लेख – चिनी साम्यवादी पक्षाची राजकीय आयुधे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> सनतकुमार कोल्हटकर

चीनचा कम्युनिस्ट पक्ष खोटय़ा प्रचार तंत्रामध्ये वाक्बगार होता आणि अजूनही आहेच. खोटय़ा गोष्टींचा प्रसार करणे आणि अनेक जणांना वास्तवापासून अंधारात ठेवणे आणि यातून चीनच्या विस्तारवादाला खतपाणी कसे मिळेल याकडे बारीक लक्ष देणे हा त्यांचा उद्देश असे. चीनचे एकमेव मुखपत्र असलेला ‘ग्लोबल टाइम्स’ चीनची भूमिका मांडतो असे बोलले जाते, पण चिनी कम्युनिस्ट पक्षाचा ‘ग्लोबल टाइम्स’ हा पिंजऱयातील पोपट आहे हे लपून राहिलेले नाही. ‘माझे ते माझे आणि तुझे तेही माझे’ हीच चीनची वृत्ती आहे. चीनची ही वृत्ती आणि चीनच्या या सवयीत यापुढील काळातही बदल होण्याची शक्यता नाहीच.

हाँगकाँगमधील स्थानिक प्रशासनाने चीनमधील कम्युनिस्ट पक्षाच्या दबावाखाली हाँगकाँगच्या घटनेत बदल केला. ब्रिटनने हाँगकाँग सोडून जाताना हाँगकाँगची घटना साल 2047 पर्यंत कायम ठेवण्याबद्दल बजावले होते, पण 27 वर्षे आधीच चीनने या कराराला हरताळ फासला. हाँगकाँगमध्ये बराच काळ चाललेल्या आंदोलनामुळे हैराण झालेल्या चीनने हाँगकाँगच्या प्रशासनाला जादा अधिकार देण्याचा प्रस्ताव मंजूर केला. चीनच्या कम्युनिस्ट पक्षाची हाँगकाँगवरील पोलादी पकड यापुढील काळात वाढतच जाणार आहे. चीनच्या या हालचालींमुळे येणाऱया काळात हाँगकाँगला मोठा फटका बसणार आहे. अमेरिकेने यापूर्वीच हाँगकाँगचा विशेष दर्जा काढून घेतला आहे. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांची हाँगकाँगमध्ये मुख्य कार्यालये आहेत, जी आता हाँगकाँगबाहेर पडण्यास उत्सुक आहेत. हाँगकाँगमधील अनेक लोकशाहीप्रेमी नागरिकही हाँगकाँगच्या नजीक असणाऱया देशांमध्ये स्थलांतर करण्यास उत्सुक आहेत. चीन जेवढा हाँगकाँगवर लष्कराच्या मदतीने नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करेल त्यानुसार वर उल्लेखलेल्या घटनांना वेग आलेला दिसेल.

संपूर्ण जगाला ‘कोविड 19’ विषाणूची देणगी दिल्यानंतर चीनला संपूर्ण जगाला मदत करण्याची सुवर्णसंधी होती, पण झाले उलटेच. चीनने विषाणू पसरविण्याचे आरोप फेटाळून लावले, वर विषाणू पसरविण्यामागे अमेरिकेचाच हात असल्याचे जाहीर केले. जगाला लागणारी वैद्यकीय उपकरणेही कमी दर्जाची पाठविण्यात आली.

चीनच्या प्रचार तंत्राचा अभ्यास केला असता माओ झेडाँग यांनी साल 1945 मध्ये केलेली विधाने उधृत केली पाहिजेत. माओ म्हणत असत की, प्रचार तंत्र असे बनवा की, जनतेसमोर आपल्या प्रगतीचे ढोल जोरजोराने वाजविले पाहिजेत. सामान्य जनतेला उज्ज्वल भविष्यकाळाची स्वप्ने सतत दाखविली पाहिजेत, ज्यामुळे जनतेमध्ये जोश निर्माण होईल. हिंदुस्थानचे तत्कालीन पंतप्रधान नेहरू यांच्यावर चीनचा (आणि साम्यवादाचा?) एवढा मोठा पगडा होता की, त्यामुळेच नेहरू काँग्रेसच्या निवडणूक प्रचारासाठी हिंदुस्थानभर दौरे करत असताना प्रत्येक ठिकाणी त्यांच्या भाषणाची सुरुवात करताना एक वाक्य जरूर उच्चारत असत. ते वाक्य म्हणजे ‘हिंदुस्थानला गौरवास्पद इतिहास आहे’. या वाक्यानंतर श्रोत्यांकडून टाळ्यांचा कडकडाट होत असे. तो टाळ्यांचा कडकडाट थांबला की, ते दुसरे वाक्य उच्चारत असत ते म्हणजे ‘आपल्या हिंदुस्थानला उज्ज्वल भविष्य आहे’. या वाक्यानंतरही श्रोत्यांकडून टाळ्यांचा परत एकदा कडकडाट होत असे. गमतीचा भाग म्हणजे नेहरू कधीही तत्कालीन ‘वर्तमान काळा’बद्दल अवाक्षर काढत नसत.

