अलौकिक अमृतानुभव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>>अपर्णा परांजपे 

महाराष्ट्रात समस्त अध्यात्मप्रेमींना अमृतानुभव देणारा ग्रंथ म्हणजे ‘ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी’. संतमांदियाळीचे अध्वर्यू संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांनी ‘उपनिषदांचे सार’ असलेल्या श्रीमद् भगवद्गीतेवर जे भाष्य  केले तीच ‘भावार्थदीपिका’ म्हणजेच ‘श्री ज्ञानेश्वरी.’

संपूर्ण महाराष्ट्रात समस्त अध्यात्मप्रेमींना ललामभूत ठरलेला ग्रंथ म्हणजे ‘ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी’! ‘माझा मराठाचि बोलु कौतुके। परी अमृतातेही पैजा जिंके। ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।’ अशा आत्मविश्वासाने संतमांदियाळीचे अध्वर्यू संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांनी ‘उपनिषदांचे सार’ असलेल्या श्रीमद् भगवद्गीतेवर जे भाष्य  केले तीच ‘भावार्थदीपिका’ म्हणजेच ‘श्री ज्ञानेश्वरी.’ हेच आजवर श्रीगीतेवरील भाष्यांमधील सर्वश्रेष्ठ व सार्वकालिक भाष्य सिद्ध झाले आहे.

1990 साली या ग्रंथाची लेखन सप्तशताब्दी सर्वत्र मोठय़ा दिमाखदार वैभवात साजरी केली गेली. एखाद्या ग्रंथाची लेखन सप्तशताब्दी/जयंती साजरी व्हावी असा हा एकमेव ग्रंथ आहे. या ग्रंथनिर्मितीचा इतिहास थोडक्यात असा ः-

शके 1212 मध्ये श्री ज्ञानदेवादी चार भावंडे शुद्धिपत्रासाठी पैठणला गेली. तेथे त्यांची विद्वत्ता व योगसामर्थ्य पाहून तेथील ब्रह्मवृंद त्यांना शरण आले. तेथून परतताना नगर जिह्यातील गोदावरी-प्रमद्वरा संगमावरील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र अशा नेवाशास ते आले. नेवाशात प्रवेश करताच एक साध्वी स्त्री आपल्या तरुण पतीच्या शवासमोर आक्रोश करीत असलेली पाहिली. श्री ज्ञानोबारायांची कीर्ती वायूवेगाने आधीच नेवाशात पोहोचली होती. त्या स्त्रीने श्री ज्ञानोबारायांना शरण जाऊन आपले दुःख सांगितले. श्री ज्ञानोबाराय त्या शवाकडे पाहून म्हणाले, ‘ऊठ सच्चिदानंदा!’ …आणि काय आश्चर्य! तो तरुण उठून बसला आणि श्री ज्ञानोबारायांना शरण गेला. पुढे ही भावंडे नेवाशातील शिवमंदिरात बसली असता गावातील लोक त्यांची कीर्ती ऐकल्यामुळे उत्सुकतेपोटी तेथे जमा झाले. लहानांपासून वृद्धांपर्यंत, कामकऱयांपासून विद्वानांपर्यंत, स्त्राr-शूद्र-वैश्य, तसेच तीर्थक्षेत्री आलेले संन्यासी असा सगळ्या अधिकाराचा जनसमुदाय तेथे गोळा झाला. त्यातील एका नेवासेकराने श्री ज्ञानोबारायांना विनविले, ‘आपण काही उपदेश करा ना!’ श्री ज्ञानोबारायांनी आपले श्रीगुरू निवृत्तिनाथांकडे पाहिले आणि श्रीगुरू निवृत्तिनाथ श्री ज्ञानोबारायांना उद्देशून म्हणाले, ‘कळी गिळतया जीवा। करी धावा पा वेगी।।’

नेवासेकरांची विनंती, श्रीगुरू निवृत्तिनाथांची आज्ञा आणि ‘विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले।’ असे म्हणणाऱया श्री ज्ञानोबारायांच्या वैश्विक प्रज्ञेचा आविष्कार यातून त्यांनी श्रीगीतेवर भाष्य सांगायला सुरुवात केली आणि तेथे असलेल्या सच्चिदानंदांनी ते भाष्य उतरवून घेतले. याचा उल्लेख श्री ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायाच्या शेवटच्या ओवीत आढळतो – ‘शके बाराशते बारोत्तरे। तै टीका केली ज्ञानेश्वरे। सच्चिदानंदबाबा आदरे। लेखकु जाहला।।’

