
>> अश्विन बापट
तिने ऑटोमोटिव्ह डिझाइन मॅन्युफॅक्चरिंगमध्ये एमएस केलं. मग अमेरिकेतील साऊथ कॅरोलिनामध्ये प्रगत शिक्षण घेतलं. तिथे बीएमडब्ल्यू, जीपसारख्या कंपन्यांमध्ये प्रॉडक्ट डेव्हलपमेंटमध्ये काम केलं, पण परदेशातील मोठी मिळकत मागे सारत तिने मायदेश गाठला. लाकूड आणि बांबूपासून पर्यावरणपूरक उत्पादन निर्मिती करणारी प्रतीक्षा शेळके-भेगडेंची ही पर्यावरणपूरक वाटचाल.
मेकॅनिकल इंजिनीअर असलेली एक तरुणी जिने ध्यास घेतलेला पर्यावरणपूरक व्यवसायाचा. तिने ऑटोमोटिव्ह डिझाइन
मॅन्युफॅक्चरिंगमध्ये एमएस केलं. अमेरिकेतील साऊथ कॅरोलिनामध्ये प्रगत शिक्षण घेतलं. तिथे बीएमडब्ल्यू, जीपसारख्या कंपन्यांमध्ये प्रॉडक्ट डेव्हलपमेंटमध्ये काम केलं. तरीही मायदेशाची ओढ आणि पर्यावरणावरचं प्रेम तिला स्वस्थ बसू देईना. भविष्यात मिळू शकणाऱया मोठय़ा पगाराची स्वप्न न पाहता तिने थेट भारत गाठला. त्यात कोरोनाचा काळ आला. तेव्हा नोकरी न करता तिचा पर्यावरणपूरक व्यवसायाचा निर्धार आणखी पक्का झाला. आज चार वर्षे झाली ती जंगल बाऊंड प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची सर्वेसर्वा आहे. तिचं नाव प्रतीक्षा शेळके-भेगडे!
या प्रवासाबद्दल प्रतीक्षा यांना बोलतं केलं असता त्या म्हणाल्या, मी मूळची नगरची, पण पुण्यातच वाढल्याने माझं पुण्याशी खास नातं आहे. वारजेवळील शिवणे या ठिकाणी माझा व्यवसाय सुरू झाला. माझी या कंपनीची सुरुवात तीन कर्मचाऱयांसोबत झाली. आज तीन हजार स्क्वेअर फूट जागेत माझं प्रॉडक्शन युनिट आहे. 10 जणांचा पगारी कर्मचारी वर्ग आहे. सोबत ऑर्डर्स जशा येतात, तशा मी यामध्ये काही कामगार हायर करते. मुख्यतः लाकूड आणि बांबूपासून माझी उत्पादनं होत असतात. लाकडाबद्दल सांगायचं तर हे लाकूड आम्ही जे मोठमोठे ट्रॉलर्स बंदरात उतरत असतात, त्याला जे बॉक्स म्हणून कव्हर केलेले मोठे लाकडी खोके असतात ते विकत घेऊन म्हणजे स्क्रॅप वूड घेऊन लाकडाची उत्पादनं तयार करतो. कोणतीही वृक्षतोड यासाठी आम्ही करत नाही. तसंच बांबूच्या शेतीलाही सध्या खूप चांगले दिवस आहेत. पुण्यातल्या अनेक शेतकऱयांकडून या उत्पादनांकरिता लागणारा बांबू विकत घेतला जातो. आमच्या उत्पादनाबद्दल अधिक सांगायचं झालं तर यामध्ये अगदी 25 रुपयांच्या की-चेनपासून ते 20 हजार रुपयांच्या वूडन म्युरल म्हणजेच वॉल माऊंट पेंटिंगचा समावेश आहे.
अलीकडेच लहान मुलांसाठी म्हणजे अंदाजे 8 ते 10 वर्षे वयोगटापर्यंतच्या मुलांसाठी खुर्च्या, स्टडी टेबल यांसारखी प्रॉडक्ट्सही सुरू केलीत. ज्याला खूप चांगली मागणी आहे. तसंच ऑफिसेससाठी लॅपटॉप स्टँड, स्टेशनरी होल्डर स्टँड किंवा हॉटेल्ससाठी लागणारे टिश्यू स्टँड्स, कटलरी होल्डर स्टँड्स यांचंही उत्पादन आम्ही करतो. यातली बहुतेक उत्पादनं आम्ही लाकूड आणि बांबू अशा दोन्हींपासून बनवतो. प्रत्येकाचा लूक निराळा आहे. अगदी लहान बाळांसाठी लाकडी पाळणेदेखील आम्ही तयार करतो. आमची उत्पादनं पुण्यासह मुंबई, नागपूर, नाशिक, कोल्हापूरसारख्या ठिकाणी खूप डिमांडमध्ये आहेत. तसंच कर्नाटक, पश्चिम बंगाल, गुजरात, राजस्थान, केरळ, दिल्ली अशा विविध राज्यांमध्येही आमची प्रॉडक्ट्स पोहोचलीत. इतकंच काय तर थेट अमेरिका, रशियासारख्या ठिकाणच्या कस्टमर्सनीही आमच्याकडून ही उत्पादने घेतली आहेत. यामध्ये कॉर्पोरेट गिफ्टिंगसाठी या मंडळींनी प्रॉडक्ट्स घेतलीत. तसंच आमच्या ट्रॉफीज, मोमेंटोजही लोकांना खूप आवडतात.
बांबूपासून बनवलेलं बांबू एम्प्लिफायरमुळे स्पीकरचा आवाज अधिक सुस्पष्ट आणि चांगला ऐकू येण्यास मदत होते, तेही चांगल्यापैकी मागणीत आहे. आमच्याकडे दिवसाला अंदाजे 300 ते 500 प्रॉडक्ट्स आम्ही तयार करतो. बहुतांश वेळी सिंगल शिफ्टमध्येच आमचं काम चालतं. काही वेळा ओव्हर टाइम होतो, तेव्हा त्याचाही मोबदला आम्ही आमच्या कामगारांना देत असतो. आजच्या घडीला माझ्याकडे 12 मशीन्स आहेत. ज्या माध्यमातून मी ही उत्पादन निर्मिती करत असते. वस्तूंचे पॅकेजिंग हाही या व्यवसायातला महत्त्वाचा घटक आहे. ज्यावर मी तितकाच भर देत असते.
माझ्या या व्यवसायात माझं माहेर आणि सासर अशा दोन्ही कुटुंबांची भक्कम साथ आहे. दिवसेंदिवस लोकांमध्ये पर्यावरणपूरक वस्तू वापरण्याचा कल वाढतोय आणि तो वाढतच राहणार आहे. त्यामुळे भविष्यात स्पर्धा आणि मागणीही वाढत जाईल, असा मला विश्वास आहे. येणाऱया काळात आपली उत्पादनं अधिकाधिक एक्सपोर्ट व्हावी यासाठी मी कसून प्रयत्न करणार असल्याचंही प्रतीक्षा यांनी आवर्जून सांगितलं.
(लेखक हे एबीपी माझाचे सीनियर प्रोडय़ुसर – सीनियर न्यूज अँकर आहेत.)