूपद हिंदुस्थानातलेच असणे हे हिंदुस्थानकरिता महत्त्वाचे आहे.

तिबेटियन बौद्ध धर्मगुरूंचा उत्तराधिकारी निवडण्याची प्रक्रिया येत्या काही दिवसांतच केली जाणार आहे. मात्र, त्यामध्ये चीनने हस्तक्षेप करू नये असा इशारा अमेरिकेने दिला आहे. तिबेटवर आपला हक्क गाजवत असतानाच दलाई लामा यांचा उत्तराधिकारी निवडण्याचा अधिकार आपल्याकडेच असल्याचा दावा चीनने केला आहे. मात्र, हा मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर नेत अमेरिकेने त्यात अन्य राष्ट्रांनीही लक्ष देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. चीनकडे असा कुठलाही अधिकार नसून तिबेटमध्ये राहणारे बौद्ध उत्तराधिकारी निवडतील असे मत अमेरिकेने व्यक्त केले आहे.

‘‘माझा उत्तराधिकारी हिंदुस्थानातूनच असेल’’ असा विश्वास दलाई लामा यांनी व्यक्त केला होता. दलाई लामा यांचा उत्तराधिकारी चीनने जाहीर केल्यास त्याला सन्मान मिळणार नाही, असेही ते म्हणाले होते. या विधानाला चीनने विरोध केला होता.

1933 मध्ये सध्याचे दलाई लामा म्हणजे ज्ञानाचे सागर असलेले तेन्झिन ग्यात्सो यांची नियुक्ती झाली. ते तिबेटचे राष्ट्राध्यक्षही झाले. चीनने कुरापती काढून 1955पासून तिबेटवर आक्रमण करण्यास आणि हक्क सांगण्यास सुरुवात केली. दलाई लामांनी नियुक्त केलेल्या पंचेन लामांचे पद चीन सरकारने 1995 साली बरखास्त केले. त्यांच्या जागी त्यावेळी सहा वर्षांच्या बेनकेन एरदिनी या बालकाला बसवले. त्यानंतर चीनने जबरदस्तीने ताबा मिळवलेल्या तिबेटवर कडक निर्बंध लादले.

चीनचे षड्यंत्र जगासमोर मांडण्यासाठी 1959 मध्ये दलाई लामांनी हिंदुस्थानमध्ये राजाश्रय घेतला. आज सहा दशकं ते हिंदुस्थानात आहेत. तिबेटच्या जनतेसाठी आणि तिबेटच्या स्वातंत्र्यासाठी ते जगभर जागृती करत आहेत. चीनची दडपशाही त्यामुळे जगाच्या चव्हाटय़ावर आली. मात्र चीनला दलाई लामा कायमच बंडखोर शत्रू वाटतात, पण दलाई लामांवर थेट कारवाई केली तर धर्माच्या नावावर तिबेट आणि चीनमध्येही बंडाळी माजणार. त्यामुळे दलाई लामांचे धार्मिक वर्चस्व कमी करण्यासाठी चीन नेहमी प्रयत्न करेल.

तिबेटला चीनच्या पोलादी पकडीतून मुक्त करण्यासाठी दलाई लामा गेल्या 60 वर्षांपासून कार्यरत असून त्यांना प्रत्येक वेळी हिंदुस्थाननेच साथ दिली. अगदी 1959 साली चीनने तिबेटवर हल्ला केल्यापासून काल त्यांच्या अरुणाचल दौऱयाला चीनने विरोध करेपर्यंत हिंदुस्थान दलाई लामांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला.गेल्या 60 वर्षांपासून तिबेटच्या स्वातंत्र्याचे स्वप्न पाहत दलाई लामा हिंदुस्थानात आश्रयाला आहेत. तिबेटचा मुद्दा हा हिंदुस्थान, चीन आणि दलाई लामा या तीन मुद्दय़ांना आंतरराष्ट्रीय आयाम आहेतच. हिंदुस्थान आणि तिबेटमधील नातेसंबंधांना शेकडो वर्षांचा इतिहास असून त्याला सांस्कृतिक, आध्यात्मिक, भावनिक आयाम आहेत. हिंदुस्थानने जगाला दिलेली देणगी म्हणून बौद्ध धम्माकडे पाहिले जाते. गौतम बुद्धांच्या काळापासून हजारो बौद्ध भिक्खू निरनिराळ्या देशांत धम्मप्रसारासाठी गेले. त्यानंतर सातव्या-आठव्या शतकात धर्मांध इस्लामी अतिरेक्यांचे आक्रमण होईपर्यंत हिंदुस्थानी उपखंडातील बऱयाचशा देशांत बौद्ध धम्माचा मोठय़ा प्रमाणात प्रसार झाला.

