
>> फुलोरा टीम
डॉ. अशोक रानडे हे नाव हिंदुस्थानी संगीत क्षेत्रात अतीव आदरानं घेतलं जातं. संगीत हा त्यांचा ध्यास होता. केवळ हिंदुस्थानी अभिजात संगीतच नव्हे, तर आपल्या रोजच्या जीवनात ऐकू येणाऱया प्रत्येक आवाजातलं संगीत त्यांना आकर्षित करत असे. त्यामुळेच संगीतात श्रेष्ठ-कनिष्ठ असा भेद न करता हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतापासून ते हिंदुस्थानी लोक संगीत, चित्रपट संगीत, पाश्चात्त्य शास्त्राrय आणि लोक संगीत अशा सर्व प्रकारच्या संगीताचा आस्वाद आणि अभ्यास त्यांनी केला. सामान्यतः राग संगीताच्याच परिघात घोटाळणारा संगीत विचार त्यांनी आदिम संगीत, लोक संगीत, कला संगीत, धर्म संगीत, जन संगीत आणि संगम संगीत अशा सहा संगीत कोटींच्या मूलगामी चिंतनातून व्यापक स्तरावर नेला.
त्यांनी अनेक इंग्रजी- मराठी ग्रंथांचं लेखन केलं. ‘संगीताचे सौंदर्यशास्त्र’, ‘लोक संगीत शास्त्र’, ‘पाश्चात्त्य संगीत संज्ञा कोश’ ‘भाषण व नाटय़विषयक विचार’, ’संगीत विचार’, ‘हिंदी चित्रपट गीत ः परंपरा आणि आविष्कार’ हे त्यांपैकी काही महत्त्वपूर्ण ग्रंथ. ‘पाश्चात्त्य संगीत संज्ञा कोश’ हा ग्रंथ जवळपास पूर्ण झाला असतानाच डॉ. रानडे यांचं आकस्मिक निधन झालं. त्यानंतर त्यांचे शिष्य डॉ. चैतन्य कुंटे यांनी या ग्रंथाचं संपादन करून तो संगीत अभ्यासकांना उपलब्ध करून दिला आहे.
‘पाश्चात्त्य संगीत संज्ञा कोश’ हा संकल्पना कोश आहे. यात पाश्चात्त्य संगीताच्या संदर्भातील संकल्पना, संगीत प्रकार, त्याचे प्रस्तुतिविशेष, वाद्यशास्त्र, संगीतालेख इत्यादी विषयांच्या अनुषंगाने प्रचलित असणाऱया इंग्रजीसह ग्रीक, लॅटिन, इटालियन, फ्रेंच, जर्मन आणि अन्य भाषांतल्या संज्ञांचा परामर्श घेतला आहे. या संज्ञा अधिक स्पष्ट करण्यासाठी आवश्यक तिथे आकृत्या, टाकते यांचा वापर करण्यात आला आहे. सर्व संज्ञांचे उच्चार देवनागरी लिपीत दिल्यामुळे या कोशाच्या निमित्ताने प्रथमच पाश्चात्त्य संगीत संज्ञा मराठीतून समजावून घेणे शक्य झाले आहे. त्यामुळेच या कोशाद्वारे मराठी भाषेतील कोश साहित्यात आणि संगीतविषयक वाङ्मयात मोलाची भर पडली आहे असे म्हणता येईल. हार्मोनियम वादक, संगीत रचनाकार आणि संगीत अभ्यासक म्हणून डॉ. चैतन्य कुंटे सुपरिचित आहेत. संगीत अलंकार या संगीतातील पदवीसह इतिहास, भारत विद्या व पुरातत्त्व शास्त्र या विषयांत त्यांनी एम. ए. व एम. फिल केल्यानंतर ‘प्रार्थनास्थळांतील संगीताचा संस्कृती संगीत शास्त्रीय अभ्यास’ या विषयात डॉक्टरेट मिळविली आहे. ‘महाराष्ट्राचे शिल्पकार चरित्रकोश – संगीत खंड’ या कोशासाठी त्यांनी महाराष्ट्राच्या एकूण संगीत परंपरेचा वेध घेणारी प्रदीर्घ आणि अभ्यासपूर्ण प्रस्तावना महत्त्वाची आहे.
मराठी साहित्यात महत्त्वपूर्ण भर घालणाऱया, चाकोरीबाहेरचे विषय असलेल्या अभ्यासपूर्ण ग्रंथांची ओळख मराठी रसिकांना आणि अभ्यासकांना व्हावी या हेतूने अशा ग्रंथांचा विशेष गौरव केला गेला पाहिजे. गेल्या काही वर्षांत मराठी साहित्याचा वाचक हळूहळू कमी होत चालला आहे असं म्हटलं जातं. त्यामुळेच पुन्हा एकदा मराठी माणसाला, विशेषतः तरुण मुलांना पुस्तकांच्या जगात आणावं, त्यांना चांगली पुस्तकं, चांगले साहित्यिक कार्यक्रम यांची गोडी लागावी यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याच्या दृष्टीने मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि मराठीतल्या काही महत्त्वाच्या प्रकाशकांनी ‘वाचक जागर’ योजना सुरू करण्याचे ठरवले आहे. या योजनेचाच एक भाग म्हणून दरमहा एका दर्जेदार कार्यक्रमाचे आयोजन मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या सभागृहात करण्यात येईल. त्यापैकी पहिला कार्यक्रम २३ जूनला सायंकाळी ५.३० वाजता पॉप्युलर प्रकाशन या मराठीतल्या आघाडीच्या प्रकाशन संस्थेसोबत आयोजित केला आहे.
पॉप्युलर प्रकाशनाने अलीकडेच प्रकाशित केलेल्या ‘पाश्चात्त्य संगीत संज्ञा कोश’ या डॉ. अशोक दा. रानडे यांनी लिहिलेल्या आणि डॉ. चैतन्य कुंटे यांनी संपादित केलेल्या ग्रंथाच्या निमित्ताने ‘सूर पश्चिमेचे’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध संगीतज्ञ डॉ. चैतन्य कुंटे हे पाश्चात्त्य संगीतातल्या अनेक संकल्पना दृकश्राव्य पद्धतीने समजावून देणार आहेत. सिम्फनी, सोनाटा, ऑपेरापासून जॅझपर्यंत अनेक संगीत आविष्कार, नृत्य संगीत प्रकार, चर्च संगीत, लोक संगीत अशा पाश्चात्त्य संगीतातल्या अनेकविध संगीत प्रकारांची, वाद्यांची ओळख या कार्यक्रमातून रसिकांना होईल. पाश्चात्त्य स्वर-सप्तक, श्रेणी व्यवस्था, लयताल, मेलडी-हार्मनी अशा अनेक संकल्पनांचा परिचय करून घेण्याची संधी या कार्यक्रमामुळे रसिकांना उपलब्ध झाली आहे.

























