संत श्री एकनाथ महाराजांनी शके 1506 मध्ये हीच श्रीज्ञानेश्वरी, त्यात काळाच्या ओघाने आलेले पाठभेद नाहीसे करून प्रतिशुद्ध केली. समाजाने वाळीत टाकलेल्या कुटुंबातील एका चौदा वर्षांच्या मुलाने संस्कृत भाषेत बंदिस्त असलेले तसेच काही उच्चवर्णीयांच्या अभ्यासाचा विषय असलेले सर्वश्रेष्ठ गीता तत्त्वज्ञान त्या वेळी बालवयात असलेल्या मराठी भाषेत अतिशय प्रभावीपणे विवरून सांगावे ही तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रातील क्रांतीच होती. श्री ज्ञानेश्वरी हा पहिलाच मराठी काव्यग्रंथ. त्याचा विषय ‘आत्मज्ञान.’ संतश्रेष्ठ श्री ज्ञानोबारायांना कर्मकांड, व्रतवैकल्यात गुरफटलेल्या समाजाला आत्मसाक्षात्काराची प्रेरणा देऊन ‘अध्यात्मज्ञान’ रुजवायचे होते. कर्मकांड निष्प्रभ करून निष्काम कर्मांनी योग, भक्ती, ज्ञान, गुरुमार्ग यांचा पाया विस्तृत व भक्कम करायचा होता. आणि या क्रांतिकार्याचे शिवधनुष्य श्री ज्ञानोबारायांनी लीलया पेलले.

हिंदुस्थानी साहित्य शास्त्रात काव्याचे नवरस मानले असून त्यात शृंगाररसाला प्राधान्य दिले आहे. श्री ज्ञानोबारायांनी मात्र या ग्रंथात शृंगाराला दुय्यम स्थान देऊन शांतरसाला सर्वश्रेष्ठ ठरविले आहे. धर्मग्रंथ म्हणून, काव्य म्हणून, व्यवहारनीती शिकविणारा म्हणून, कोणत्याही दृष्टीने श्री ज्ञानेश्वरी ग्रंथाकडे पहा, श्री ज्ञानेश्वरीचे सिंहासन डळमळायला लावणारा दुसरा ग्रंथच झाला नाही. कोणी श्री ज्ञानेश्वरीचे सिद्धांत व विषय प्रतिपादनाची रम्य शैली पाहून डोलेल; कोणी भाषागौरव व उपमा दृष्टांतादिकांची समर्पक योजना पाहून भारावून जाईल; कोणी दृष्टांताद्वारे श्री ज्ञानोबारायांनी व्यक्त केलेले व्यवहारज्ञान पाहून चकित होईल तर कोणी श्रीगुरुभक्ती व त्यांच्या वाणीतले अद्भुत प्रेम पाहून रंगेल; तर कोणी कर्म, ज्ञान व उपासना यातील सिद्धांतशास्त्र व व्यवहार यांचा उत्कृष्ट मेळ पाहून संतुष्ट होईल. पण एवढे खरे, की जो जो श्री ज्ञानेश्वरीचा परिचय करू जाईल, तो तो समाधान पावेल. श्री ज्ञानेश्वरीचे शब्दसौष्ठव रसिकांना रमवील तर अंतरंग सज्जनांना सुखवील. हे सांगाताना श्री ज्ञानोबाराय स्वतः म्हणतात, ‘तैसे अध्यात्मशास्त्राr इये। अंतरंगचि अधिकारीये। येर लोक वाक्चातुर्ये। होतील सुखिया।।’

श्रीगीतेचा श्रोता होता शास्त्रsपरेच निष्णात असा भक्तराज अर्जुन तर श्री ज्ञानेश्वरीचे श्रोते होते, वेगवेगळ्या वयोगटाचे आणि अधिकाराचे. त्यामुळे श्री ज्ञानोबारायांचे कार्य कठीण होते. शिवाय संस्कृत भाषेतील हा दिव्य ग्रंथ त्या वेळच्या बोलीभाषेत म्हणजेच मराठीत सांगायचा होता. मराठी भाषा त्या वेळी अगदी बालवयात होती. अशा वेळी श्रीगीता तत्त्वज्ञान सर्वांना समजेल असे मराठीतून मांडणे हे क्रांतिकार्यच होते.