तिबेटमध्येही सातव्या शतकात बौद्ध धम्माचा प्रवेश झाला, पण पुढील काळात इस्लामी आक्रमकांनी हिंदुस्थानातील बौद्ध मठ, मंदिर, विहारांवर हल्ले केले. बुद्धमूर्तींची, विहारांची तोडफोड, विटंबना केली. हिंदुस्थानचे तिबेटशी असलेले ऋणानुबंध याच बौद्ध धम्माच्या पायावर आधारलेले आहेत.

दलाई लामांच्या मते तर हिंदुस्थान आणि तिबेटचे नाते गुरू आणि शिष्याचे आहे. म्हणजे बौद्ध धम्माची दीक्षा देणारा हिंदुस्थान गुरू आणि ती दीक्षा ग्रहण करणारा तिबेट शिष्य. याचाच अर्थ असा आहे की, आपल्या तिबेटला चीनने जखडून ठेवलेले असताना त्याच्या मुक्ततेसाठी हिंदुस्थानने साह्य करावे. दलाई लामांना हिंदुस्थानात आश्रय दिल्यापासून चीन हिंदुस्थानकडे संशयाच्या नजरेने पाहतो. 1959 साली चिनी अध्यक्ष माओ त्से यांनी तर तिबेटमधील विद्रोहाला हिंदुस्थानचीच फूस असल्याचा आरोप केला होता. दलाई लामांचे हिंदुस्थानातील वास्तव्य चीनला खुपते आहे. परिणामी चीन हिंदुस्थानला नेहमीच त्रास देतो. हिंदुस्थानद्वेषावर पोसलेल्या पाकिस्तानला चीनचा असलेला पाठिंबा, पाकच्या चिथावणीखोर वागणुकीमागे असलेले चीनचे समर्थन हे त्याचमुळे आहे.

तिबेटला ‘जगाचे छप्पर’ असेही म्हणतात.सामरिकदृष्टय़ा हा भाग महत्त्वाचा आहे. शिवाय तिबेट हा नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध असा प्रदेश आहे. चीनमधील कित्येक विकास प्रकल्प इथली साधनसंपत्ती ओरबाडूनच उभारण्यात आले. चीनच्या स्वतःपुरते पाहण्याच्या आणि तिबेटला सापत्नपणाची वागणूक देण्याच्या वृत्तीमुळे तिबेटमधील नागरिक दलाई लामांनाच आजही आपला नेता मानतात. म्हणून तिबेटी नागरिक हिंदुस्थानकडे आशेने पाहतात. अशावेळी तिबेटकरिता व तिबेटच्या नागरिकांची, तिथल्या विकासाची काळजी वाहण्यात हिंदुस्थानने नक्कीच महत्त्वाची भूमिका निभावली पाहिजे.

चीनला पुढचे दलाई लामा हे चीनमधलेच हवे आहेत. बौद्ध धर्मीय देशांचे धर्मगुरूपद चीनला मिळू नये म्हणून पुढचे दलाई लामा हे तिबेटची जनताच ठरवेल अशी अमेरिकेनेही भूमिका घेतली आहे. मात्र पुढचा दलाई लामा हे तिबेटी धर्मसंकेतांनुसार सध्याचे दलाई लामाच ठरवतील ही हिंदुस्थानची भूमिका आहे. आशा करूया, सध्याच्या दलाई लामांनी सूचित केले होते त्याप्रमाणे पुढचा दलाई लामा हा हिंदुस्थानातील असेल, तसेच होईल आणि जागतिक स्तरावर बौद्ध धर्मगुरूपद हिंदुस्थानातलेच असणे हे हिंदुस्थानकरिता महत्त्वाचे आहे.

आपली प्रतिक्रिया द्या