शिरीषायन; मोठ्यांच्या छोट्यां गोष्टी – 4

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> शिरीष कणेकर

नायिकेला न्यूनगंड यावा असं अलौकिक रूप लाभलेला भूलोकीचा मदन देव आनंद वागायला, बोलायला, भेटायला इतका साधा असेल हे त्याच्या निष्ठावान चाहत्यांना सांगून खरं वाटलं नसतं. ते बिचारे देवसाहेबांना भेटण्याची नुसती कल्पनाही करू शकले नाहीत. तो समोर आला आणि दातातली ती सुप्रसिद्ध फट दाखवीत हसला तर आपण भोवळ येऊन पडू असंच त्यांना वाटत राहिलं. मला शक्य असतं तर मी त्याच्या भक्तांची व देवची भेट घडवून आणली असती व त्यांना आयुष्यातील सर्वोच्च आनंद मिळवून दिला असता.

त्याचे मान्यवर सहनायक लांबलचक गाडय़ांतून फिरत तेव्हा हा सर्वाधिक लोकप्रिय महानायक छोटय़ा फियाटमधून आणि तेही ड्रायव्हरच्या शेजारी बसून खुशाल फिरायचा.

एकदा न राहवून मी त्याला विचारलं, ‘‘एवढी छोटी गाडी का वापरतोस?’’

‘‘अतिशय सोयीची असते.’’ तो त्याच्या देवदुर्लभ शैलीत हसून म्हणाला, ‘‘पार्किंगला सोपं जातं. एका माणसासाठी भलीमोठी गाडी कशाला हवी? गाडीच्या आकारावर गाडीत बसलेल्या कलाकाराचं मोठेपण ठरतं वाटतं?’’
माझ्या आणि सगळय़ांच्याच मनातली गोष्ट देवनं बोलून दाखवली होती. पण हे बोलताना त्याचा आविर्भाव इतका लोभसवाणा होता की ‘शेव्हरलेट’मधून मिरवणाऱयांनाही मिरच्या झोंबल्या नसत्या.

‘‘सगळय़ा आजीमाजी नायिकांशी तुझे इतके सौहार्दपूर्ण संबंध कसे?’’ मी कुतूहलानं विचारले.

‘‘का नसावेत?’’ त्यानं उलटून विचारले, ‘‘मी त्यांना त्यांचा दाम मोजतो. त्यांना सन्मानपूर्वक वागवतो. त्यांचा कुठलाही गैरफायदा घेत नाही. त्यामुळे आमचे संबंध कायम सलोख्याचे राहतात.’’

इतरांचे का राहात नसावेत एवढं मला कळलं. एका चित्रपट साप्ताहिकाने राज कपूर विशेषांक काढायचा घाट घातला होता. परंतु त्याच्या जवळपास सर्व नायिकांनी बोलण्यास नकार दिला होता. मी हे देव आनंदला सांगितलं तेव्हा तो मिश्किल हसला होता. ते हसणं पाहून राज कपूरलाही राग आला नसता. नाही म्हणायला तो एकदा ‘स्क्रीन’ सिनेसाप्ताहिकाचे फोटोेग्राफर आर. एम. पुमटाकर यांना म्हणाला होता, ‘‘दिलीपकुमार इज अ व्हेरी गुड मॅन… गुड फॉर हिमसेल्फ!’’

सुरैया त्याची पूर्वाश्रमीची बहुचर्चित प्रियतमा. मी देवला त्याच्या सुस्वभावाचा फायदा घेत विचारले, ‘‘सुरैयाला तिच्या वाढदिवसाला भेटतोस, गुच्छ पाठवतोस, फोन करतोस?’’

‘‘नाही रे बाबा.’’ देव हसत हसत म्हणाला, ‘‘याद आती है तो दिलही दिल से फोन घुमा लेता हूँ!’’

आता दिलाचं नातं संपलंय हा त्याच्या बोलण्याचा अर्थ होता.

‘‘तू नेहमी शहरी भूमिकांतूनच का दिसतोस?’’

‘‘वो इमेज की बात है.’’ देव म्हणाला, ‘‘त्या भूमिकांतून प्रेक्षकांनी मला स्वीकारलं म्हणून तशाच भूमिका मला मिळत गेल्या, मी करत गेलो. आजही करतोय. युसुफ की देखो, वो गंडा, कुर्ता, धोती की इमेज बन गयी है.’’

‘‘हो, पण युसुफनं शहरी भूमिकाही भरपूर केल्यात. तो ‘इमेज’मध्ये अडकून पडला नाही. तू एकदाच तलवारीला शिवलास, पुन्हा त्या फंदात पडला नाहीस.’’ हे मी देव आनंदला सांगत बसलो नाही. त्याच्याशी वाद घालणं हा माझा हेतू असूच शकत नव्हता. एक तर देव कोणाला दिसत नाही. मला दिसला होता तर मी काय त्याच्याशी हुज्जत घालू? त्याने दिलीपकुमारबरोबर एकदा (इन्सानियत) काम केलं. राज कपूरबरोबर एकदाही नाही. आणखी कोणाबरोबर एकदाही नाही. (अपवाद – अशोक कुमार) त्याला कोणाची गरज नव्हती. तो एकांडा शिलेदार होता. तो आणि त्याच्यावर निस्सीम पेम करणारे चाहते प्रेक्षक. देवा हो देवा, आनंद देवा… (उगीच नाही त्याची खुर्चीवर ठेवलेली पॅण्ट मी राजवस्त्री असल्याप्रमाणे भावुक होत उचलून ठेवली होती. तिच्यात साक्षात देव आनंद राहायचा, मास्तर!)

एकदा माझा पह्न वाजला. माझ्या लहान मुलानं उचलला. भेदरलेल्या चेहऱयाने तो मला म्हणाला, ‘‘कोणीतरी बोलतंय. तो म्हणतो की तो देव आनंद आहे.’’

मी फोन घेतला. तो देव आनंदच होता. म्हणाला, ‘‘आपली आज दहाची अपॉइंटमेंट होती. पण काय झालंय, दिल्लीहून माझे वितरक आलेत. आपण अर्धा तास भेट पुढे ढकलली तर चालेल का? तुला शक्य नसेल तर मी त्यांना नंतर यायला सांगतो.’’

माझ्या मनात आलं की, दुसऱयाच्या वेळेला किंमत, अर्धा तास पुढे, स्वतः फोन करणं या गोष्टी राजेश खन्ना व शत्रुघ्न सिन्हा यांना कळल्या तर हसून हसून त्यांची मुरकुंडी वळेल.