
>> नागेश शेवाळकर
रामायण, महाभारत, श्रीमद भगवद्गीता, ज्ञानेश्वरी इत्यादी अनेक ग्रंथ ज्ञानवर्धक आहेत, मार्गदर्शक आहेत. समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिलेला ‘दासबोध’ हा ग्रंथही फक्त अप्रतिम रचना वा कलाकृती नाही, तर सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, साहित्यिक, सांसारिक इत्यादी अनेक विषयांवर मार्गदर्शक आहे. भक्ती, कीर्तन, नामस्मरण, गुरु-शिष्य, मूर्खांच्या लक्षणांपासून इतर लक्षणांसह विविध स्तवने, वक्ता, श्रोता, मायामोहापासून ते विषयवासना यांसह अनेक विषयही समर्थ रामदासांनी त्यात मांडले आहेत… समर्थ रामदास स्वामी यांच्या जयंतीनिमित्त…
समर्थ रामदास स्वामींनी लेखक आणि राजकारणी यांच्याविषयी खूप छान भाष्य, मार्गदर्शन केले आहे. दोन्ही घटक सद्यस्थितीत समाजासाठी आदर्श आहेत. म्हणून समर्थांचे लेखन विचारात घेणे आवश्यक आहे…
‘दासबोधा’तील पहिल्या दशकातील सातव्या समासात स्वामींनी ‘कवेश्वरस्तवन’ विषय निवडला आहे. स्वामींनी श्रेष्ठ कवींना नमन करून चौतीस श्लोकांमधून कवीचे महत्त्व वर्णन केले आहे. मनुष्य देवाला नमन करण्यासाठी मंदिरात पाहतो, परंतु रामदासांना सरस्वतीचे हक्काचे निवासस्थान कवी वाटतो. कवी शब्दरत्नांचे सागर आहेत, ते अध्यात्म ग्रंथाची खाण आहेत. कवी म्हणजे ‘बोलका चिंतामणी’ अशी उपमा समर्थ देतात. कारण इच्छित वस्तूची प्राप्ती कवी शब्दांच्या माध्यमातून करतात. केवढा मोठा हा सन्मान स्वामी कवी आणि त्याच्या लेखणीचा करतात. या समासाच्या शेवटच्या चौतिसाव्या ओवीत ते कवीची थोरवी गाताना लिहितात…
आतां असो हा विचार। जगास आधार कवेश्वर।
तयांसी माझा नमस्कार। साष्टांग भावे ।।34।।
चौदाव्या दशकाचा तिसरा समास ते ‘कवित्वकळा’ यात काव्याचे धीट, पाठ आणि प्रासादिक असे तीन प्रकार सांगतात. कवीला जे सुचले ते त्याने बळेच धीटपणे लिहिले, त्याला ‘धीट’ काव्य असे स्वामींनी संबोधले आहे. शीघ्र, कामिक, रसिक, शृंगारिक, वीर, हास्य, विनोद हे धीट काव्याचे प्रकार सांगून समर्थ म्हणतात, स्वतःच्या फायद्यासाठी जी स्तुती केली जाते तेही धीट काव्य!
आपल्या शब्दांमुळे वादंग माजेल, वाचकांचा रसभंग होईल, पाल्हाळ लावणारे, बाष्कळ, कुटिल, दर्जाहीन असे काव्य नसावे, असे सांगून ‘पाठ’ या काव्य प्रकारची चर्चा करताना स्वामी सांगतात, आपण जी निर्मिती करणार आहोत. त्या विषयावर चिंतन, मनन करून, अभ्यास करून मगच लिहावे. कवित्व कसे असावे, काव्यातून कोणते बदल व्हावेत अशी अपेक्षा समर्थ पुढील रचनेतून सांगतात…
जेणे ज्ञान हे प्रबळे। जेणे वृत्ती हे मावळे।
जेणे भक्तिमार्ग कळे। या नाव कवित्व ।।49।।
किती सुंदर दृष्टांत आहे हा! साहित्यामुळे वाचकांच्या ज्ञानामध्ये भर पडली पाहिजे, ते विचार प्रवर्तक असले पाहिजे. मनुष्य स्वभाव हा अनेक वृत्ती असलेला असतो. त्यात चांगल्या आणि वाईट वृत्तीही असतात. मानवाजवळ असलेल्या मत्सर, द्वेष, लोभ, वासना अशा घातक वृत्तींचा नायनाट करणारे साहित्य असावे.
