पश्चिम घाटातील भटक्या

1520

>> शैलेश माळोदे

डॉ. असिर जॉनसिंह. वन्यजीवप्रेमी आणि निसर्गावर निस्सिम प्रेम करणारे शास्त्रज्ञ.

“पश्चिम घाटाशी असलेल्या माझ्या नात्याची सुरुवात अगदी लहान असताना झाली. तिरुनेलवेली तामीळनाडू जिल्हय़ात कवायत शिक्षक म्हणून काम करणाऱया माझ्या वडिलांनी मला, माझ्या भावांना आणि काही मित्रांना जेव्हा शक्य असेल तेव्हा जंगलात नेण्याचा परिपाठ केला होता. माझी आई मर्सी आणि दोन बहिणी इव्हलिन आणि क्रिस्टीदेखील कधीमधी आमच्याबरोबर येत. आम्ही मासे पकडत असू, नदीत पोहत असू आणि जंगलात भटकत असू’’ वयाच्या पंच्याहत्तरीला पोहोचूनदेखील रानवाटा तुडविण्यासाठी सदैव तत्पर असलेल्या डॉ. असिर जवाहर थॉमस जॉनसिंग . या शब्दांतून त्यांनी त्यांच्या जीवनाचा प्रारंभ ग्रंथित केला.

नागरकोविल इथं जन्मलेले जॉनसिंग पृष्ठवंशीय प्राण्यांबाबतचे तज्ञ म्हणजे व्हर्टेब्रेट इकॉलॉजिस्ट म्हणून ओळखले जातात. बंदीपूर राष्ट्रीय उद्यानातील ‘ढोल’ म्हणून ओळखल्या जाणाऱया रानकुत्र्यांचा त्यांनी केलेला अभ्यास लक्षणीय मानला जातो. त्याविषयी बोलताना ते म्हणाले, ‘‘माझ्या आयुष्याला वळण देणारी घटना म्हणजे बीएनएचएसच्या दिवंगत जे.सी. डॅनियल यांच्याशी झालेली भेट. ही भेट झाली तेव्हा आम्ही पश्चिम घाटात कॅम्पिंग करीत होतो. त्यांनी मला निसर्गात रस घ्यायला प्रवृत्त करून वन्य जीवनाचा अभ्यास करण्यास प्रोत्साहित केले. त्यामधून हे ढोलविषयक संशोधन घडून पुढील संशोधनाअंती मला डॉक्टरेट प्राप्त झाली. याविषयी अतिशय मनमोकळेपणे पुढे बोलताना डॉ. जॉनसिंग यांनी सांगितलं, ‘‘माझा प्रबंध सादर केल्यावर मी डॉ. जॉन एफ. आयसेनबर्ग या जगप्रसिद्ध सस्तन प्राणितज्ञास (मॅमॉलोजिस्ट) संशोधनात मदत केली. त्याच्याशी माझी भेट बंदीपूरला झाली. त्यानंतर मी काही साल स्मिथसोनियन इन्स्टिटय़ुशनमध्ये काम केलं. परतल्यावर मी 1982 ते 84 या काळात बीएनएचएसच्या हत्तींविषयीच्या प्रकल्पावर काम केलं आणि नंतर 1985 साली माझी निवड भारतीय वन्य जीवन संस्थेत झाली. 2005 साली सेवानिवृत्त होईपर्यंत मी तिथेच होतो डेहराडूनला, परंतु संधी मिळेल तसा मी पश्चिम घाटात परतून येत असे. कारण हा पश्चिम घाट माझ्या रक्तात भिनलाय.’’

