लेख – शिक्षणाबरोबर मूल्यमापन पद्धतीत बदल आवश्यक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अविनाश कुलकर्णी 

आपण ‘मूल्यमापनासाठी परीक्षा हेच एकमेव तंत्र आहे आणि परीक्षा या फक्त विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकांवर लिहूनच होऊ शकतात’ या संकल्पनेतून बाहेर पडलो तर अचूक मूल्यमापनाचे अनेक मार्ग समोर येतील. कोरोना काळात नवी परीक्षा पद्धती किंवा मूल्यमापन पद्धती जर उदयास आली तर अनेक गोष्टींना नक्कीच आळा  बसेल आणि हा एक आमूलाग्र बदल असेल. केजीपासून पीजीपर्यंत मूल्यमापनासाठी वेगवेगळी तंत्रे वापरली जाऊ शकतात. फक्त प्रश्न विचारण्यामागील उद्दिष्ट लक्षात घ्यायला हवे.     

 

कोरोना विषाणूच्या थैमानाने शिकवण्याच्या आणि शिकण्याच्या पद्धतीत झालेले बरेचसे बदल सरकारी आदेशाविना नाइलाजाने स्वीकारले गेले. शिक्षणात आणखी बरेच बदल नजीकच्या काळात अपेक्षित आहेत. ‘शिक्षणात झालेले आणि होऊ घातलेले नवे बदल केवळ कोरोनाच्या काळापुरतेच मर्यादित नसतील’ ही बाबदेखील हळूहळू स्वीकारली जाईल. अशा परिस्थितीत ‘मूल्यमापन’ या शिक्षण प्रक्रियेतील अविभाज्य घटकावर विचारमंथन आता गरजेचे आहे.

कोरोना नसता तर एव्हाना प्रथम युनिट परीक्षेची तयारी सुरू झाली असती. कोरोना आहे तरी बहुतांश शाळांमधून ऑनलाइन शिक्षण चालू असल्याने अभ्यासक्रम काही फार मागे आहे असे नाही. किंबहुना, नेहमी असतो तेवढाच किंवा त्यापेक्षा थोडा जास्त झाला असेल. हे मी अनुभवातून माझे मत मांडत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे ऑनलाइन शिक्षणात नियोजित वेळेपैकी शिक्षकांचा बराच वेळ फक्त त्यांनी ठरवलेला भाग विद्यार्थ्यांना एकतर्फी स्पष्ट करून देण्यात जातो. ऑफलाइनप्रमाणे क्वचितच विद्यार्थी शिकवताना प्रश्न विचारतात. विद्यार्थ्यांच्या एकमेकांबद्दलची तक्रारी, सूचना, अडचणी यांसारखे अडथळेदेखील नसतात.

आता प्रमुख प्रश्न परीक्षांचा आहे. वृत्तपत्रांतील गेल्या एक-दोन दिवसांतील बातम्यांवरून तरी असे समजते की, मागील वर्षाच्या परीक्षा घ्यायच्या की नाहीत हा संभ्रम अद्यापही आहे.  सरकारी पातळीवर या वर्षीच्या परीक्षांचा विचार करण्यास अद्याप सुरुवात झाली नसावी. परीक्षांची पारंपरिक पद्धती अशी परिस्थिती निर्माण करण्यास कारणीभूत आहे हे ठामपणे स्पष्ट करता येईल. आपण ‘मूल्यमापनासाठी परीक्षा हेच एकमेव तंत्र आहे आणि परीक्षा या फक्त विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकांवर लिहूनच होऊ शकतात’ या संकल्पनेतून बाहेर पडलो तर अचूक मूल्यमापनाचे अनेक मार्ग समोर येतील.

‘परीक्षा या विद्यार्थ्यांचे संबंधित विषयातील आकलन आणि उपयोजन तपासण्यासाठी असतात’ हे विधान प्रचलित परीक्षा पद्धती पाहता चुकीचे वाटते.  प्रचलित परीक्षा पद्धतीमध्ये बहुतांश प्रश्नांद्वारे स्मरणशक्ती तपासली जाते. विज्ञानाचे प्रश्न हे इतिहास, भूगोलाच्या प्रश्नांसारखे केवळ पाठांतराने सहज सोडविता येतात.  गणितही त्यास अपवाद नाही. घोकंपट्टी करणारा विद्यार्थी अतिहुशार ठरतो. भाषा विषयांमध्ये आकलन आणि उपयोजनावर आधारित प्रश्न हे इतर विषयांपेक्षा जास्त असतात आणि एवढीच ती जमेची बाजू म्हणता येईल, पण त्यातही भाषा शिक्षक निबंधवजा प्रश्न तपासताना विद्यार्थ्यांच्या हस्ताक्षरास जास्त महत्त्व देतात आणि त्यामुळे मूल्यमापनावर विपरीत परिणाम होतो. कोरोना काळात नवी परीक्षा पद्धती किंवा मूल्यमापन पद्धती जर उदयास आली तर वरील गोष्टींना नक्कीच आळा  बसेल आणि हा एक आमूलाग्र बदल असेल.

