
>> विनायक
ज्यावर आपण राहतो ती जागा म्हणजे पृथ्वीचं भू-कवच किंवा क्रस्ट. पृथ्वीच्या गाभ्यातील अतितप्त, अश्मरसावर (लाव्हा) अनेक मोठमोठय़ा चकत्या (प्लेट्स) ‘तरंगत’ असतात आणि त्यावर आपली भूपृष्ठाrय सजीवांची वस्ती असते. त्यात वनस्पतीसुद्धा येतात. याचा अर्थ समुद्रात ‘वस्ती’ नसते असं नाही. ‘ब्लू व्हेल’सारखे महामत्स्य तिथे कसे विहार करतात आणि पाण्यातील प्राणवायू किंवा ऑक्सिजन घेऊन सारे जलच कसे जगतात हेसुद्धा आपल्याला ठाऊक आहे. त्यात कित्येक विस्मयकारी वनस्पती आणि सूक्ष्मजीवही आहेत.
एका बाजूला आपण अंतराळात यशस्वीरीत्या उडतोय हे चांगलंच आहे, पण त्याचवेळी अंतराळातील रहस्यांइतकीच आपल्या निळ्या ग्रहावरचीही अनेक ‘रहस्ये’ आपल्याला पूर्णतः समजलेली किंवा उलगडलेली नाहीत. संशोधनाचा आवाका सतत, सार्वकालिक आणि तराळ ते अंतराळ असा का असावा लागतो त्याचा यावरून अंदाज येतो.
…तर पृथ्वीची रचना असा काही आपला आजचा विषय नाही, पण ‘भू’गोलावर ज्या काही नैसर्गिक हालचाली घडतायत त्याची अगदी सखोल नसली तरी थोडीफार माहिती आपल्याला असायला पाहिजे. या नैसर्गिक आविष्कारातल्या काही गोष्टी नि घटना आश्चर्यकारक, तर काही भयावहसुद्धा असतात. म्हणजे बघा ना, एवढय़ा ‘प्रगत’ जगाला भूकंप नक्की केव्हा, कुठे नि किती तीक्रतेचा होईल ते तंतोतंत सांगता येत नाही. भूकंपमापन यंत्र त्यांचा अंदाज निश्चितच देतात. पृथ्वीवरचे नेमके कोणते भाग भूकंपप्रवण आहेत तेही सांगता येतं. तरीही अचानक एखादा भूकंप एखादा भूभाग एवढ्या गदगदा हलवतो की, रिश्टर स्केलवर नोंदणीने तीक्रता समजली तरी प्रत्यक्ष हानी अनेकांना आयुष्यातून उठवणारी असते.
कारण तेच आपण ज्या भूपृष्ठावर राहतो तेच नव्हेतर खोल सागरतळाखालचेही भू-कवच त्याखालचा लाव्हा रसावर ‘प्लेट टॅक्टॉनिक’च्या रूपाने तरंगत असते. तो अश्मरस डचमळला की, या वरच्या ‘प्लेट’ हलतात, सरकतात, परस्परांना टक्करतात किंवा परस्परांपासून विलगसुद्धा होतात. आपली हिंदुस्थानी उपखंडाची प्लेट अशीच साडेपाच कोटी वर्षांपूर्वी उत्तरेकडच्या युरेशियन ‘प्लेट’ला धडकली. परिणामी त्यांच्या मधला समुद्र नाहीसा होऊन सागरतळच उचलला गेला आणि उत्तुंग हिमालय जन्माला आलं. त्यामुळे आपला सह्याद्री हिमालयापेक्षा उंचीने कमी असला तरी वयाने बराच मोठा आहे. 1912 मध्ये आफ्रेड वॅगनर यांनी भूविज्ञानाचा अभ्यास करताना पृथ्वीवरील विविध खंडांच्या परस्परांपासून दूर जाण्याच्या प्रक्रियेचा मागोवा घेतला तेव्हा भू-कवचीय चकत्यांना ‘प्लेट टॅक्टॉनिक म्हणजे भू-कवचीय चकत्या असं नाव मिळालं, पण ते कोणी एका व्यक्तीने दिलेलं नाही.
