…नाही आनंदा तोटा!

175

>> स्वरा सावंत

दिवाळी सण मोठा… नाही आनंदाला तोटा… असं म्हणतात. अवघ्या आठवडाभरावर दिवाळी येऊन ठेपलीय. दिवाळी म्हणजे रोषणाई, दिवाळी म्हणजे आनंद, दिवाळी म्हणजे उत्साह, सौंदर्य आणि कलेचा उत्सव, म्हणूनच दिवाळीच्या मुहूर्तावर, सणावर रांगोळी, आकाशकंदील, पणत्यांची आरास केली जाते. या तेजोमय दिवाळीच्या स्वागतासाठी बाजरपेठाही फुलल्या आहेत. तेव्हा मग सजावटीच्या सामान खरेदीसाठी बाहेर पडल्यावर बाजारात नवे काय काय खरेदी करता येईल…

रंगावली

पारंपरिक रंग रांगोळीबरोबरच कुंदन रांगोळीचा युनिक पर्याय गेल्या काही वर्षांत रुजू झाल्याचे फायबर किंवा प्लॅस्टिकच्या बेसवर कुंदन, खरडे, मणी टीकाचा, डायमंड, मोती, चिकटवून या रांगोळ्या तयार केल्या जातात. जमिनीवर, टेबलावर किंवा एखादा छोटा कॉर्नर सजवण्यासाठी हा पर्याय उत्तम. 200 रुपयांपासून 800 ते हजार रुपयांपर्यंत  या रांगोळ्या उपलब्ध आहेत.

किल्ल्याची परंपरा

फराळ, रांगोळी, कंदील यापेक्षाही बालचमूंना आकर्षक आणि जिव्हाळाचा विषय म्हणजे दिवाळीचा किल्ला. आता जागेअभावी किल्ला बांधण्याचे दिवस मागे पडले. यासाठीच रेडिमेड किल्ले बाजारात दाखल झाले आहे. प्लास्टर ऑफ पॅरीस आणि फायबरचे हे किल्ले 200 ते 2500 रुपयांपर्यंत आहे. हा वारसा पुढच्या पिढीला कळावा यासाठी यंदा किल्ल्याची सजावट करा आणि किल्ल्याचा इतिहास दाखवा.

जमाना हँगिंगचा

दिव्यांची रोषणाई करताना इलेक्ट्रिकल माळा, चायना मेड लाइट, स्पॉट लाइटचा वापर गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. यामुळे लख्ख उजेड तर पडतोय, पण तेजोमय वातावरण तयार होत नाहीये. यासाठी एक नवा पर्याय म्हणून हँगिंग लाइटस् बाजारात नवीन पर्याय आला आहे. क्रिस्टल ग्लासने डिझाईन केलेल्या या हँगिंग लाइटस् आत दिवा लावण्याची व्यवस्था आहे. अगदी पारंपरिक फील देणारे हे दिवे प्रज्वलीत करतातच घरातील वातावरण तेजःपुंज दिसेल यात शंकाच नाही. हे दिवे दारात, घरातील सीलिंगच्या हुकला अडकवण्याची सोय आहे. याची किंमत 350 रुपयांपासून सुरू होत आहे. यामध्ये हत्ती, डोली अशा क्रिएटिव्ह राजस्थानी वर्क केलेल्या डिझाईन घेता येतील.

दिव्यांची आरास

मुंबई, ठाण्यात सध्या विविध रंगाच्या पणत्या दाखल झाल्या आहेत. यंदा बाजारात विशेष लक्षणीय ठरलाय तो मातीचा लामण दिवा. वाऱ्याने पणती विझण्याच्या समस्येवर तोडगा निघालाय तो शंख आकाराच्या पणतीमुळे. स्वस्तिक, मोर, झाड, होडी, कमळ, फुलपाखरू, लक्ष्मी देवीची छबी, गोलाकार, बदाम, चांदणी, षट्कोनी मडका, हंडी अशा विविध आकारांत या पणत्या उपलब्ध आहेत. टिकल्या, कुंदन, काचा लावून सजवलेल्या पणत्याही बाजारात दाखल झाल्या आहेत. त्याची किंमत 10 ते 500 रुपयांपर्यंत आहे.

 छोटे कंदील

मुंबईतील छोट्या छोट्या खिडकीच्या बोवल्यात लुकलुकणारे छोटे कंदील म्हणजेच स्मॉल लॅटर्न सध्या लोकलपासून थेट बाजारातही विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. कुंदन, लेस, काचा रेशमी दोर, प्लॅस्टिक, थर्माकॉलचे ग्लास, पुठ्ठे वापरून तयार केलेले कंदील खास छोट्या जागेच्या ऑफिसमधल्या सजावटीसाठी उत्तम पर्याय ठरत आहेत. 60 रुपये ते थेट 300 रुपये डझन अशा परवडेल अशा किमतीत हे कंदील उपलब्ध आहेत.

सुका मेव्याची रेलचेल

फराळामध्ये विपर्यास किंवा गिफ्टिंगसाठी उत्तम पर्याय म्हणून ड्रायफ्रूटकडे पाहिले जाते. सध्या जागोजागी बाजारात ड्रायफ्रूटच्या मोठमोठय़ा ऑफर्सने गजबजाट केला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सुकामव्याचा भाव चढला आहे. उकृष्ट दर्जाच्या अंजिराचा दर 1600 ते 1800 रुपये किलो, पिस्ता 2100 रुपये किलो आहे. याशिवाय काजू 1200 रुपये, बदाम 1000 रुपये, अमेरिकन बदाम 800 रुपये, मामर बदाम 1500 रुपये, सुजरी खारीक 250 रुपये, हिंदुस्थानी मनुके 200 रुपये, अफगाणी मनुके 300 रुपये किलोने विकले जात आहेत.

 

आपली प्रतिक्रिया द्या