
>> अश्विन बापट
पैठणी ही प्रौढ वर्गापुरती मर्यादित न ठेवता यंग जनरेशनच्या वॉर्डरोबमध्येही दिमाखात असावी, यासाठी ड्रेस डिझायनर दर्शना शानभाग यांनी मेहनत घेतली. त्यांच्या दुर्गा पैठणीजचे नाव आज सर्वदूर झालेय. 2014 साली एका टेलरला सोबत घेऊन या पैठणीवर त्यांनी काम सुरू केलेले. आज त्यांची 15 ते 20 जणांची टीम आहे.
DeeheuÙee प्रवासाबद्दल दर्शन शानभाग म्हणाल्या, मला पहिल्यापासूनच पैठणीची आवड आहे. मी फॅशन डिझायनिंग केलेले होते आणि शिकलेली गोष्ट कधीच वाया जात नाही हे सूत्र मला उपयोगी पडले. याच पैठणीच्या माध्यमातून लोकांचे व्यक्तिमत्त्व खुलवण्याचे स्वप्न मी मनात ठेवून सुरुवात केली आणि साधारण दहा वर्षांपूर्वी मी माझा स्वतःचा कपडय़ांचा ब्रँड सुरू केला. ज्याला नाव दिलं दुर्गा. आज दुर्गा पैठणीज नाव कानाकोपऱयात पोहोचतंय याचा मला आनंद आहे. योगायोगाने हे नाव नवरात्रीच्या वेळीच मला सुचलेले. या व्यवसायात जम बसवण्यासाठी मी खूप अभ्यास केला. पैठणीचा इतिहास वाचला, जाणकारांशी चर्चा केली. तसेच येवल्यात जाऊन तिथल्या विणकरांसोबत संवाद साधला. त्यांचे काम कसे चालते ते जाणून घेतले. त्याच वेळी आजच्या पिढीशी, आजच्या काळाशी पैठणीचे नाते कसे निर्माण होईल याचा विचार केला आणि पैठणीच्या कस्टमायझेशनची कल्पना सुचली.
मग एकेक पोशाखाची भर त्यात पडली. मी 2020 च्या सुमारास पैठणीचे पँट-सूट्स, इन्डो वेस्टर्न गाऊन्स बनवायला लागले. ज्याला चांगली मागणी आली. कोरोना काळात पैठणीचे मास्क तयार केले, ज्याला उत्तम मागणी आली. पैठणीचा एकही तुकडा वाया जाऊ नये असा माझा कटाक्षाने प्रयत्न असतो, असे दर्शना म्हणाल्या.
दर्शनाने कधी हँड पेटेंड पैठणीची सीरिज केली तर, कधी राजा रविवर्मा इन्स्पायर्ड पेंटिंग्ज पैठणीवर साकारायला सुरुवात केली. त्याला साजेसे ब्लाऊज बनवले. त्यांच्या हँड पेंटेड साडय़ांना महाराष्ट्र, कर्नाटकात, ओडिशासारख्या राज्यात मोठी मागणी आहे.
सेलिब्रेटींसाठी खास डिझाइन
‘स्टार प्रवाह’ वाहिनीच्या एका इव्हेंटसाठी मी मिलिंद गवळी, माधवी निमकर या कलाकारांकरता खास ड्रेस डिझाइन केला, ज्याचे खूप लोकांनी काwतुक केले. एखाद्या व्यक्तीची पर्सनॅलिटी कशी आहे, तिची आवड काय आहे, बजेट किती आहे, असा सर्वंकष विचार करत मी पेहराव डिझाइन करते, असे दर्शना म्हणाल्या. या व्यवसायात पाय रोवण्यासाठी मला कुटुंबीय तसेच मैत्रीण अदिती सारंगधर यांची मोलाची साथ आहे.
नवरात्रीसाठी खास कलेक्शन
नवरात्रीसाठी त्या हँड पेंटिंग-एम्ब्रॉयडरी ब्लाऊजेस, कॉटनच्या तसेच सिल्कच्या साडय़ांचेही कलेक्शन घेऊन आल्या आहेत. पुरुषांसाठी डिझायनर कुर्ता, ज्यावर त्रिशूळ किंवा एखादा मंत्र असेल. वायब्रंट कलर्स तसेच पॅलिग्राफीचाही वापरही त्या करतात. पैठणीच्या रंगांनी माझ्या आयुष्यातही ऊर्जेचे रंग भरलेत असे दर्शनाने सांगितले.
(लेखक एबीपी माझाचे सीनिअर प्रोडय़ूसर-सीनिअर न्यूज अँकर आहेत.)




























