या लेखात या ‘प्लेट्स’ची चर्चा एवढय़ासाठीच की, सुमारे 30 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीचं कवच बहुतांशी एकसंथ होतं. म्हणजे दोन भूभागांमध्ये समुद्र आणि त्यामुळे विविध खंड किंवा ‘कॉन्टिनन्ट’ असा प्रकार नव्हता. मात्र पृथ्वीच्या उक्रांतीत भूगर्भीय तत्परसाच्या तीक्र हालचालींनी हळूहळू या पॅन्जिया नावाच्या एकाच खंडाचे अनेक तुकडे झाले. सुरुवातीला पॅन्जियाबरोबर रॉडिनिया, कोलंबिया अशी महाखंड होती. मग तीही विलग होत उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, युरेशिया (म्हणजे युरोपचा काही भाग आणि आशिया) ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका आणि हिंदुस्थानी उपखंड (सबकॉन्टिनन्ट) सध्या आहेत त्या ठिकाणी स्थिरावली.
अर्थात हे ‘स्थिरावणं’सुद्धा ‘तरंगतं’च आहे हे आपण आधीच वाचलं. यात आफ्रिका खंडात सध्या नजरेत भरेल इतका बदल घडताना दिसतोय. थोडक्यात आफ्रिका खंडाच्या पूर्वेकडचा काही भाग ‘फुटून’ मध्येच समुद्राचं पाणी येणार याविषयी दुमत नाही. या आफ्रिका खंडाला सुमारे 6,400 किलोमीटर (उत्तर-दक्षिण अशी) प्रचंड भेग पडतेय. त्याचा परिणाम इथिओपिया, केन्या, सोमालिया, रॅवान्डा टांझानिया, उरुग्वे बुरुन्डी, कॉन्गो, मालावी, झांबिया आणि मोझॅम्बिक इतक्या देशांवर होणार आहे! त्यातील सोमालिया, केन्या आणि टांझानियाचं एक वेगळंच ‘खंड’ तयार होईल असं स्पष्ट दिसतंय!
आता हे नेमकं कधी घडेल? बराच काळ त्यासाठी जावा लागेल. प्रतिवर्षीय केवळ सात मिलिमीटर एवढय़ा नगण्य वाटणाऱया वेगाने ही भेग (रिफ्ट) वाढत असल्याने काही देश आफ्रिका खंडातून नैसर्गिक कारणांनी ‘फुटून’ निघायला काही लाख वर्षे लागतील, परंतु सुमारे दोन कोटी वर्षांपूर्वी याचा आरंभ झाला असून आता तो नजरेला स्पष्ट जाणवतोय. तेव्हा त्याचे संभाव्य परिणाम काय होतील याची चर्चा सुरू झाली आहे.
1972 मध्ये हा केवळ वरवरचा ‘तडा’ आहे असं वाटलं होतं, पण 1990 नंतर त्याची सखोलता समजू लागली. आफ्रिका खंडाच्या पूर्व भागातील काही देशांचं निराळं ‘खंड’ तयार होईल तेव्हा त्या भागातलं पर्यावरण पूर्णपणे बदलेल. त्याचा परिणाम जागतिक पर्यावरणावरही आपसूकच होईल. आतापर्यंत अनेकांना रशियासारख्या देशाची किंवा एकेकाळच्या हिंदुस्थानचीही राजकीय ‘फाळणी’ झाल्याचं ठाऊक आहे. मात्र आफ्रिका खंडाची फाळणी राजकीय नसून नैसर्गिक असणार आहे आणि पृथ्वीच्या गाभ्यात आजही काहीतरी घडत असतं याचा पुरावाही आहे.