प्रासंगिक – विद्वतरत्न भाऊजी दप्तरी

747

>> प्रतीक राजुरकर

डॉ. केशव लक्ष्मण दप्तरी उपाख्य भाऊजी यांचे वडील एका माध्यमिक शाळेत शिक्षक होते. साधारण आर्थिक परिस्थिती असूनही वडिलांनी भाऊजींच्या इंग्रजी शिक्षणाची तरतूद केली. भाऊजींचे इयत्ता प्राथमिक शिक्षण वर्धा जिह्यातील आर्वीला झाले. नागपूरला पुढील शिक्षण घेऊन कला शाखेचे पदवीधर झाले. इंग्रजी माध्यमात शिक्षण घेऊनसुद्धा भाऊजींनी ग्रहलाघव, ‘सिध्दांत कौमुदी’सारख्या ज्योतिष शास्त्र्ा विषयात ज्ञान प्राप्त केले. भाऊजींनी वकिलीचा अभ्यासक्रम पूर्ण केला. मात्र इंग्रज सरकारची चाकरी करण्याची संधी त्यांनी नाकारली. सरकारी नोकरी करून स्वतःचा सामाजिक मृत्यू ओढवू इच्छित नाही असे जाहीर केले. प्रचंड ज्ञान संपादित करून समाजाला अर्पण करण्याचा त्यांचा मनोदय स्पष्ट होता. आपल्या आयुष्यात त्यांनी इंग्रजांकडून कुठलेही मानसन्मान स्वीकारले नाहीत.

भाऊजींचे वकिलीबरोबरच विविध विषयांतील संशोधन आणि लिखाण सुरूच होते. 1908 पर्यंत भाऊजींनी ‘प्रत्यक्ष भूमिती’ आणि ‘राज्य शासन शास्त्र्ा’ हे दोन ग्रंथ पूर्ण केले. 1911 नंतर ग्रहगणितच्या नविन पद्धतीचे संशोधन करून ‘ग्रहगणित कुतूहल’ ग्रंथ लिहिला. त्यासाठी ‘मेंदूचे तुकडे पडल्यासारखे वाटावे’ असे भाऊजी म्हणत. 1913 साली ‘भारतीय युद्धकालनिर्णय’ हा प्रबंध लिहिला, जो 1918 साली ‘विविध ज्ञान विस्तारा’ यात प्रकाशित झाला. हा प्रबंध वाचून लोकमान्य टिळकांनी डॉ. मुंजेंना पत्राद्वारे त्याचे इंग्रजी भाषांतर भाऊजींनी करावे म्हणून विनंती केली होती. श्रीपाद कोल्हटकरांनी त्यासाठी नागपूरला येऊन भाऊजींची भेट घेतली होती. ‘भारतीय ज्योतिःशास्त्र्ा निरीक्षण’ या ग्रंथाची हस्तलिखित प्रत कोल्हटकर यांच्या मार्फत टिळकांना प्राप्त झाली. त्यामुळे टिळक अधिकच प्रभावित झाले. टिळकांनी स्वतः भाऊजींना तार करून जून 1920 ला पुण्याला बोलावून सांगलीतील ज्योतिष्य संमेलनात शुद्ध पंचांग तयार करण्याची जबाबदारी दिली. ज्योतिर्गणिताच्या संशोधनावर भाऊजींचे ‘वैदिक कालगणना पद्धती’, ‘श्रीरामजन्मकालनिर्णय’, ‘पंचांगचंद्रिका’, ‘श्रीराम वनवास रोजनिशी’सारखे ग्रंथ भाऊजींच्या अद्भुत विद्वतेची प्रचीती देणारे आहेत. टिळक विचारांचा पगडा असलेले विद्वान म्हणून भाऊजींची देशभरात ओळख निर्माण झाली.

