लेख – अंतरीचा दिवा!

603

>>  दिलीप जोशी 

जगात अद्वितीय ठरलेला दिवाळीचा सण उंबरठ्यापाशी येऊन ठेपलाय. आता उंबरठ्याबाहेरच्या अंगणात किंवा गॅलरीतसुद्धा विविध रंगी रांगोळय़ा चितारल्या जातील. उत्साहाने दीपमाळा लावल्या जातील. एव्हाना आकाशकंदील काही ठिकाणी लागलेले असतील. मुंबईतल्या अनेक इमारती तर एकरंगी कंदील बांधून संपूर्ण वस्तीचा एकोपा दर्शवतात.

पूर्वी आकाशदीप बनवण्यासाठी बांबू किंवा कामटय़ा तासून त्यांच्या 9-10 इंचांच्या 32 काडय़ा बनवून तयार झालेल्या आठ चौरसांचा पारंपरिक आकाशकंदील बनायचा. त्यावर पतंगाच्या कागदासारखा रंगीत पातळ कागद न सुरकुतता आणि न फाटता चिकटवणे ही कौशल्याची गोष्ट असायची. जिलेटिन किंवा रंगीत पारदर्शक कागदाचा आकाशकंदील जार अधिक वैशिष्टय़पूर्ण मानला जायचा. कंदिलाच्या खाली-वर कागदी करंज्या आणि तळाला अरंद पट्टय़ांच्या झिरमिळय़ा चिकटवणे यात पाठीला रग लागेपर्यंत वेळ जायचा, परंतु त्यात एक गंमत होती.

या कलाकृती बहुतेक दिवाळीची सुट्टी सुरू झालेली मुले करत. त्याचवेळी स्वयंपाकघरात दिवाळीच्या खमंग पदार्थांची निर्मिती सुरू व्हायची. चकल्या, लाडू आदी पदार्थ मुख्यत्वे दिवाळीलाच बनवले जायचे किंवा एखाद्या समारंभाच्या वेळी मिळायचे. त्यामुळे त्याची आस आणि कौतुक होतं. अर्थशास्त्राच्या भाषेत वर्षातून क्वचितच मिळणाऱ्या या पदार्थांचं उपयोजिता मूल्य अथवा ‘युटिलिटी’ भरपूर असायची.

आता हे सारे पदार्थ बारमाही झालेत. आसपासच्या दुकानात ते वर्षभर मिळतात. चैत्र पाडव्याला श्रीखंड किंवा होळीलाच पुरणपोळी असे काही राहिलेले नाही. त्यामुळे त्या सगळय़ा प्रथेप्रमाणे सणासुदीला महत्त्व असले तरी त्यातली गोडी वर्षभरात वाटली गेलेली आहे. मग दिवाळीच्या फराळाचे आणि रांगोळय़ा, आकाशदिव्यांचे वैशिष्टय़ काय?

एरवी या सर्व गोष्टी व्यक्तिगत किंवा आपल्या कुटुंबापुरत्या मर्यादित असतात. दिवाळीत मात्र त्या सामूहिक होतात. अनेक मित्रमंडळी, त्यांचे परिचित, त्यांच्या नव्या ओळखी, भेटीगाठी या साऱ्या आनंद सोहळय़ात तोंड गोड करणाऱ्या आणि जिभेला चव आणणाऱ्या तिखट-गोड पदार्थांची देवाणघेवाण होते.

आमच्या लहानपणी आमच्या वसाहतीतली लहान-मोठी माणसं परस्परांकडे फराळाला जायची. या निमित्ताने सगळय़ांच्या चार-आठ दिवसांत वारंवार भेटी व्हायच्या. कुणाची मुले काय शिकतात याची चौकशी व्हायची. त्याला अनाहूत, पण योग्य मार्गदर्शन मिळायचं. कुणाकडे कोणी आजारी असेल तर चौकशी व्हायची. तुम्हाला जायचं असेल नातेवाईकांकडे तर निर्धास्त जाऊन या. आम्ही आजोबांकडे लक्ष देऊ असे आश्वासन मिळायचे. सामाजिक एकोप्याचा ‘कुटुंब’ विस्तारलं जाण्याचा, परस्परांना समजून घेण्याचा काळ दिवाळीच्या रूपाने अवतरायचा. कोणाचे मतभेद असले तरी ते चार ज्येष्ठ मध्यस्थांच्या सांगण्यावरून मिटायचे. आमच्या वाडीतल्या मोठ्या माणसाला कोणाच्याही चुकलेल्या पोराचा कान धरायचा अधिकार होता आणि योग्य वागण्याचं जाहीर कौतुक करण्याचे औदार्य होते.

गेल्या पन्नासेक वर्षांत सारेच अपरिहार्यपणे बदलले. आजही समारंभ, मित्रपरिवाराचे किंवा कौटुंबिक मेळावे होतायत. त्यातही मजा असतेच. परंतु पूर्वीचा निवांतपणा आणि आश्वासक भाव कुठेतरी ओसरल्यासारखा वाटतो. ‘वेळ नसलेल्या’ धावपळीच्या जीवनात सणासुदीच्या भेटीगाठीही ‘टच ऍण्ड गो’ पद्धतीने होतात. फोन आणि इलेक्ट्रॉनिक संपर्कापेक्षा जिवलगाची गळाभेट किती मानसिक समाधान देते ते केवळ अनुभवानेच समजते.

अलीकडेच आंतरराष्ट्रीय मानसिक आरोग्य दिवस साजरा झाला. संयुक्त राष्ट्रसंघाच्या पुढाकाराने असे ‘दिन’ साजरे होत असतात ते अनेक समस्या आणि कर्तव्याची आठवण करून देण्यासाठी. त्याचाही चांगला परिणाम होतोच. पण कोणी ‘आठवण’ करून देऊन टिकवलेले नाते आणि ‘लक्षात ठेवून’ जपलेले नाते यात फरक असतोच. अंतरातला हा सौहार्दाचा, परस्पर समजुतीचा, सहजीवनाचा दिवा सतत उजळत ठेवला तर दिवाळीच्या आकाशदीपांची उजळण द्विगुणित होईल. कुसुमाग्रज एका कवितेत म्हणतात, ‘नवलाख विजेचे दीप तळपती येथे, उतरली जणू तारकादळे नगरात, परि आठवते अन् व्याकुळ करते केव्हा त्या माजघरातील मंद दिव्याची वात’ तो माजघरातला वात्सल्य, जिव्हाळय़ाचा ‘मंद दिवा’ हाच अंतरीचा दीप. त्याची ज्योत सतत तेवत राहिली तर मनाची दिवाळी रोजचीच!

khago[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या