ठसा : डॉ. श्रीकांत बहुलकर

2400

>> मेधा पालकर

प्राच्यविद्या संशोधनात ज्या तज्ञ संशोधकांचे नाव घेतले जाते त्यात डॉ. श्रीकांत बहुलकर यांचा समावेश होतो. अत्यंत बहुश्रुत असलेल्या या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू आहेत. डॉ. श्रीकांत बहुलकर मागील चार दशके संस्कृत, तिबेटन लिपी, संहिता तसेच संशोधन क्षेत्रात अव्याहतपणे संशोधन कार्य करीत आहेत. पुण्याच्या भांडारकर प्राच्यविद्या संस्थेत ते कार्यरत होते. मागे तेथून ते निवृत्त झाले तरी नंतरही संस्थेचे मानद सचिव म्हणून ते ‘भांडारकर प्राच्यविद्या संस्थे’ची धुरा वाहत आहेत. तेथे संशोधनाचे कार्य एखाद्या विहीत कर्तव्यासारखे अखंडपणे करीत आहेत. अशा डॉ. श्रीकांत बहुलकर यांना ‘महामहोपाध्याय पां. वा. काणे सुवर्णपदक’ जाहीर झाले आहे. वेदांबाबतचे संशोधन, धर्मशास्त्र आणि काव्यशास्त्र यांच्या संदर्भातील अभिजात संस्कृतमधील लक्षणीय योगदानासाठी महामहोपाध्याय पां. वा. काणे स्मृती सुवर्णपदक दिले जाते. डॉ. बहुलकर यांचा हा गौरव सर्वार्थाने उचित म्हणावा लागेल. ती त्यांच्या संशोधन क्षेत्रातील योगदानाला मिळालेली पोचपावती आणि कौतुकाची पाठीवर दिलेली शाबासकीच आहे. एशियाटिक सोसायटीने त्यांच्या विद्वत्तेचा यथोचित गौरव केला आहे. त्यांचे मूळ गाव पुणे जिह्यातील खेड तालुक्यातील बहुळ. या छोटय़ा खेडय़ातून बहुलकर शिक्षणासाठी पुण्यात आले. अथर्ववेदातील भैषज्य (औषधीशास्त्र) या विषयावर संशोधन केलेल्या बहुलकरांनी डॉक्टरेट पूर्ण केली. जपानमध्ये तिबेटी औषधीशास्त्राचा अभ्यास केला. त्यासाठी ते तिबेटी भाषा शिकले. त्यानंतर त्यांनी ‘वज्रयान’ या बौद्ध पंथाचा सखोल अभ्यास केला. वेद आणि बौद्ध तंत्र या दोन्ही विषयांत संशोधन करणारे जगातील बहुलकर हे एकमेव विद्वान असावेत. संशोधनाच्या क्षेत्राबरोबर डॉ. श्रीकांत बहुलकर यांनी इतरही अनेक जबाबदाऱया सांभाळल्या. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या बालमुकुंद संस्कृत महाविद्यालयाचे प्राचार्य, सारनाथ येथील केंद्रीय विद्यापीठाच्या दुर्मिळ बौद्ध हस्तलिखित संशोधन विभागाचे प्रमुख संपादक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. हार्वर्ड विद्यापीठाच्या डिव्हिनिटी स्कूलमध्ये त्यांना मानद प्राध्यापक पद देण्यात आले होते. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या हिंदू अध्ययन केंद्रामध्येही अभ्यागत प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले. जपान, कॅनडा, जर्मनी, नेदरलँडस्, रूमानिया, फिनलंड, रशिया, अमेरिका, थायलंड आदी देशांत डॉ. श्रीकांत बहुलकर यांना विद्यापीठे, शैक्षणिक संस्थांमधून व्याख्याने आणि भेटी देण्याकरिता, चर्चासत्रांचे अध्यक्षस्थान भूषविण्याकरिता अनेकदा आमंत्रणे आली आहेत आणि येतच असतात. विविध प्रकल्पांमध्ये मार्गदर्शन करण्याकरिता अनेकदा येणारी ही निमंत्रणे त्यांच्या विद्वत्तेची साक्ष देतात. डॉ. बहुलकर यांचे वैशिष्टय़ म्हणजे ते संशोधक म्हणून अत्यंत गंभीर असले तरी दैनंदिन व्यवहारात मात्र ते खेळीमेळीने वागतात. वेद आणि बौद्ध तंत्र या विषयात श्रीकांत हे सर्वाधिक पारंगत म्हटले जातात. आचार्य म्हणून त्यांनी असंख्य विद्यार्थी घडवले. तसेच अनेक विद्यार्थ्यांशी त्यांचे जन्मभराचे अतूट नातेही जडले. असे हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील विविध विद्यापीठांत आणि महाविद्यालयांत व्याख्याने, चर्चासत्रे यासाठी फिरणाऱया डॉ. बहुलकर यांच्या संशोधनाचा दबदबा जगभर आहे. साहित्य अकादमीने त्यांना अभिजात आणि मध्ययुगीन साहित्याबद्दल भाषा सन्मान पुरस्कार दिला आहे. आता मिळालेला पुरस्कार त्यांच्या आजवरच्या संशोधन कार्यावर उमटलेला ठसाच म्हणावा लागेल.

आपली प्रतिक्रिया द्या