
>> विनायक अभ्यंकर
ब्रिटिशांच्या फ्रंटीयर फोर्स रेंजमध्ये कडक शिस्तीत घडलेले व नंतर गुरखा रेजिमेंटचे सर्वेसर्वा, सॅम बहादूर फोरमुसजी फ्रेजमशेदजी माणेकशॉ नेहमी म्हणत ‘मी मृत्यूला भीत नाही म्हणणारा माणूस एकतर खोटे बोलतो किंवा गुरखा असतो’ इतके त्यांचे आपल्या पलटनीवर नितांत प्रेम होते. अतिशय मिश्कील, उंचापुरा, उमदा, शिस्तीचा असा हा योद्धा. आपल्या सैन्यावर पित्याच्या मायेने प्रेम करणारा. बांगलादेशच्या युद्धात आपण विजय मिळविला. पाकिस्तानचे तुकडे करून स्वतंत्र बांगलादेशची निर्मिती केली. बांगलादेश युद्धाच्या विजयाचे शिल्पकार म्हणून फिल्ड मार्शल सॅम बहादूर माणेकशॉ यांचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले.
वेलिंग्टन सैनिक प्रशिक्षण केंद्र संस्थेची शांत मोहक वेळ. एक सद्गृहस्थ सायंकाळी फेरफटका मारत फिरत होते. रविवारचा पहुडलेला शांत रस्ता. इतक्यात एक व्यक्ती हातात जड सामान घेऊन अडखळत प्रवेशद्वारापाशी आली. त्या सद्गृहस्थाला मोबदला देण्याचा शब्द देऊन सामान उचलण्यासाठी मदत मागितली. त्या सद्गृहस्थांनी बॅग उचलून त्या तरुणाच्या पाठीमागून चालण्यास सुरुवात केली. तो सैनिकी अधिकारी विश्रामधामात येताच दहाची नोट काढत त्या सद्गृस्थांना त्याने विचारले ‘बाबा आपले नाव काय?’ तो सद्गृहस्थ शांतपणे म्हणाला, ‘या देहाला सॅम बहादूर म्हणतात.’ हे ऐकताच त्या तरुण अधिकार्याची पाचावर धारण बसली. त्याने सावध होत सावधान अवस्थेत येत शुभ संध्याकाळ म्हटले. सॅम बहादूर माणेकशॉनी त्याला शुभेच्छा देत तू इथे आनंदात राहशील, असा आशीर्वाद दिला. ओशाळलेल्या तरुण आधिकार्याच्या चेहर्यावर हसू फुलले.
ब्रिटिशांच्या फ्रंटीयर फोर्स रेंजमध्ये कडक शिस्तीत घडलेले व नंतर गुरखा रेजीमेंटचे सर्वेसर्वा, सॅम बहादूर फोरमुसजी फ्रेजमशेदजी माणेकशॉ नेहमी म्हणत ‘मी मृत्यूला भीत नाही म्हणणारा माणूस एकतर खोटे बोलतो किंवा गुरखा असतो’ इतके त्यांचे आपल्या पलटनीवर नितांत प्रेम होते. पूर्व विभागात उच्च ध्वजाधिकारी असताना ते स्वतः हेलिकॉप्टरमधून निरीक्षणांस जात तेव्हा दस्तूरखुद्द इंदिराजींनी त्यांना प्रेमळ इशारा देत ‘सॅम, तुझी आम्हाला गरज आहे. हे धाडस थांबव’ असा सल्ला दिला होता. स्वातंत्र्योत्तर काळात हिंदुस्थान-पाकिस्तान सैन्य वाटणीच्या समितीत कर्नल माणेकशॉ सदस्य होते. तेव्हापासून इंदिराजी आणि त्यांच्यात सुसंवाद होता. याला इंदिरा गांधी या लग्नानंतर पारशी होत्या हीदेखील एक किनार होती. त्याच नात्यातून सॅम बहादूर इंदिराजींना ‘खिटी’ म्हणून सुद्धा संबोधत. अतिशय मिश्कील, उंचापुरा, उमदा, शिस्तीचा असा हा योद्धा. आपल्या सैन्यावर पित्याच्या मायेने प्रेम करणारा, थोडासा आत्मकेंद्रित, कोर्ट मार्शलमधून तावून सुलाखून बाहेर पडलेला सेनापती म्हणजे फिल्डमार्शल सॅम बहादूर माणेकशॉ. स्वभावाने ते अत्यंत स्पष्टवक्ता होते. एकदा एका वार्ताहराने त्यांना प्रश्न केला. ‘तुम्ही पाकिस्तानमध्ये गेला असतात तर काय झाले असते?’ तर तेव्हा माणेकशॉ यांचे उत्तर होते, ‘युद्ध पाकिस्तानने जिंकले असते’ पाकिस्तानचे तत्कालीन जनरल असदखान यांचे पुत्र जनरल गोहरखान यांनी एकदा पुडी सोडली की, ‘सॅम आम्हाला माहिती पुरवत.’ ही त्यांची एक धोरणी चाल होती. 