सेवाक्रती – दवा आणि दुवा साधताना

278

>> राजू बांदेकर

फॅमिली डॉक्टर ही संकल्पना मोडीत निघाली असताना जनरल फिजिशियन असलेले डॉक्टर मंगेश तिवसकर त्यांच्या रुग्णांना मात्र कुटुंबातील सदस्य वाटतात. कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाही डॉ. तिवसकर क्लिनिकमध्ये आणि कोविड-19च्या रुग्णालयात अविरत रुग्णसेवा देत आहेत.

देशाचे रक्षण आपले सैनिक करतात, तसेच आपले व आपल्या आरोग्याचे रक्षण डॉक्टर करतात. एक तास जरी पोलिसांना रस्त्यावरून बाजूला केले, पोलीस ठाण्याऐवजी त्यांना घरी बसविले, तर कायदा आणि सुव्यवस्थेचे काय होईल? याचा विचार न केलेलाच बरा! तसेच रुग्णाला वैद्यकीय सेवा वेळेवर मिळाली नाही, डॉक्टर उपलब्ध झाले नाहीत, योग्य उपचार केले गेले नाहीत तर काय होईल या मानवजातीचे याची आपण कल्पनाही करू शकत नाही. सध्या जगभरात फोफावलेल्या कोरोना विषाणूला नियंत्रणात आणण्याचे, मनुष्यप्राण्याला वाचविण्याचे प्रयत्न जगभरातील डॉक्टर व आरोग्यसेवेशी निगडित सर्व कर्मचारी करीत आहेत. सध्या तेच रक्षक आहेत. त्यामुळे विशेषतः डॉक्टर हे साऱया समाजाचे श्रद्धास्थान व आधार आहेत.
मुंबईच्या पश्चिम उपनगरातील डॉ. मंगेश हरिहर तिवसकर हे लोकांचा वैद्यकीय सेवेवरील विश्वास उडाला असताना रुग्णांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. वैद्यकीय व्यवसायाचे बाजारीकरण झाले आहे. फॅमिली डॉक्टर ही संकल्पनाच अलीकडच्या काळात मोडीत निघाली आहे. परंतु जनरल फिजिशियन असलेले डॉक्टर मंगेश तिवसकर त्यांच्या प्रत्येक रुग्णाला आपल्या कुटुंबातील सदस्य वाटतात. कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाही डॉ. तिवसकर त्यांच्या दहिसर (पूर्व) येथील क्लिनिकमध्ये अविरत रुग्णसेवा देत आहेत.मधुमेह,रक्तदाब, थायरॉईड, हृदयरोग आदी आजारांवर उपचार करणारे स्पेशालिस्ट म्हणून डॉक्टरांची ख्याती आहे. ब्रिटन, स्कॉटलंड, अमेरिका, आयर्लण्ड आदी देशांनी फेलोशिप देऊन त्यांना गौरविले आहे. हिंदुस्थानातील अनेक वैद्यकीय संस्थांनीदेखील प्रशस्तिपत्र देऊन त्यांचा सन्मान केला आहे. डॉ. मंगेश तिवसकर हे सध्या असोसिएशन ऑफ फिजिशियन ऑफ इंडिया (API) आणि इंडियन कॉलेज ऑफ फिजीशीयन्स (ICP) या संघटनांचे जनरल सेक्रेटरी आहेत. रुग्णसेवा, लोकसेवा, देशसेवा ही त्यांच्या नसानसात भिनली आहे. लंडन, अमेरिका असो अथवा आशिया खंडातील कोणताही छोटा-मोठा देश असो, डॉक्टरांना मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, थायरॉइड ग्रंथीचे आजार या विषयांवर व्याख्यान देण्यासाठी सन्मानाने निमंत्रित केले जाते. कोविड-19चे रुग्ण असणाऱया रुग्णालयातही ते आपली सेवा बजावत आहेत. रुग्णांच्या तपासणीबरोबरच त्यांच्या नातेवाईकांना धीर देणं, त्यांची आस्थेने चौकशी करणं ही आपली जबाबदारीच असल्याचं ते मानतात. दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड आदी पश्चिम उपनगरांत डॉ. मंगेश तिवसकर त्यांच्या सेवाभावी वृत्तीमुळे ते लोकप्रिय झाले आहेत. पोलिसांना तर डॉ. तिवसकर मोफत सेवा पुरवतात. त्यांच्याकडून आपल्या क्लिनिकमध्ये फी आकारत नाहीत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांच्या अनुभवाचा लाभ केंद्र व राज्य सरकारमधील संबंधित अधिकारी व डॉक्टर यांना निश्चितच होत आहे. रोज व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे सरकारी अधिकारी, डॉक्टर यांच्याशी डॉक्टरांची चर्चा होते. निगर्वी अशा डॉक्टरांचं राहणीमान अगदी साधं आहे. डॉ. मंगेश तिवसकर हे मूळचे अमरावतीचे. त्यांचे वैद्यकीय शिक्षण अंबेजोगाईमध्ये झाले. पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नायर रुग्णालयात अधिव्याख्याता म्हणून त्यांनी काम केले. दहिसरमधील प्रसिद्ध डॉ. अशोक मुळगावकर यांच्या रुग्णालयात 1 जानेवारी 1993 रोजी त्यांनी पहिला रुग्ण तपासला. डॉ. मुळगावकरांच्या पाठिंब्यामुळे डॉ. तिवसकर यांनी प्रगतीची शिखरं गाठली. दहिसर (पूर्व) येथे प्रथम स्वतःचे क्लिनिक, त्यानंतर तन्वी ‘नार्ंसग होम’ नावाचे आपल्या सहकाऱयांच्या मदतीने हॉस्पिटल उघडले. डॉ. तिवसकर यांच्या यशात पत्नी डॉ. शिल्पा तिवसकर यांचा मोलाचा वाटा आहे. डॉ. तिवसकर हे अमरावतीहून रिकाम्या हाताने मुंबईत आले. परंतु आता त्यांनी आपल्या स्वबळावर कष्टाने स्वतःची वैद्यकीय यंत्रणा उभी केली आहे. ही कौतुकाचीच गोष्ट पण याहूनही मोठं म्हणजे रुग्णसेवा करतानाच त्यांनी असंख्य माणसं जोडली. माणसे जोडण्याची देणगी डॉ. तिवसकर यांना मिळाली आहे. म्हणून ते सर्वमित्र आहेत.

