>> दिलीप ठाकूर
जगण्यात मौज आहे तेवढेच ते क्षणभंगुरही आहे, असे काहींच्या आयुष्याबाबत घडताना दिसते. चित्रपटसृष्टीतील आघाडीचे कला दिग्दर्शक रजत पोद्दार यांच्याबद्दल तेच घडले. त्यांच्या कला दिग्दर्शनाला भरपूर संधी मिळालेल्या विनोदी भयपट ‘भूलभुलैया 3’ चा टीझर लक्षवेधक ठरून सोशल मीडियात भरपूर लाईक्स मिळवत असतानाच रजत पोद्दार यांचे वयाच्या अवघ्या त्रेपन्नाव्या वर्षी लंडनमध्ये हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक निर्माते व दिग्दर्शक हळहळले. दिग्दर्शक अनिझ बज्मी यांनी तर म्हटले, ज्याच्याशी संवाद होऊन 24 तासही झाले नाहीत त्याचे निधन व्हावे हे पचवणे अवघड आहे. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनीच सोशल मीडियात रजत पोद्दार यांच्या निधनाचे वृत्त दिले.
रजत पोद्दार हे कला दिग्दर्शक गौतम सेन यांच्याकडे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून चित्रपटसृष्टीत आले आणि सतत नवीन गोष्टी जाणून घेत घेत स्वतंत्रपणे काम करण्याइतपत त्यांनी मजल मारली. तेव्हा त्यांना चित्रपटासाठी राजवाडे वगैरे भव्य सेटसाठी आकर्षक खांब उभारण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या अब्दुल यांनी बरेच सहकार्य केले. रजत पोद्दार यांनी सतत नवीन गोष्टी शिकण्यावर भर देत आपल्या कामाची प्रगती केली. अनेक दिग्दर्शकांचे लक्ष वेधून घेतले आणि मग त्यांनी आपल्या मेहनत व गुणवत्तेच्या जोरावर हिंदी चित्रपटसृष्टीतील एक विशेष दृष्टी (व्हिजन) असलेला कला दिग्दर्शक म्हणून आपले स्थान निर्माण केले. मोठय़ा चित्रपट निर्मिती संस्थांच्या चित्रपटांचे कला दिग्दर्शक हे रजत पोद्दार यांचे विशेष. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित ‘फायटर’ आणि ‘पठाण’, अनुराग बोस दिग्दर्शित ‘बर्फी’ व ‘जग्गा जासूस’ ही उदाहरणे त्यासाठी पुरेशी आहेत. ‘फायटर’मध्ये हवाई दलातील गोष्ट, तर ‘जग्गा जासूस’ हा गीतसंगीत व नृत्यातून घडणारा फॅण्टसी चित्रपट, अशा भिन्न स्वरूपांच्या चित्रपटांच्या कला दिग्दर्शनात उत्तम दर्जा राखण्यात रजत पोद्दार यशस्वी ठरले. कला दिग्दर्शनात अर्थात सेट उभारण्यात कमालीची विविधता हे रजत पोद्दार यांचे विशेष ठरले. चित्रपट जबरदस्त मारधाडपट असो वा विनोदी, कला दिग्दर्शक म्हणून रजत पोद्दार आपली चमक दाखवणारच. त्यांच्या चित्रपटांच्या नावावरून ते स्पष्ट होते. ‘फॅण्टम’, ‘गुंडे’, ‘ग्रॅण्ड मस्ती’, ‘गँगस्टर’, ‘अ लव्ह स्टोरी’ इत्यादी अनेक चित्रपटांचे कला दिग्दर्शन रजत पोद्दार यांचेच. चित्रपटाची पटकथा ऐकताच इनडोअर व आऊटडोअर्स (बाह्यचित्रीकरण) लोकेशन कशी असावीत यावर रजत पोद्दार यांचे विचारचक्र सुरू होई आणि मग बाह्यचित्रण स्थळांची पाहणी, निवड याचा दौरा करणार. या सगळ्यासाठी असलेले चित्रपट माध्यम व व्यवसाय यांचे भान त्यांच्याकडे होते. मोठमोठे सेट म्हणजेच चांगले कला दिग्दर्शन असे नव्हे, तर बाह्यचित्रीकरण स्थळांचीही योग्य निवड करता येणे आवश्यक आहे, तसेच व्हीएफएक्स या तंत्राचाही वापर करण्यात येणार आहे याचेही भान असणे आवश्यक आहे, असा रजत पोद्दार यांच्याकडे दृष्टिकोन होता. पटकथा, छायाचित्रण आणि संकलन यात कला दिग्दर्शनाची आपली एक स्वतंत्र ओळख आहे, वैशिष्टय़पूर्ण जागा आहे हे जाणून रजत पोद्दार यांनी आपली यशस्वी वाटचाल केली. अशीच सकारात्मक वाटचाल सुरू असतानाच रजत पोद्दार यांचे निधन व्हावे हे दुर्दैव! चित्रपटाच्या कला दिग्दर्शनाचाही चित्रपटाच्या जडणघडणीत महत्त्वाचा सहभाग असतो असे मानतच आपले काम करत करत वाटचाल केलेल्या एका कलाकाराचा असा अनपेक्षित शेवट झाला.