मुद्दा – बेफिकीर तरुणाई

2665

>>  गुरुनाथ वसंत मराठे

खचाखच भरलेल्या उपनगरीय लोकलमधून अनेक अतिउत्साही तरुण जिवावर बेतणारे स्टंट करताना दिसतात. उदा. लोकलमधून वाकून लोहमार्गाच्या बाजूला असलेल्या खांबास हात लावणे तसेच गाडी फलाटात शिरताना स्थानकांवर उभ्या असलेल्या लोकांना लाथ मारणे आदी. पण हे सर्व करत असताना गाडीतून वाकल्यामुळे खांबाचा फटका बसल्यामुळे अथवा तोल गेल्यामुळे खाली पडून जीव गेल्याच्या अनेक घटना समोर असताना आजची तरुणाई सुधारत नाही याचे वाईट वाटते. काल यात एका दूरदर्शनवरील व्हिडीओची भर पडली आहे. दिवा येथे एक तरुण लोहमार्गावरून फलाटावर उडी मारण्याचा प्रयत्न करत असताना त्याची उडी नेमकी फलाटावर पडल्यामुळे त्याचे प्राण अक्षरशः वाचले. कारण तो ज्या लोहमार्गावरून फलाटावर उडी मारत होता त्याच लोहमार्गावर आलेल्या गाडीत आणि त्याच्या उडी मारण्याच्या वेळेत काही सेकंदांचा फरक पडल्यामुळे तो बालंबाल वाचला. परंतु ही घटना पाहणाऱया लोकांच्या काळजाचा ठोका मात्र चुकला. आजची ही बेफाम तरुणाई अशी जीवघेणी धाडस का करते तेच समजत नाही. आपल्याला सर्वांनी पाहावे व आपले फोटो, व्हिडीओमध्ये कैद होऊन त्याला दूरदर्शनद्वारे आपल्याला प्रसिद्धी मिळावी हा तर त्यामागचा उद्देश नव्हे ना? परंतु या ठिकणी प्राण गेल्यास अथवा अपंगत्व आल्यास घरच्या कुटुंबीयांना दोन्ही बाजूंनी दुःख आहेच. प्रवाशांचा प्रवास सुरक्षित आणि निर्धोक व्हावा म्हणून रेल्वेतर्फे प्रत्येक स्थानकावर प्रवाशांनी लोहमार्ग न ओलांडता पूल अथवा भुयारी मार्गाचा वापर करावा अशा वारंवार सूचना देऊनही लोकांच्या बेफिकीर वृत्तीत कोणताही फरक पडत नाही. तसेच भ्रमणध्वनी जेवढा उपयुक्त आहे तेवढाच तो घातकदेखील आहे. कारण कानात वायरी घालून रस्त्यातून चालताना अथवा लोहमार्ग ओलांडताना गाडय़ांच्या धडका बसल्यामुळे अनेकांचे प्राण गेले आहेत हे न समजण्याइतकी आजची तरुण पिढी अशिक्षित/अडाणी समजायची की सर्व माहीत असूनदेखील बेफिकीर व बिनधास्त वागून आपले सोन्यासारखे आयुष्य धोक्यात घालायचे एवढेच त्यांना माहीत असावे.

आपली प्रतिक्रिया द्या