वैश्विक – अवकाशातील ‘पत्ता’ शोधणे

515

>> दिलीप जोशी

एखाद्या ठिकाणाचा पत्ता शोधणे ही काही वेळा किती अवघड गोष्ट ठरते याचा अनुभव आयुष्यात केव्हातरी येतोच. ‘आमचा पत्ता अगदी सोपा आहे’ असं ऐकून त्या भरवशावर आपण त्या भागात जावं तर त्यांनी सांगितलेल्या ‘सोप्या’ खाणाखुणा कोणालाच ठाऊक नसतात! मग ‘ट्रायल अ‍ॅण्ड एरर’ पद्धतीने कसाबसा इच्छित पत्ता एकदाचा सापडतो. अगदी अलीकडच्या ‘गुगल मॅप’ला सुद्धा ‘गुगली’ टाकणारे ‘पत्ते’ सांगण्यात आले की वणवण करण्यावाचून पर्याय नसतो. पत्ता शोधणे आणि सांगणे यावर मराठीत अनेक विनोद कथा आलेल्या आहेत. अचूक पत्ता शोधणारे पोस्टमन अशा वेळी आदरणीय वाटतात.

पृथ्वीवर माणसांच्या जगात नगररचना तरी असते. पण मग दूरवरून येणारे स्थलांतरित पक्षी हजारो किलोमीटर उडत ठराविक जागीच कसे पोचतात त्यांच्या मेंदूत नैसर्गिक ‘कंपास’ असावा. आकाशात उडणार्‍या पक्ष्यांना खग म्हणतात. ‘ख’ म्हणजे आकाश आणि ‘ग’ म्हणजे गायी किंवा विहरणारे. त्यावरून एक बालकविता आठवली. ‘चिऊताईच्या पिला, खरं सांग मला. आकाशातील सगळे रस्ते सापडतात का तुला?… ‘पक्ष्यांना ते सापडतात. ते आकाशात उडताना पृथ्वीकडे नजर लावून असतात. खगोल अभ्यासक मात्र पृथ्वीवरून अनंत आकाशाचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न करतात. निरभ्र, काळोख्या रात्री हजारो तारे चमचमत असताना त्यांचा नेमका ‘पत्ता’ कसा शोधायचा?

नक्षत्रांची नावं क्रमाने ठाऊक असतील तर ती त्याच क्रमाने उगवत व मावळत असल्याने एक नक्षत्र माहीत असेल तर आधीच्या, नंतरच्या किंवा आजूबाजूच्या तारकासमूहांचा अंदाज येतो. पूर्वी आम्ही अश्विनी, भरणी, कृतिका, रोहिणी, मृग… अशी सत्तावीस नक्षत्रे ‘पाठ’ करायचो. ही झाली आपली पारंपरिक माहिती. मधल्या तारकासमूहांची गोष्ट नंतरच्या काळात त्यांची संख्या कितीr झाली, त्यांच्या इंग्लिश नावांना समर्पक अशी नावंही मराठीत ‘दर्पण’ हे पहिलं वृत्तपत्र काढणार्‍या प्रज्ञावंत बाळशास्त्री जांभेकरांनी दिली.

यापैकी इंग्लिशमधला कॅसिओपिया म्हणजे शर्मिष्ठा आणि अर्सा मेजर किंवा ‘सप्तर्षी’ यापैकी कुठला तरी तारकासमूह रात्रीच्या आकाशात आपल्याला ‘ध्रुवतारा’ शोधायला मदत करतो. एकदा का स्थिर धु्रवाचा पत्ता कळला की ‘उत्तर’ मिळते-मग पूर्व-पश्चिम, दक्षिण़ शर्मिष्ठा तारकासमूहाचा आकार इंग्रजी ‘एम’ सारखा दिसतो. पावसाळा संपल्यावर नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत हा तारकासमूह नजरेत भरतो. त्या ‘एम’च्या दुसर्‍या कोनातून सरळ रेषा काढली तर ती ध्रुव तार्‍याकडे जाते. नंतरच्या काळात दिसणार्‍या पंचांगासारख्या सप्तर्षी तारकासमूहाच्या वरच्या दोन तार्‍यांतून काढलेली लंब रेषा ध्रुवाशी पोचते. एवढ समजलं की मग ‘मॅप’ पाहून इतर तारकांच्या वस्तीतून फिरता येतं! सध्या तर संध्याकाळच्या आकाशात सुंदर ‘समर ट्रँगल’ दिसतोय. हँस तारकासमूहातला हँस किंवा डेनेब तारा, पुढचा ध्रुवतारा होणारा अभितीत हा व्यधलैतल्या ठळक तारा आणि श्रवण नक्षत्रातला ठळक तारा या तिघांचा एक महात्रिकोण तयार होतो. त्याच्या संदर्भानेही आकाश ‘वाचता’ येते.

अठ्ठ्याऐंशी तारकासमूहांची नावं अभ्यासांती पाठ झाली तर उत्तम पण निवळ पाठांतर न करता संदर्भाने ती लक्षात राहिली तर आकाशदर्शन करणं सोपं जातं. आजचे अभ्यासक तर सप्तर्षींची, ऋतू, पुलह, पुलस्य, आत्री, अंगीरा, वसिष्ठ, मरिची अशी सात नावं आणि कृत्तिका या चमचमत्या तारकापुंजातील, अंबा, दुला, मितली, मेघदंती, अभ्रयंती ती आणि धृपुणिका!

अशा कथांचा आणि आकाशातील तार्‍यांचा अर्थाअर्थी काही संबंध नसतो. एका नक्षत्रातले, तारकासमूहातले तारे एकाच वयाचे किंवा एकाच प्रतलात (एकाच सपाटीवर) असतात असं नाही. त्यांचं स्वरूपही भिन्न असतं. त्यात काही नवतारे तर काही अंत:काळ जवळ आलेले तारे असू शकतात. ‘मृग’ नक्षत्र हे अशाच तार्‍यांचं ‘कुटुंब’ आहे. त्यांच्यातलं ‘सोशल डिस्टन्सिंग’ मात्र शेकडो प्रकाशवर्षांचं असू शकतं

एकदा आकाश समजू लागलं की विश्वात डोलावू शकणारी अभ्यासाची खिडकी उघडते. सध्या तरी केवळ घराच्या ‘खिडकीतून’ दिसतंय तेवढंच आकाश न्याहळण्याचा प्रयत्न करावा लागतोय. पण त्यातून हा नवा छंद लागला तर तो ज्ञानवर्धक नक्कीच असेल. एकदा या अभ्यासाची आवड आकाश निरीक्षणापुरती राहिली आणि त्यातली गणिती प्रमेयं नाही समजली तरी ‘विश्वरूप’ जाणता येतं. पण त्यापुढे जाऊन या आवडीतून कोणी ‘करिअर’ करायचं ठरवलं तर सखोल अभ्यासाने तेही शक्य होतं. आवड म्हणून खगोल मंडळात आलेले आणि पुढे त्यातच पीएच.डी. करून संशोधन करणारे अनेक जण आता मोठ्या खगोलीय प्रकल्पात कार्यरत आहेत. ‘स्पेस सायन्स’ जाणून घेण्याची सुरुवात अवकाशातील पत्ता शोधण्यातूनही होते!

आपली प्रतिक्रिया द्या