उपवासी भाज्या

>> शर्मिला कुलकर्णी

उपवास करताना भाजीचा समावेश पूर्ण आहारासाठी गरजेचा ठरतो.

भेंडी – भेंडीत अनेक चांगले गुणधर्म असतात. त्यात तंतुमय पदार्थ, जीवनसत्त्व, कर्बोदके यांचा मुबलक साठा असतो. भेंडीची भाजी भाकरी किंवा थालीपीठ यासोबत उत्तम लागते. या भाजीमुळे पचनक्रिया सुधारण्यात मदत होते.

काकडी – काकडीचा समावेश आवर्जून उपवासात केला जातो. काकडीत पाण्याचे प्रमाण अधिक असल्यामुळे उपवासासाठी ती पूरक ठरते. आहारात काकडी कोशिंबीर म्हणून किंवा थालीपीठातही घालता येते. मधल्या वेळेत नुसती काकडी खाऊ शकतो.

भोपळा – भोपळ्यातही इतर रंगीत भाज्यांप्रमाणे अ, क जीवनसत्त्व असतात. त्याचबरोबर मुबलक प्रमाणात कर्बोदके आणि तंतुमय पदार्थ असतात. भोपळ्याची दही लावून कोशिंबीर किंवा थालीपीठ, भाजी असे प्रकार करू शकतो.

मिरची आणि कोथिंबीर – मिरची आणि कोथिंबीर प्रत्येक पदार्थाला त्याची चव देतात. त्याचबरोबर त्या पदार्थांमध्ये त्यांचे गुणधर्मही उतरतात. यात अनेक जीवनसत्त्व असतात जसे अ, क, आणि त्याचबरोबर कोणताही पदार्थ यामुळे अतिशय चविष्ट बनतो. यांचा समावेश उपवासाच्या पदार्थांमधे आवर्जून करावा.

आपली प्रतिक्रिया द्या