मुद्दा : ईव्हीएम आणि हेराफेरी

129

>> उल्हास गुहागरकर

लोकसभेच्या निवडणुकांत भाजपप्रणीत एनडीएला पुन्हा यश मिळाले आणि आठवडय़ाच्या शांततेनंतर पुन्हा मतदानाच्या ‘ईव्हीएम’ यंत्राविरोधातील शंकेला धार येऊ लागली. ईव्हीएम घोटाळ्याचा संशय घेणारे विरोधी पक्षांचे शरद पवार, चंद्राबाबू नायडू, ममता बॅनर्जी यांच्यासारखे मातब्बर नेते जनतेला अजून किती दिवस संभ्रमात ठेवणार? अशा संभ्रमात 2019 साल कधी उजाडले ते समजले नाही आणि 2024 कधी उजाडेल तेही समजणार नाही. कारण ईव्हीएमवर संशय घेणारे निव्वळ कांगावा करत आहेत असेच जनतेच्या मनात मूळ धरू लागले आहे. ईव्हीएम मशीनमध्ये हेराफेरी करून भाजप निवडणुका जिंकतो अशी मागील दोन वर्षांपासून आजतागायत अगदी पराकोटीच्या आत्मविश्वासाने भाजपविरोधक हाकाटी करीत आहेत. विरोधी पक्षांनी ईव्हीएम हेराफेरीचा संशय पुराव्यानिशी सिद्ध करून दाखविला तर देशातच नव्हे तर जगभरात हाहाकार माजेल. अशी हेराफेरी करता येऊ शकते असा जर कोणाचा दावा असेल तर त्यांनी तो सप्रमाण सिद्ध करून भाजप सरकारची दांभिकता चव्हाटय़ावर का आणू नये? ईव्हीएम हेराफेरीचा दावा सिद्ध करायचा असेल तर एकजूट केलेल्या विरोधी पक्षांनी एखाद्या नामांकित इलेक्ट्रॉनिक कंपनीकडून निवडणूक आयोगाच्या मतदान व व्हीव्हीपॅट यंत्रांची प्रतिकृती हॅकिंगच्या करामतीसह तयार करून घेऊन एखाद्या ठिकाणी शे-दोनशे मतदारांच्या मतदानाचे जाहीरपणे प्रात्यक्षिक आयोजित करावे. हे करताना त्यांनी निवडणूक आयोगाच्या मतदानपूर्व ते निकालापर्यंतच्या सर्व कार्यपद्धतीचे अगदी तंतोतंत पालन करावे. त्यामध्ये सर्व पक्षांच्या मतदान प्रतिनिधींची नियुक्ती करावी व सर्वात महत्त्वाचे म्हणजे आयोगाच्या कार्यपद्धतीनुसार मतदान सुरू करण्यापूर्वी सर्वांसमक्ष अभिरूप मतदान (मॉक पोल) घ्यावे आणि त्याबाबत सर्व उपस्थितांच्या स्वाक्षऱ्या घेऊन मतदान व व्हीव्हीपॅट यंत्रे मोहोरबंद करून मतदानासाठी सज्ज ठेवावीत. हीच मोहरबंदाची कार्यपद्धती मतदान पूर्ण केल्यानंतरही अवलंबावी. आयोगाच्या अघिकाऱ्यांनाही न चुकता प्रात्यक्षिकासाठी पाचारण करावे. त्यानंतर मतदान प्रक्रिया पूर्ण होताच लगेच आयोगाच्या निकाल कार्यपद्धतीचा अवलंब करून ‘हा सूर्य आणि हा जयद्रथ’ असा निकाल उपस्थितांना दाखवावा. म्हणजे जनतेचा संभ्रम कायमची दूर होईल. अन्यथा, आडात नसेल तर पोहऱ्यात कुठून येणार? हीच शंका जनतेच्या मनात कायमचे ठाण मांडून बसेल. परिणामी, भाजपप्रणीत एनडीएचे विरोधकही भाजपसमोर हतबल होतील.

आपली प्रतिक्रिया द्या