पश्चिम घाटाला असलेल्या जोखमांचा खास अभ्यास करणारे म्हणून अनेक जण त्यांना प्रथम पर्यावरणतज्ञ म्हणून ओळखतात. ‘‘निवृत्तीनंतर मी ‘सेव्ह द टायगर फंड’ आणि भारत सरकारच्या वन, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालयातर्फे प्राप्त अर्थनिधीतून माझ्या नेचर कन्झर्वेशन फाऊंडेशन , मैसुरूमधील सहकाऱयांच्या मदतीतून तामीळनाडूतील कन्याकुमारी टेकडय़ांपासून सुरुवात करून महाराष्ट्रातील भीमाशंकर वन्य जीव अभयारण्यापर्यंत पसरलेल्या परिसराचं मोठय़ा सस्तन प्राण्यांसाठी कॉरिडॉर उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सर्वेक्षण केलं. या सर्वेक्षणामुळे प्राप्त झाल्यावर आधारित तसेच माझ्या आधीच्या भटकंतीच्या संदर्भान्वये मी ‘वॉकिंग द वेस्टर्न घाटस्’ नावाचं पुस्तक लिहिलं असं ते आवर्जून सांगतात.

पद्मश्री पुरस्काराचे मानकरी असलेले डॉ. ए.जे.टी. जॉनसिंग यांनी निवृत्तीनंतर दक्षिणेकडे रवाना होत आपल्या कारकीर्दीची दुसरी इनिंग सुरू केली. याविषयी बोलताना त्यांचे स्मिथसोनियन इन्स्टिटय़ुशनमधील मेंटर डॉ. जॉन स्नायडेनस्टिकर म्हणतात, ‘‘दुसरी इनिंग म्हणजे पश्चिम घाटात पायपीट करणं वा जीपनं फिरणं. पायी चालणे महत्त्वाचे. कारण जॉनसिंग चालण्यासाठी जगतात.’’ आपल्या परदेशी मेंटरविषयी अत्यंत आदराची भावना असलेले डॉ. जॉनसिंग त्यांच्या डॅनियल या हिंदुस्थानी गुरूंविषयीदेखील भरभरून बोलतात. ते म्हणतात, ‘‘डॅनियल तसे अबोल गृहस्थ होते, परंतु त्यांचं इंग्रजी जबरदस्त आणि बिनचूक असे. त्यांचं उभयचर, पक्षी, सरपटणारे प्राणी आणि सस्तन प्राण्यांविषयीचं ज्ञान अफाट होतं. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील प्रशंसनीय बाब म्हणजे त्यांचं प्रोत्साहन आणि संवर्धन क्षेत्रात तरुणांना पुढे आणण्याची हातोटी. त्यांच्या या गुणांचा फायदा अनेकांना झाला आणि मीदेखील त्यांच्यापैकी एक आहे.’’

1968 ते 1976 या कालावधीत जॉन सिंग अय्या नादर जानकी अम्मल कॉलेज, शिवकाशी (तामीळनाडू) येथे अध्यापन कार्य करीत पश्चिम घाटाबद्दलच्या आत्मीयतेमुळे ते आपले विद्यार्थी आणि काही सहकारी यांच्याबरोबर जवळच्या श्रीविलीपुथूर – राजपालयम टेकडय़ांमध्ये भटकत. त्यांनी इंटरनॅशनल युनियन फॉर दि कन्झर्व्हेशन ऑफ नंबरमध्ये आशियाई हत्ती, मांजर, कॅनिड्स कुर्गा अस्वल इत्यादींचे प्रतिनिधित्व केलंय.

एक जबरदस्त वन्य जीवप्रेमी आणि लेखकदेखील असलेल्या जॉनसिंग यांनी 70 शोधनिबंध आणि 80 लेख लिहिले असून त्यांनी एकूण 3 पुस्तकांचं लेखन आणि द्विखंडीय ‘द मॅमल्स ऑफ साऊथ एशिया’ या ग्रंथाचं संपादन केलंय. ‘चालण्यासाठी जन्म आपुला’ ही स्थिती डॉ. ए.जे.टी. जॉनसिंग खरोखर जगत आहेत. वनातून फिरताना ते वाघांच्या पंजांच्या खुणा, मूत्राचा गंध, वनातील सावधगिरीचे इशारे या सर्वांद्वारे ते पश्चिम घाटाचं अरण्यवाचन सतत करतात आणि मुख्य म्हणजे तरुणांना प्रोत्साहित करतात. म्हणून ते हिंदुस्थानचे वाईल्ड लाईफ प्रोटेक्ट आयकॉन ठरतात यात वाद नाही.
[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या