चीनचा कम्युनिस्ट पक्ष खोटय़ा प्रचार तंत्रामध्ये वाक्बगार होता आणि अजूनही आहेच. खोटय़ा गोष्टींचा प्रसार करणे आणि अनेक जणांना वास्तवापासून अंधारात ठेवणे आणि यातून चीनच्या विस्तारवादाला खतपाणी कसे मिळेल याकडे बारीक लक्ष देणे हा त्यांचा उद्देश असे. चीनने यापूर्वी कधीही त्याच्या शेजारी देशांच्या प्रगतीसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केल्याचे आढळत नाही. कोणत्या मार्गाने त्या देशाला चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या पंखाखाली घेता येईल किंवा त्या देशाच्या भूभागावर ताबा मिळविता येईल यावरच त्याने लक्ष केंद्रित केलेले असे. मग ते चीन तो पाकिस्तानमधील ग्वादार बंदरापर्यंतचा महामार्ग असो की वन बेल्ट वन रोड किंवा युरोपपर्यंत जाणारा सिल्क रूट असो. या सर्व प्रकल्पांच्या गुंतवणुकीमागे उद्देश एकच. चीनचा प्रभाव वाढवत जाणे आणि हे करण्याच्या आड येणाऱया प्रत्येक अडथळ्याला हटविणे. चीनकडे प्रचंड संख्येने सैनिक असले तरी मानवतेची भूमिका चीनला अजिबात मान्य नाही. त्यामुळे चीनचे सैनिक हे पूर्णपणे पगारी आणि भाडोत्री कर्मचाऱयांप्रमाणे काम करतात. देशप्रेम वगैरे चीनच्या सैनिकांसाठी दुय्यम बाब असावी.

चीन कम्युनिस्ट पक्ष त्यांच्या अंतर्गत बाबतीत जेवढा अपारदर्शी आहे, तेवढाच बाह्य बाबतीतही आहे. त्यामुळे चीनमधील अंतर्गत बंडाळीचा आवाज बाह्य जगाला ऐकू येत नाही. चुकून बंडाचा आवाज निघण्याची शक्यता वाटली तरी त्या आवाजाला निर्दयतेने चिरडून टाकले जाते. बाह्य जगताशी संबंधच येऊ नये म्हणून सर्व बहुराष्ट्रीय माहिती माध्यमांवर चीनमध्ये बंदी आहे.

2018 मध्ये जगभर प्रसारित करण्यात आलेला सिनेमा ‘विनी द पो’ या सिनेमावर चीनमध्ये बंदी घालण्यात आली होती. कारण चिनी कम्युनिस्ट पक्षाला शंका होती की, या सिनेमामधून चीनमधील नेतृत्वावर टीका करण्यात आली आहे. चीनमधील लोकशाहीप्रेमी बंडखोर व्यक्तिमत्त्व लिऊ झियाबो यांना नॉर्वे देशाने ‘नोबेल’ पुरस्कार जाहीर केला तेव्हा त्याबद्दलच्या रागामधून चीनने नॉर्वेबरोबरचे राजनैतिक, आर्थिक आणि राजकीय संबंध तोडले होते. चीनच्या जागतिक स्तरावरील दादागिरीचा हा आविष्कार होता असे म्हणता येईल.

चीनचे एकमेव मुखपत्र असलेला ‘ग्लोबल टाइम्स’ चीनची भूमिका मांडतो असे बोलले जाते, पण चिनी कम्युनिस्ट पक्षाचा ‘ग्लोबल टाइम्स’ हा पिंजऱयातील पोपट आहे हे लपून राहिलेले नाही. मग ते डोकलाम असो की गलवान असो, चीन स्वतः खोडी काढतो आणि त्याचा गाजावाजा झाला की, उलट बोंबाबोंब करतो, पण आता चीन जगाचाच विश्वास गमावून बसला आहे. चीनच्या कोणत्याही बोलण्याला जागतिक व्यासपीठांवर पूर्वीसारखी किंमत दिली जात नाही. चीन या स्वनिर्मित गूढ चक्रव्यूहामधून बाहेर पडण्याची शक्यता अंधूक दिसते.

जगातील प्रभावशाली देश एकत्र येऊन जोपर्यंत चीनला धडा शिकवत नाहीत तोपर्यंत चीन सुधारेल ही शक्यता नाही, पण तो धडा शिकविण्याची वेळ जवळ आली आहे हे निश्चित. नजीकच्या भविष्यात याची उत्तरे आपणास मिळतीलच. ‘माझे ते माझे आणि तुझे तेही माझे’ हीच चीनची वृत्ती आहे. चीनची ही वृत्ती आणि चीनच्या या सवयीत यापुढील काळातही बदल होण्याची शक्यता नाहीच.