दिल्ली डायरी – चंद्राबाबू ‘तेलगू बीडा’ उचलणार का?

<<< नीलेश कुलकर्णी >>>

दिल्लीच्या राजकारणात सध्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत काय होणार? याबाबत बरीच चर्चा सुरू आहे. काही दशकांपूर्वी नरसिंह राव यांना अचानक पंतप्रधानपदाची लॉटरी लागली होती. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत हाच ‘तेलगू बीडा’ चमत्कार घडवेल का? चंद्राबाबू नायडू ते धाडस दाखवतील का? असे अनेक प्रश्न राजधानीतील राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहेत.

दिल्लीच्या राष्ट्रीय राजकारणात ‘तेलगू बीडा’ म्हणजेच तेलगू अस्मितेचे राजकारण प्रसिद्ध आहे. राजीव गांधींच्या हत्येनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँगेस स्वबळावर सत्तेवर आली खरी, मात्र पंतप्रधान कोणाला बनवायचे? हा मोठा पेच काँगेसपुढे होता. पक्षाकडे चेहरा नव्हता. राजीव गांधींच्या हत्येच्या सहानुभूतीवर जनतेने काँगेसला सत्तेवर बसवले होते. त्यावेळी उत्तरेच्या पट्ट्यातले नारायणदत्त तिवारी हे शक्तिशाली नेते होते. शिवाय त्यांना गांधी घराण्याचीही पसंती होती, त्यामुळे तिवारी अगदी आरामात पंतप्रधान होतील अशी चिन्हे होती, मात्र झाले भलतेच, आंध्र प्रदेशमध्ये ‘तेलगू बीडा’ने उचल खाल्ली. पी. व्ही. नरसिंहराव हे तसे उच्चविद्याविभूषित विद्वान नेते. त्यांनी राजकारणातून निवृत्त होण्याचा इरादा व्यक्त केला होता, मात्र या तेलगू बीडाने कमालच केली. रिटायरमेंटच्या वाटेवरील नरसिंहरावांना थेट देशाच्या पंतप्रधानपदावर सिंहारूढ केले! पुढे नरसिंहरावांनी आपल्या कर्तृत्वाने इतिहास घडविला. हा इतिहासाचा धांडोळा यासाठी की, तेलगू अस्मितेसाठी त्यावेळच्या अखंडित आंध्रांतीलच नाही तर दक्षिण भारतातले नेते नरसिंहरावांसाठी एकवटले होते. कोणतीही राजकीय दिशा नक्की नसलेले चंद्राबाबूंचे राजकीय गलबत रेड्डींच्या बाजूने वळले तर पुन्हा वेगळा ‘इतिहास’ घडू शकतो. इतिहासाची पुनरावृत्ती ही नेहमीच होत असते. मात्र पन्नासहून अधिक चौकशांचे भूत मानगुटीवर बसलेले असताना चंद्राबाबू तेलगू बीडा उचलण्याचे धाडस दाखवतील काय, हा लाखमोलाचा प्रश्न आहे.

उपराष्ट्रपतीपदाच्या 9 सप्टेंबरला होणाऱ्या निवडणुकीत नेमके काय होणार? यावर दिल्लीच्या राजकीय वर्तुळात चर्वितचर्वण सुरू आहे. ही निवडणूक फिरवण्याची क्षमता असणारे चंद्राबाबू हे तथाकथित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) घटक आहेत. दिल्लीकरांनी एका घरात ‘एक घरवाली आणि दुसरी तिची सवत’ असावी, अशा पद्धतीने चंद्राबाबू व त्यांचे राजकीय दुश्मन जगनमोहन रेड्डी या दोघांनाही एका म्यानात सामावून घेतलेले आहे. दोघांवरच्या गुह्यांच्या फाईलवरची धूळ झटकली जाणार नाही, ईडी सक्रिय होणार नाही, या दोन बाबींवर दिल्लीकरांनी ‘एकाच म्यानात दोन तलवारी’ ही करामत करून दाखविली आहे. त्यामुळे दिल्लीकरांचा इतके दिवस या दोन डगरींवर सत्तेचा बेमालूम खेळ सुरू होता, मात्र ‘सुदर्शन चक्रा’मुळे हा खेळ उद्ध्वस्त होण्याची वेळ आली आहे. तेलगू अस्मितेच्या खाल्लेल्या मिठाला जागून चंद्राबाबू व जगनमोहन रेड्डी यांनी सुदर्शन रेड्डींची पाठराखण केल्यास उपराष्ट्रपतीपदाचा निकाल बदलू शकतो. संशयाचे ढग गडद व्हावेत असाच चंद्राबाबूंचा इतिहास आहे. आपलेच लोकप्रिय सासरे एन.टी. रामाराव यांच्याशी दगाबाजी करून चंद्राबाबूंनी सवतासुभा उभा केला होता. चंद्राबाबू हे सगळे करण्यात पटाईत आहेत, मात्र चंद्राबाबू व चिरंजीव नारा लोकेश यांच्यावर किमान पन्नासहून अधिक गुह्यांची चौकशी सुरू आहे. अशा स्थितीत चंद्राबाबू हिंमत, धाडस दाखवतील काय, हा प्रश्नच आहे.