श्री गीता हे ‘ज्ञानोपनिषद’ आहे तर श्री ज्ञानेश्वरी हे ‘आत्मोपनिषद’ आहे. म्हणून मनात कुठलाही संशय न ठेवता श्री ज्ञानेश्वरीचे वाचन, मनन, चिंतन अन् निदिध्यासन करणे आवश्यक आहे. श्री ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या अखेरी असलेले पसायदान म्हणजे श्री ज्ञानेश्वरीरूपी मंदिरावरील कळसच होय. ‘पसायदान’ हे अतिशय उदार असे ‘वैश्विक प्रार्थनागीत’ म्हणून जगात मान्यता पावले आहे. हा श्री ज्ञानेश्वरीरूपी ज्ञानयज्ञ पूर्ण झाल्यावर श्री ज्ञानोबाराय आपल्या विश्वात्मक गुरूंकडे प्रसाद मागताहेत – ‘जे खळांची व्यंकटी सांडो।’ श्री ज्ञानोबाराय दुष्ट दुर्जनांचा नाश व्हावा असे न म्हणता त्यांच्या ठिकाणचा वाकुडपणा (व्यंकटी) नाहीसा होवो. पुढे असे दुर्जनाचे सुजन झालेल्यांना सत्कर्माची आवड निर्माण होवो व त्याने परस्परांमध्ये मैत्रीचे संबंध वृद्धिंगत होवो.

जे अज्ञानाच्या अंधारात चाचपडताहेत त्यांच्या ठिकाणी असलेले अज्ञान दूर होऊन सर्वांच्या ठायी ‘स्वधर्मा’चा म्हणजेच उचित कर्तव्यकर्मरूपी सूर्य उदयास येवो. अशा प्रकारे स्वधर्माने जगणाऱया सर्वांच्या सात्त्विक इच्छा पूर्ण होवोत आणि अशा सर्वांना नेहमी डागरहित चंद्राप्रमाणे असलेल्या व सूर्यासारख्या तेजस्वी तरीही शीतल अशा सत्पुरुषांचा सहवास व कृपाशीर्वाद लाभो. असे सर्वसुख प्राप्त झाल्याने पूर्णकाम झालेल्यांनी सर्व जीवमात्रांमध्ये व्यापून राहिलेल्या आदिपुरुषाला (परमात्म्याला) अखंडित भजावे.

‘आणि ग्रंथोपजीविये। विशेषी लोकी इये। दृष्टादृष्ट विजये। होआवे जी।।’ ही पसायदानातील अत्यंत महत्त्वपूर्ण ओवी आहे. हा ग्रंथच जो उपजीविका बनवेल (येथे उपजीविका म्हणजे पोट भरण्याचे साधन नव्हे) म्हणजेच या ग्रंथातील तत्त्वज्ञान जीवनात उतरवील तो या लोकात विशेषतः प्राप्त करील. जे दृष्ट आहे व जे अदृष्ट आहे यावरही तो विजय मिळवील.

दृष्ट म्हणजे जे लौकिकात सहज आपल्याला दृष्टीला गोचर होते ते. अशा दृष्ट गोष्टी एक वेळ मिळविता येतात. परंतु अदृष्टाचे काय? कारण अदृष्ट आपल्या लौकिक दृष्टीला आकलण्यास अत्यंत कठीण, किंबहुना दुरापास्तच असते. त्यासाठी हवी असते दिव्य दृष्टी. जशी विश्वरूप दर्शनासाठी भगवंतांनी अर्जुनाला प्रदान केली. आपल्याला ही दिव्य दृष्टी केवळ श्री ज्ञानेश्वरीच्या अंतर्मुख होऊन केलेल्या अभ्यासातून प्राप्त होऊ शकते. म्हणून या ग्रंथाला केवळ पारायणाचा ग्रंथ न मानता तो जीवनाचा ग्रंथ बनविला तर कृतार्थ होऊ.  याचे माहात्म्य लक्षात घेता ‘श्री ज्ञानेश्वरी’ हा आगामी युगाचा ‘वेद’ असून त्यात प्रतिपादिलेला ‘विश्वस्वधर्मसूर्ये पाहो’ हा आचारधर्म आहे असेच म्हणणे योग्य ठरेल.

म्हणून या ग्रंथाचा व ग्रंथकर्त्याचा गौरव करताना संत श्री नामदेवराय म्हणतात –

ज्ञानराज माझी योग्यांची माउली।

जेणे निगमवल्ली प्रगट केली ।।1।।

गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी।

ब्रह्मानंद लहरी प्रगट केली।।2।।

अध्यात्मविद्येचे दाविलेसे रूप।

चैतन्याचा दीप उजळिला।।3।।

छप्पन्न भाषेचा केलासे गौरव।

भवार्णवी नाव उभारिली।।4।।

श्रवणाचे मिषे बैसावे येउनी।

साम्राज्यभुवनी सुखी नांदे।।5।।

नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी।

एक तरी ओवी अनुभवावी।।6।।

(लेखिका ‘ज्ञानदेवो म्हणे’ पाक्षिकाच्या संपादक आहेत.)
[email protected]