भाऊजींनी वैद्यक शास्त्रातील होमिओपॅथी व ऍलोपॅथीची पुस्तके वाचून चिकित्सा केली. त्यातून ‘चिकित्सा-परीक्षण’, ‘रहस्यवर्णन’, ‘सच्चिकित्सा-प्रकाशिका’ (1936) व इंग्रजीमध्ये ‘odily Reactions and Examination Of Systems And Therapeuties’ (1938) यांसारखे संशोधनात्मक ग्रंथ निर्माण झाले. भाऊजी अनेक विषयांचे पंडित होते, परंतु भाऊजींना सर्वात जास्त आत्मीयता होती ती होमिओपॅथी विषयात. कारण कुठलाही दुष्परिणाम न करता आजार बरा करण्याची किमया होमिओपॅथीत आहे असे त्यांचे ठाम मत होते. होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्युअल हॅनेमन हे भाऊजींना गुरुतुल्य होते. मात्र भाऊजींच्या मते कुठलीही व्यक्ती ही अचूक असू शकत नाही. भाऊजींनी शुसलरच्या 12 सूत्रांचा स्वीकार केला, ज्यात केवळ 12 औषधी आहेत आणि निवडण्यास सोयीचे आहे. ज्याला सरलीकृत होमिओपॅथी (Simplified Homeopathy) म्हटले जाते, तर काही सूत्रांना आधुनिक करून भाऊजींनी ती वापरली. भाऊजींच्या होमिओपॅथीतील योगदानामुळे तत्कालीन आरोग्यमंत्री डॉ. बारलिंगे यांनी होमिओपॅथी व बायोकेमिक कायद्याला 1952 साली मान्यता दिली.

धर्मातील अनिष्ट प्रथांवर भाऊजींनी लेखणीतून समाचार घेतला. 1918 साली भाऊजींना ‘धर्मरहस्य’ या ग्रंथामुळे सनातनी लोकांच्या टीकेला सामोरे जावे लागले. आपल्यावरील टीकेला भाऊजींनी अनेक निबंध लिहून टीकाकारांची तोंडे बंद केली. मात्र 1940 साली या सर्व निबंधांचे संकलन होऊन ‘धर्मविवादस्वरूप’ नावे एक नवीन ग्रंथ तयार झाला. त्यामुळे भाऊजींच्या कुटुंबाला बहिष्कृत केले गेले. भाऊजींनी गांधीजींच्या अनेक आंदोलनांत सहभाग दिला. स्वतः काँग्रेस विचारांचे असूनही तात्याराव सावरकरांच्या अस्पृश्यताविरोधी मोहिमेत ते सहभागी झाले. शिवाय ‘Social Institutions in Ancient  India’ हे पुस्तक लिहिले. भाऊजींच्या धर्मशास्त्रावरील ज्ञानाने प्रभावित होऊन गांधीजींनी तुरुंगात असताना भाऊजींना येरवडय़ाला बोलावून धर्मशास्त्राबाबत विस्तृत चर्चा केली. सतत नऊ वर्षे उपनिषदांचा सखोल अभ्यास करून ‘उपनिषदांचा वस्तुनिष्ठ व बुद्धीप्रत्ययक अर्थ’ (औपनिषदक जीवनाविषयी) पूर्ण करून त्याचे ‘The Rationalistic and Realistic Interpretation of the Upanishads’ असे इंग्रजी भाषांतरसुद्धा केले. यावर तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्राr जोशींनी त्याचे ‘अभूतपूर्व’ असे वर्णन करून अध्यात्मविचाराच्या नव्या युगाचा आरंभ म्हणून स्तुती केली आहे. या लेखासाठी दप्तरी गंथ प्रकाशन समितीने प्रकाशित केलेल्या करणकल्पता (उत्तरार्ध) या गंथातील सुरेश डोळके यांनी लिहिलेल्या लेखातून आणि विद्वतरत्न स्व. भाऊजी दप्तरी स्मारक ट्रस्टद्वारा प्रकाशित ग्रंथातून संदर्भ घेतले आहेत.

भाऊजींच्या आयुष्यात ज्ञान संपादित करण्यास कुठलेच क्षेत्र शिल्लक राहिले नाही. त्यांच्या प्रचंड विद्वत्तेचा सन्मान म्हणून त्यांना ‘विद्वतरत्न’ ही उपाधी देण्यात आली. ज्ञानाच्या विद्वत्तेच्या अमर्याद सागरातील विद्वतरत्न म्हणून भाऊजी दप्तरींचे कार्य सदैव स्मरणात राहील.

आपली प्रतिक्रिया द्या