डॉ. तिवसकर म्हणतात, नोव्हल कोरोना विषाणू हा आधीपासून अस्तित्वात असलेल्या ह्यूमन कोरोना विषाणूच्या मूळ जनुकीय स्थापनेत नवीन बदल होऊन निर्माण झालेला एक विषाणू आहे. हा संक्रमक आजार इतर संक्रमक आजारांपेक्षा जास्त संसर्गजन्य, पण कमी प्राणघातक आहे. 95 टक्के रुग्ण संपूर्ण बरे होतात. पण दुर्दैवाने या आजाराबाबत निर्माण झालेल्या भीतीपोटी जास्त अफवा पसरल्या व लोकांमध्ये खूपच गैरसमज पसरले. कोरोनाचे निदान म्हणजे मृत्यूचं आमंत्रण असे चित्र निर्माण झाले. कोरोनाबाधित रुग्णाला व त्याच्या परिवाराला समाजात पसरलेल्या गैरसमज व भीतीपोटी प्रचंड सामाजिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते आहे. हे जास्त घातक व क्लेशदायक आहे. आरोग्य मंत्रालय व काही आरोग्य संस्थांनी सुचविलेल्या काही अत्यंत सोप्या, पण परिणामकारक प्रतिबंधात्मक उपाययोजना अंगिकारल्यास कोरोनापासून सहज बचाव शक्य आहे. कोरोनावर विजय मिळवायला समाजातील सर्व स्तरांवर टीमवर्क अत्यंत आवश्यक आहे. यात प्रत्येक नागरिकाचा व्यक्तिगत हातभार व सहभाग महत्त्वाचा आहे.

आपली प्रतिक्रिया द्या