समर्थ रामदास स्वामींना लेखकांकडून समाज घडविण्यासाठी अधिक चांगल्या कार्याची अपेक्षा आहे. कारण ‘दासबोध’ ग्रंथातील ‘कवेश्वरस्तवन’, ‘कवित्वकळा’, ‘लेखनक्रिया निरूपण’ हे तीन समास कवींसाठी लिहिले आहेत. ‘लेखनक्रिया निरूपण’ या समासात स्वामी लेखन कसे करावे, अक्षरांचा आकार, सुवाच्य अक्षर, लिहिताना सोडावा लागणारा समास, लेखणीचे प्रकार, पुस्तक कसे हाताळावे, इतर साहित्य यावर सखोल चर्चा करतात. स्वामी तिसऱया चरणात उपदेश करतात….
अक्षरमात्र तितुके नीट। नेमस्त पैस काने नीट।
आडव्या मात्रा त्याहि नीट।
आर्पुलीं वेलांडय़ा ।।3।।
समर्थ लिहितात, अक्षर नीट, व्यवस्थित लिहिलेले असावे. घाईघाईने लिहिलेले नसावे. पहिले अक्षर जसे रेखीव असेल तसेच शेवट करतानाचे अक्षर नेटके असावे. दोन शब्दांमध्ये जे अंतर असते ते एकसमान असावे. काना, मात्रा, रफार, वेलांटय़ा याही नीटनेटक्या, जिथल्या तिथे असाव्यात.
क्षेत्र कोणतेही असो, त्यातून राजकारण वजा करता येत नाही. स्वामींनी केवळ वर्तमान समोर ठेवून ‘दासबोधा’ची निर्मिती केली असे नव्हे, तर त्यावेळी भविष्यकाळात सर्वच क्षेत्रांत होणारे क्रांतिकारी बदलही त्यांना स्पष्टपणे दिसत होते. म्हणून त्यांचे लेखन आजच्या परिस्थितीतही तितकेच उद्बोधक आहे. ‘भीमदशक’ या नावाच्या अकराव्या दशकाचा विषय ‘निरूपण’ असा आहे. अकराव्या दशकामध्ये स्वामींनी सिद्धांत, शिकवण, विवेक, राजकारण, महंतलक्षण, चंचळनदी, अंतरात्मा उपदेश, निःस्पृह वर्तणूक या महत्त्वपूर्ण बाबींवर सुंदर विवेचन केले आहे. राजकारण आजकाल अनेक अर्थांनी जीवाभावाचा विषय झाला आहे. राजकारणी कसा असावा, त्याने काय केले पाहिजे यासंदर्भात महत्त्वाचा असा उपदेश समर्थांनी या ओवीत दिला आहे…
अनन्य राहे समुदाव। इतर जनांस उपजे भाव।
ऐसा आहे। अभिप्राव उपायाचा ।।3।।
राजकारणी चिकाटी वृत्तीचा असावा, क्षमाशील असावा, न्यायी असावा, समाजाला जोडणारा असावा, दुसऱयांचे ऐकणारा असावा, शांत वृत्तीचा असावा, त्याचे वाचन, पाठांतर भरपूर असावे, मुत्सद्दी असावा इत्यादी बाबी याच समासातील अन्य श्लोकांमध्ये स्वामींनी मांडल्या आहेत.
अभ्यासोनी प्रकटावे
ना तरी झाकोनी असावे।
प्रकटोनी नासावे हे बरे नव्हे।
‘दासबोध’ या ग्रंथाची आराधना का करावी, स्तवन का करावे, त्यामागची भूमिका काय आहे, तर या ग्रंथांमध्ये जे अनुभव दिले आहेत, जे उपदेश केलेले आहेत, त्यांचा अनुभव घेऊन पाहावा. त्यासाठी ‘दासबोध’ हा ग्रंथ सावकाश वाचावा. त्यावर चिंतन, मनन करावे. म्हणजे या विचारांची खोली, आवश्यकता आणि उपयोगिता लक्षात येईल.






























