‘लॅटरल एण्ट्री’चा गाशा गुंडाळला

विविध क्षेत्रातील तज्ञांना सरकारमध्ये थेट संयुक्त सचिव पदासारखे सीनियर आयएएसचे पद बहाल करण्याचा निर्णय नरेंद्र मोदी सरकारने गुंडाळला आहे. एसआयआर आणि व्होट चोरीच्या गदारोळात हे फारसे कोणाच्या ध्यानात आले नाही. मात्र, मोठा गवगवा करून आणलेली ही योजना सरकारने गुंडाळली आहे. या थेट नियुक्तीमध्ये आरक्षणाची तरतूद नाही, अशा तक्रारी काही खासदारांनी केल्या होत्या. त्यामुळे सरकारने ही योजनाच गुंडाळली की, आयएएस लॉबीचा रोष नको म्हणून ती बंद केली, हे गुलदस्त्यातच आहे. या योजनेमागचा उद्देश भलेही चांगला असेल व तशी नॉन ‘आयएएस’च्या नियुक्तीची देदीप्यमान परंपरा देशाला असली तरी सध्याच्या सरकारच्या काळात काही भव्यदिव्य घडलेले नव्हते. अणुऊर्जा क्रांतीचे जनक होमी भाभा, दुग्धक्रांतीचे जनक वर्गिस कुरियन, हरित क्रांतीचे प्रणेते एम.एस. स्वामीनाथन, अंतराळ संशोधनाचे प्रणेते विक्रम साराभाई, मिसाईल मॅन अब्दुल कलाम, दूरसंचार क्रांतीचे प्रणेते सॅम पित्रोदा या लोकांची नियुक्ती त्या-त्या वेळच्या काँगेसप्रणित सरकारांनी केली होती. या लोकांनी मोठा इतिहास घडवला होता. नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात असा कोणी इतिहास वगैरे घडवलेला नाही.

बडे भाईशाब जल्दी मिलेंगे

21 जुलै रोजी उपराष्ट्रपतीपदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रपती भवनातून निघालेले जगदीप धनखड सगळ्यांनी पाहिले. मात्र त्यानंतर महिनाभराचा कालखंड लोटून गेला तरी धनखड यांचे ‘मुखदर्शन’ झालेले नाही. त्यामुळे दिल्लीच्या वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. धनखड सुरक्षित आहेत ना? त्यांच्यावर पाळत तर ठेवली जात नाही ना? अशा शंका-कुशंकांना महापूर आलेला आहे. धनखड यांची ख्यालीखुशाली विचारायलाही जाण्याची परवानगी दिली जात नव्हती. मात्र गेल्या आठवड्यात पश्चिम उत्तर प्रदेशातील धनखड यांच्या नातेवाईक असणाऱ्या जाट समाजाच्या लोकांनी थेट उपराष्ट्रपती भवन गाठले. धनखड यांनी त्यांच्या कार्यकाळात अशा नातेवाईकांची वारेमाप नियमबाह्य भरती राज्यसभा सचिवालयात केल्याचा आरोप आहे. ही लाभार्थी मंडळी धनखड यांचे ‘हालचाल’ विचारण्यासाठी पोहचली. या मंडळींना सन्मानाने बसविण्यात आले. चहापाणी करण्यात आले. या मंडळींचा एकच हेका होता, ‘बडे भाईशाब से मिलना है’. या जाट मंडळींचे चहापान होईपर्यंत तिथल्या उपस्थित अधिकाऱ्यांनी वेगवेगळी कारणे सांगून वेळ मारून नेली. चहापान आटोपल्यानंतर ‘अंदर पूछ के बताते है’ अशी सबब सांगण्यात आली. ‘अभी साहब किसी को नही मिल रहै. जब मिलना शुरू हो जायेगा तो आप लोगों को जरूर बुलायेंगे’ असे म्हणून स्टाफने आलेल्या नातेवाईक मंडळींची पाठवणी केली. घरी भेटायला आलेल्या अभ्यागतांनाही भेटण्यास धनखड यांना मज्जाव करण्यात आल्याची चर्चा आहे.

[email protected]