केजीपासून पीजीपर्यंत मूल्यमापनासाठी वेगवेगळी तंत्रे वापरली जाऊ शकतात. फक्त प्रश्न विचारण्यामागील उद्दिष्ट लक्षात घ्यायला हवे. एखाद्या भागाचे व्यवस्थित आकलन तपासण्यासाठी त्या भागावर लघुत्तरी आणि दीर्घोत्तरी असे पाच वेगळे प्रश्न विचारले जात असतील, तर त्याऐवजी आपण जास्तीत जास्त वैकल्पिक प्रश्न तयार केले तर संगणकाच्या किंवा मोबाईलच्या मदतीने आकलन तपासता येऊ शकते. पाचऐवजी 15 ते 20 प्रश्न किंवा त्यापेक्षा जास्त वैकल्पिक प्रश्न दिले तर सर्व भागही तपासता येईल आणि हे सर्व ऑनलाइन करता येऊ शकते. 100 गुणांऐवजी 1000 गुणांचा ऑनलाइन पेपर ठेवून नंतर त्याचे रूपांतर 100 गुणांत करता येऊ शकते. यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासलेल्या प्रत्येक भागावर प्रश्न देता येतील.

‘तुम्ही हस्ताक्षर कसे तपासणार?’ असे म्हणून काही विचारवंत हस्ताक्षराचा आणि लेखन कौशल्याचा मुद्दा पुन्हा उपस्थित करतील. हस्ताक्षरास महत्त्व देऊन एखादा संबंधित उतारा किंवा अभिप्राय विद्यार्थ्यांकडून लिहून घेऊन अपलोड करता येऊ शकेल. त्यास 100 पैकी 10 गुण देता येतील. इच्छा असेल तर अनेक मार्ग सापडतील. याद्वारे शिक्षण मंडळांच्या तसेच विद्यापीठाच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी होणारा उशीर नक्कीच टाळता येईल. वास्तव हे आहे की, शिक्षण क्षेत्रासारख्या फारच थोडय़ा व्यवसायांमध्ये आता हस्ताक्षराची गरज भासते. ऑनलाइन शिक्षणाने ते कामही कमी केले आहे. त्या थोडय़ा व्यवसायांसाठी सर्वांनाच या दिव्यातून जावे लागते हेदेखील लक्षात घ्यायला हवे.

चुकीच्या आकृती ओळखून योग्य पर्याय निवडा, या कृतीचा खालीलपैकी कोणता परिणाम होईल? खालीलपैकी चुकीचे समीकरण कोणते? यासारखे 1000 प्रश्न विज्ञान आणि गणिताच्या पुस्तकातील प्रत्येक भागास स्पर्श करणारे ठरतील आणि मूल्यमापनात बरीच अचूकता येईल.  खालीलपैकी अचूक किंवा चुकीचा शब्द किंवा चुकीचे वाक्य ओळखून योग्य पर्याय निवडा, अमूक वाक्प्रचार खालीलपैकी कोणत्या पर्यायाशी अचूक जुळतो? या वाक्याच्या कोणत्या भागात व्याकरणाची चूक आहे? अशा प्रकारच्या भाषा विषयातील प्रश्नांनी विद्यार्थ्यांना विषय सखोल अभ्यासण्याची सवय लागेल. पदवी आणि पदव्युत्तर तसेच अभियांत्रिकीतही असे अशक्य नाही. प्रात्यक्षिकाची गरज नाकारता येत नाही, पण लेखी परीक्षेला मात्र असा पर्याय नक्कीच योग्य ठरू शकतो. सिम्युलेशनने विमान उडविण्याचे प्रशिक्षण दिले जाते, मग परीक्षा घेणे हे त्यापेक्षा नक्कीच अवघड नाही.  गरज आहे ती फक्त इच्छाशक्तीची. अशी पद्धत समजा आलीच तर त्यापुढे ‘बेस्ट ऑफ लक’ कदाचित कोणीही म्हणणार नाही, कारण अभ्यास करेल तोच तरेल.

पदवीच्या परीक्षा घ्याव्या की नाहीत? हा प्रश्न फक्त कोरोना काळामुळे आला आहे आणि परीक्षा पद्धतीत आतापर्यंत बदल न झाल्याने तो अधिकच गंभीर वाटू लागला आहे. खर्चाच्या आणि कोरोना काळातील सुरक्षिततेच्या दृष्टीने ऑनलाइन परीक्षा एक वरदान ठरेल.

(लेखक पुणे विद्यार्थीगृहाच्या नेरूळ येथील विद्याभवन शाळेत सहा. शिक्षक आहेत.)