1962च्या युद्धकाळात सॅम बहादूर यांच्यावर जनरल बी. एस. कौल यांनी अत्यंत बाळबोध आरोप करत देशविरोधक ठरवलं. सैनिकी न्यायालयीन चौकशी सुरू केली. जनरल कौल हे तेव्हा राजकीय नेत्यांच्या विशेषतः तत्कालीन परराष्ट्रमंत्री मेनन यांच्या मर्जीतले होते. माणेकशॉ यांची चौकशी करणार्या सैनिकी न्यायालयाचे अध्यक्ष (न्यायाधीश) होते. लेफ्ट. जनरल दौलत सिंग हे निःस्पृह आधिकारी होते. त्यांनी सॅम बहादूर यांची सर्व मामुली आरोपांतून निर्दोष मुक्तता केली. या काळात दिल्लीतून बर्याच अधिकार्यांना ‘साक्ष’ देण्यासाठी दूरध्वनीवरून विनंतीवजा धमक्या येत. कारण काही वरिष्ठ अधिकारी सॅम बहादूर यांना ‘बलदंड’ प्रतिस्पर्धी समजत असत. अतिशय स्पष्टवक्ता असलेले सॅम माणेकशॉ यांचा हिंदुस्थानी सैन्याच्या दुर्दम्य इच्छाशक्तीवर प्रचंड विश्वास होता. त्यामुळे इंदिराजींच्या डोळ्याला डोळा भिडवत ते आपले मत मांडत असत. हा एका उच्चपदस्थ अधिकार्यांमध्ये दिसणारा विरळ अलौकिक गुण त्यांच्याकडे होता.
1971च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर पाकिस्तानमध्ये राजकीय व लष्करी उलथापालथ होत होती. या घडामोडींवर आपल्या लष्कराचे व गुप्तहेर विभागाचे लक्ष होते. पाकिस्तानचे त्यावेळचे जनरल याह्याखान सत्ता आपल्या हातून सुटू नये म्हणून तरतऱहेचे डावपेच टाकत लष्करी वर्चस्व कमी होणार नाही याची खबरदारी घेत होते. मार्च महिन्यामधल्या निर्वासितांच्या प्रचंड झंझावाताने हतबल झालेल्या आपल्या सरकारसमोर आर्थिक, लष्करी, सामाजिक अशा अनेक समस्या आ वासून उभ्या होत्या. मे महिन्यातील एका चिंताग्रस्त संध्याकाळी पंतप्रधान कार्यालयात इंदिरा गांधी आपल्या वरिष्ठ सहकार्यांबरोबर विचारविनिमय करत होत्या. नुकतीच सार्वत्रिक निवडणूक ‘गरिबी हटाव’चा पुकारा देत त्यांनी जिंकली होती. त्यावेळी पाकिस्तानातून येणार्या निर्वासीतांच्या झुंडींवरून बैठकांचा सिलसिला सुरू होता.
एका लष्करी अधिकार्यांच्या बैठकीत सॅम यांना संबोधून इंदिराजी उच्चस्वरात म्हणाल्या, ‘तुम्ही काही करत का नाही?’ सॅम बहादूर तितक्याच शांत धीर गंभीर आवाजात म्हणाले ‘नाही मॅडम. मी काही करू शकत नाही.’ इंदिराजींनी का म्हणून विचारल्यावर सॅम बहादूर यांनी म्हटले की, ‘ही वेळ नाही युद्धाची. तुमच्या राजकीय चर्चेत माझे नाक तुमच्या पेक्षाही लांब असले तरी मी ते खुपसणार नाही.’ इंदिराजी स्तब्ध होत्या. काय समजायचे त्या समजल्या. पुढे सॅम बहादूर म्हणाले, ‘मी युद्ध जिंकण्याकरता लढतो. हरण्याकरता नाही! मी माझा राजीनामा पाठवून देऊ का?’ पुढील इतिहास सर्वज्ञात आहे. बांगलादेशच्या युद्धात आपण विजय मिळविला. पाकिस्तानचे तुकडे करून स्वतंत्र बांगलादेशची निर्मिती केली. बांगलादेश युद्धाच्या विजयाचे शिल्पकार म्हणून फिल्ड मार्शल सॅम बहादूर माणेकशॉ यांचे नाव सुवर्ण अक्षराने लिहिले गेले. 3 एप्रिल 1914 ला अमृतसरमध्ये जन्मलेले फिल्ड मार्शल सॅम बहादूर 27 जून 2008 ला उटकमंड येथे कायमचे विसावले. दुर्दैव असे की त्यांच्या अंत्यविधीला त्यावेळचे एकही जबाबदार केंद्रीय मंत्री उपस्थित नव्हते. हे शल्य मनाला नेहमीच बोचते.
(लेखक निवृत्त लष्करी अधिकारी आहेत)





























































